आई-वडील गेले होते लग्नाला, घरी मुलीने कीटनाशक केले प्राशन

आई-वडील गेले होते लग्नाला, घरी मुलीने कीटनाशक केले प्राशन

यामिनी दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी करण्याचे तिचे स्वप्न होते

  • Share this:

जळगाव,1 डिसेंबर:दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीने कीटनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. यामिनी प्रमोद पाटील (वय-17) असे मृत मुलीचे नाव आहे. भादली (जि.जळगाव) येथे ही घटना घडली आहे.

यामिनी ही बेंडाले कॉलेजची 12 वीची (कॉमर्स) विद्यार्थिनी होती. उच्चशिक्षण घेऊन नोकरी करण्याची यामिनीची इच्छा होती. परंतु तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, यामिनी आई, वडील आणि धाकटा भाऊ योगेशसोबत राहत होती. यामिनी दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरी करण्याचे तिचे स्वप्न होते. त्यामुळे यामिनी कायम त्याच विचारात राहत होती, असे नातेवाईकांनी सांगितले. परंतु, दुष्काळामुळे तिच्या वडिलांचे शेतीत मोठे नुकसान झाले होते. यामिनीच्या पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. यामिनीच्या वडिलांकडे केवळ एक एकर जमीन आहे. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

आई-वडील गेले होते लग्नाला..

यामिनीचे आई-वडील शनिवारी सकाळी भुसावळ येथे एका विवाह समारंभाला गेले होते. छोटा भाऊ शाळेत गेला होता. यामिनी घरी एकटीच होती. हीच संधी साधून यामिनीने सकाळी 11 वाजेच्या सुमारास कीटनाशक प्राशन करून आत्महत्या केली. दुपारी अडीच वाजता आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना यामिनी अत्यावस्थ अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे भादलीत शोककळा पसरली आहे.

First published: December 1, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading