वाशिम, 25 फेब्रुवारी : शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड दर्शनासाठी पोहोचले होते. त्यामुळे जमलेल्या गर्दीत अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. पोहरादेवी येथील एका महंतासह कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
याच गावातील इतर 3 जणही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. पोहरादेवी येथे दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते. त्यामुळे अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यातचएका महंतासह कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या प्रकरणात कोरोना रुग्णाचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, पोहरादेवी इथे झालेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. स्वतःच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी तिथे उपस्थिती लावली होती. तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत कडक धोरण अवलंबलं आहे. 'कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वाना सारखेच', असं म्हणत गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.
कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या प्रकराचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.