किशोर गोमासे, प्रतिनिधी
वाशिम, 25 फेब्रुवारी : महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यातील देगांव परिसरातील एका आदिवासी शाळेत तब्बल (229) विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. तर 4 कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला आहे.
रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील 4 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या आदिवासी शाळेत एकूण 327 विद्यार्थी संख्या आहे. 5 वी ते 9 वीचे हे सर्व विद्यार्थी आहे.
यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 151, यवतमाळमधील 55, बुलडाणा जिल्ह्यातील 03, हिंगोली जिल्ह्यातील 08 आणि वाशिम जिल्ह्यातील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी 14 फेब्रुवारी रोजी शाळेत दाखल झाले होते. सर्व विद्यार्थ्यांची RTPCR टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे रिपोर्ट आले असता 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
निवासी शाळेमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
'कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके आळीपाळीने 24 तास निवासी शाळेमध्ये तैनात ठेवण्यात आले आहे. या पथकाने ठराविक अंतराने सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी तसंच त्यांना इतर काही लक्षणे असल्यास त्याची तपासणी करून त्यानुसार तातडीने उपचार करावेत. शाळा व्यवस्थापनाने सुद्धा कर्मचाऱ्यांचे एक पथक 24 तास तैनात ठेवावे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर व योग्य आहार मिळेल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी' अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नाही. तसंच या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 24 तास आरोग्य पथके तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अविनाश आहेर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona hotspot, Covid19, Maharashtra, Mumbai, School children, Washim