नाशिक, 30 डिसेंबर : शरीर चांगले राहण्यासाठी उत्तम आहारासोबत व्यायाम करणेही गरजेचं असतं. काही जण व्यायाम शाळेत जातात तर काही जण घरीच योगा आणि प्राणायाम (pranayam) करत असतात. पण, नाशिकमध्ये (nashik) प्राणायाम करत असताना एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील मखमलाबाद परिसरात ही घटना घडली आहे. सोनल आव्हाड असं या महिलेचे नाव आहे.
सोनल आव्हाड या नियमितपणे प्राणायाम करत होत्या. आज सकाळी सुद्धा सोनल या प्राणायाम करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. काही कळायच्या आता त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
(शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती)
सोनल यांचा मृत्यू निमोनिया आणि फुफुसाच्या आजाराने झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. फुफ्फुसाचा आजार असलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केल्यास असा मृत्यू ओढावू शकतो असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. सोनाली यांच्या मृत्यूमुळे आव्हाड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिकमध्ये तरुणींची मारामारी
दरम्यान, नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील नामांकित कॉलेजमध्ये तरुणींच्या मारामारीची घटना घडला आहे. दुपारच्या सुमारास कॉलेजच्या मैदानावर दोन तरुणींमध्ये कुठल्या तरी कारणावरून बाचाबाची झाली. दोन्ही तरुणींमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. बघता बघता दोघींमध्ये मारामारी सुरू झाली. यावेळी या दोन्ही तरुणींच्या काही मैत्रिणीही घटनास्थळावर हजर होत्या. पण दोन्ही तरुणींमध्ये फ्री स्टाइल हाणामारी सुरू झाली.
दोघींनी एकमेकांना चापटा आणि लाथा मारल्या. त्यानंतर एकमेकांचे केस धरून ओढताण सुरू होती. वाद विकोपाला गेला हे लक्षात आल्यावर त्यांच्या मैत्रिणींनी मध्यस्थी केली आणि दोघींना बाजूंना नेलं. या मुली कोणत्या कारणावरून भांडत होत्या हे मात्र अद्याप समोर येऊ शकले नाही.
(जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा भर बैठकीत ऊर्जा मंत्र्यांवर संताप, नेमकं काय घडलं?)
गमंत म्हणजे, मैदानावर तरुणाचा मोठा घोळका जमा झाला होता. पण, यातून कुणीही या तरुणींची भांडण सोडवण्यासाठी पुढं आलं नाही. तरुण शिट्या आणि टाळ्या वाजत या भांडणाचा आनंद घेत होते. तर काही महाभाग आपल्या मोबाइलमध्ये हे भांडण कैद करत होते.
मुलींची हाणामारी बघण्यासाठी कॉलेज परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. परंतु, या घटनेबद्दल महाविद्यालय प्रशासनाने मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये असलेल्या शिस्ती बाबत आणि बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.