पुण्यात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 15 ठार, बिल्डर्सविरोधात गुन्हा

पुण्यात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 15 ठार, बिल्डर्सविरोधात गुन्हा

कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

पुणे, 29 जून- कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली अॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. आल्कन स्टायलस सोसायटीच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यावर रात्री दोनच्या सुमारास आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असल्याने खालच्या बाजूला असलेल्या कामगारांच्या खोल्यांवर पडली. त्याखाली दबून 15 कामगारांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 महिला आणि 2 मुलांसह 15 जणांचा समावेश आहे. सगळे गाढ झोपेत असताना शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. सर्व मृत बिहार राज्यातील कटिहार येथील रहिवासी होते.

बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल..

या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. या प्रकरणी अॅल्कॉन लॅंडमार्कस रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर जगदिशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-64), सचिन जगदिशप्रसाद अगरवाल (वय-34), राजेश जगदिशप्रसाद अगरवाल (वय-27), विवेक सुनील अगरवाल (वय- 21), विपुल सुनील अगरवाल (वय- 21) तसेच कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रक्टर विरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संरक्षक भिंत कमकुवत, बेकायदेशीर होती. मजुरांच्या सुरक्षित निवाऱ्याची काळजी न घेणारे बिल्डर आणि निष्क्रिय पालिका अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

बिल्डरने स्विकारली मृतांच्या कुटुंबियांची जबाबदारी..

बिल्डर जगदिशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय-64) यांनी पुण्यातील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्विकारली आहे.

बिहारमध्ये पडसाद...

पुण्यातील या घटनेचन बिहारमध्ये पडसाद उमटले आहे. कटिहारमधील बलरामपूर पोलिस ठाणे क्षेत्रातील बघार गावांतील हे सर्व कामगार होते. बघार गावावर शोककळा पसरली आहे. कटिहारचे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बघार गावात अधिकाऱ्यांना पाठवले आहे. दरम्यान, हे कामगार जरी बाहेरच्या राज्यातील असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावी विमानाने पाठवले जातील, असेही राज्य सरकारने सांगितले आहे.

NDRF कडून मदत जाहीर

घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना NDRF कडून 4 लाखांची मदत जाहीर केली आहे.

कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

मृतांची नावे

1) आलोक शर्मा -28 वर्षे

2) मोहन शर्मा -20 वर्षे

3) अजय शर्मा -19 वर्षे

4) अभंग शर्मा -19 वर्षे

5) रवी शर्मा -19 वर्षे

6) लक्ष्मीकांत सहानी -33 वर्षे

7) अवधेत सिंह -32 वर्षे

8) सुनील सींग -35वर्षे

9) ओवी दास -6 वर्षे

10) सोनाली दास -2 वर्षे

11) विमा दास -28 वर्षे

12) संगीता देवी -26 वर्षे

जखमी-

1) पूजा देवी -28 वर्षे

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली, इतर 18 बातम्या

Tags:
First Published: Jun 29, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading