Home /News /maharashtra /

लातूरवर बर्ड फ्लूचे संकट? 400 कोंबड्यांच्या मृत्यूमुळे प्रशासनाने अलर्ट झोन केला जाहीर!

लातूरवर बर्ड फ्लूचे संकट? 400 कोंबड्यांच्या मृत्यूमुळे प्रशासनाने अलर्ट झोन केला जाहीर!

बर्ड फ्लूचा धोका काही राज्यांत बळावल्यावरून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

अमरावती, 10 जानेवारी : कोरोनानंतर देशात बर्ड फ्लूचे (Bird Flue) संकट ओढावले आहे. राजस्थान, पंजाबपाठोपाठ आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने एंट्री केल्याची भीती वर्तवली जात आहे. लातूरमध्ये (Latur) 400 कोंबड्या दगावल्याची घटना समोर आली आहे. तर अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बडनेरा येथील जुन्या वस्ती परिसरात आतापर्यंत 60  कोंबड्या दगावल्यामुळे खळबळ उडाली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पोल्ट्री फार्म मधील 400 कोंबड्या अचानकपणे  दगावल्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करुण नमुने घेतले असून कोंबड्या दगावल्याने लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने अहवाल येईपर्यंत दहा किलो मिटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. केंद्रवाडी गावात वाहनांना ये -जा करण्यास देखील मनाई करण्यात आली असून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी असे आदेश काढले आहेत. अमरावतीतील बडनेरामध्ये 60 कोंबड्या मेल्या मेळघाटातील धारणी येथून मध्यप्रदेशची सीमा आहे. तेथे अनेक पक्षी ये जा करत असतात तर मध्यप्रदेश मध्ये काही ठिकाणी बर्ड फ्लूची शक्यता आहे. त्यामुळे मेळघाटातील वन विभाग अलर्ट झाले आहेत. मात्र, तूर्तास जरी राज्यात बर्ड फ्लू आला नसला तरी याचा फटका आता जाणवत आहे. कोरोना काळात कोंबड्याला मागणी नव्हती. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय पार बुडाला होता. आता अफवाचा बाजार पुन्हा गरम झाल्याने खळबळ माजली आहे. बडनेरा येथील जुन्या वस्तीतील दत्तवाडी परिसरात राहणारे उमेश गुळरांधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरआमले यांच्याकडील एकूण 60 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. या सर्व कोंबड्यांना पांढरी शौच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अचानक जमिनीवर कोसळून त्या कोंबड्या गतप्राण झाल्या. त्यामुळे कोंबडी पालन करणाऱ्यावर संकट उभे ठाकले आहेत. डॉक्टरांनी तातडीने घटनास्थळी मदतनीस पाठवून कोंबड्यांच्या नाकावाटे व गुदद्वारातून स्वॅब घेण्यास सांगितले. सदर नमुने अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविले असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मात्र, अचानकपणे दगावलेल्या त्या 60 कोंबड्यांनी पांढरी शौच केल्याने नाना प्रश्न उपस्थित झाले. दूषित पाणी प्यायल्याने देखील पांढरी शौच येऊ शकते, असा कयास कोंबडी पालकांनी व्यक्त केला.  तथापि, बर्ड फ्लूचा धोका काही राज्यांत बळावल्यावरून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: लातूर

पुढील बातम्या