सातारा, 25 जुलै : सातारा जिल्ह्यात (Satara District) झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू (40 dead) झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून (Administration) जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे (rains) बचावकार्यात अडथळे येत असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
संकटांची मालिका
सातारा जिल्ह्यात एकाचवेळी झालेलं भूस्खलन, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि पुराचं साम्राज्य अशा वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये मिळून 40 मृतदेह आतापर्यंत सापडले असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. यातील सर्वाधिक मृत्यू आंबेघर, मिरगाव आणि ढोकावळे या भागात झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील 7 जण अद्यापही बेपत्ता असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
शोधकार्य सुरू
भूस्खलन झालेल्या गावांमध्ये अजूनही शोधकार्य सुरूच आहे. एक 8 महिन्यांचं बाळदेखील अद्याप ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती मिळत असून सर्व शक्तीनिशी प्रशासन खोदकाम करत आहे. मात्र खोदकामात सतत पडणाऱ्या पावसाचा मोठा अडथळा येत असल्याचं चित्र आहे. पावसामुळे चिखलाचं प्रमाण वाढत असून बचाव कार्याचा वेग मंदावत आहे.
सातारच्या पाटण तालुक्यात डोंगराचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत दुपारपर्यंत 5 मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. अजूनही या ठिकाणी मातीचा मोठा ढिगारा असून तो उपसायला एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी जर पुन्हा पावसाने हजेरी लावली, तर मात्र ढिगारा उपसण्याच्या कामाला अधिक वेळ लागण्याचा अंदाज आहे.
हे वाचा -Weather Update: पुढील दोन आठवडे राज्यात पावसाचा ब्रेक? काय असेल कोकणातील स्थिती?
पुनर्वसनाचा प्रश्न
मोरणा धरणात ज्या गावांच्या जमिनी गेल्या, त्या गावांचं पुनर्वसन अद्याप झालं नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. जर योग्य वेळी पुनर्वसन झालं असतं, तर आंबेघरवरील नागरिकांवर अशी वेळ आलीच नसती, अशी प्रतिक्रिया तिथले ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असता, तर या भागातील नागरिक इतरत्र स्थायिक झाले असते आणि त्यांचे जीव गेले नसते, असं या भागातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Monsoon, Satara, Satara (City/Town/Village)