औरंगाबाद, 5 जुलै- वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या समर्थनगर शाखेतून 58 किलो सोने व्यवस्थपकाने सहकार्याच्या मदतीने लंपास केले होते. या पैकी मण्णपुरम गोल्ड शाखेत गहाण ठेवलेले सुमारे 21 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी शुक्रवारी जप्त केले आहे.
पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे याने राजेंद्र जैन, लोकेश जैन आणि एका महिलेच्या मदतीने पेठे ज्वेलर्समधील तब्बल 58 किलो लंपास केले होते. या तिघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर कोठडीदरम्यान त्यांनी यापैकी एकूण 24 किलो सोने हे मण्णपुरम गोल्ड शाखेत गहाण ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यापैकी राजेंद्र जैन याने मण्णपुरममधून तीन किलो सोने सोडवून घेऊन गेला होता.
या माहितीवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मण्णपुरमच्या शहरातील रेल्वेस्टेशन शाखेतून सुमारे पाच कोटी तीस लाख 81 हजार रुपयांचे सुमारे 21 किलो सोने जप्त केले आहे. सोडवलेले तीन किलो आणि इतर सोने आरोपीने कुठे ठेवले आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, चोरटे आता सोनाराला सोने विकत नाहीत. मण्णपुरम गोल्ड लोनमध्ये ठेवतात. कर्ज घेतात आणि पैसे भरत नाहीत. सोनं मण्णपुरम जप्त करून घेते, हा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.
काय आहे प्रकरण?
वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या औरंगाबादेतील समर्थनगर शाखेतील व्यवस्थापक अंकूर राणे याने एक ग्राहक व ग्राहकाच्या भाच्यासोबत संगनमत करून तब्बल 58 किलो सोन्याचे दागिने लांबवले. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याने कंपनीत 466 खोटी बिले लावत 27 कोटी 31 लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी व्यवस्थापक अंकुर अनंत राणे (रा.सन्मित्र काॅलनी, मूळ रा.दापोली, जि.रत्नागिरी), कापड विक्रेता राजेंद्र किसनलाल जैन आणि लोकेश जैन (दोघेही रा.बालाजीनगर) यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.
वामन हरी पेठे ज्वेलर्सची समर्थनगरमध्ये नऊ वर्षांपासून शाखा आहे. कंपनीचे मालक व भागीदार मुंबई येथील विश्वनाथ प्रकाश पेठे यांनी मुख्य आरोपी राणे याची दालन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून येथे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती. समर्थनगर शाखेतून होणारे सर्व व्यवहार, विक्री संगणकीकृत असून ते थेट मुंबईच्या मुख्य कार्यालयाशी संलग्न असूनही हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. डिसेंबर 2018 मध्ये कंपनीच्या ऑडिटमध्ये पेठे यांना 58 किलो सोन्याच्या बिलांची नोंदणी आढळली. परंतु त्याच्या बदल्यात एकही रुपयाही जमा न झाल्याचे आढळून आले. त्यांनी यासंदर्भात राणेला विचारणा केली तेव्हा त्याने कमी भरत असलेले 58 किलो दागिने जैन व त्याची पत्नी भारती जैन यांना दाखवण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. ते दागिने पाहून लवकरच आपल्याला परत करतील, असे सांगितले. परंतु राणेची चोरी जास्त दिवस लपून राहिली नाही. राणे याने आमिषाला बळी पडल्याची तब्बल चार महिन्यांनंतर कबुली दिली. राणेने मालकाला शब्द दिला त्यानुसार एप्रिल 2019 उजाडला तरी दागिने जमा झाले नव्हते. तेव्हा राणेने आपण टक्केवारीच्या आमिषाला बळी पडून जैन याला दागिने दिल्याचे कबूल केले. पेठे यांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन तक्रार दिली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले, सुभाष खंडागळे यांनी तपास केल्यावर जैन व राणेचा घोटाळा समोर आला. 3 जुलैला पोलिसांनी राणे, राजेंद्रसह त्याचा भाचा लोकेश जैनला अटक केली.
VIDEO : वामन हरी पेठेतून तब्बल 27 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी