नंदुरबारात कुपोषणाच्या राक्षसाची भूक वाढली; महिनाभरात 118 बालकांचा बळी
नंदुरबारात कुपोषणाच्या राक्षसाची भूक वाढली; महिनाभरात 118 बालकांचा बळी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात तब्बल 118 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची (118 children died In Nandurbar due to malnutrition) आकडेवारी समोर आली आहे.
नंदुरबार, 21 ऑक्टोबर: महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित बालकं नंदुरबार जिल्ह्यात आढळतात, त्यामुळे या जिल्ह्याकडे प्रशासनाचं विशेष लक्ष असतं. असं असताना देखील नंदुरबार जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात तब्बल 118 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची (118 children died In Nandurbar due to malnutrition) आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नंदुरबारमधील कुपोषणाचा मृत्यूदर राज्याच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा दुप्पट असल्याने चिंतेचा विषय ठरत आहे.
सप्टेंबर महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील 12 बालविकास प्रकल्पांतर्गत एकूण 2 हजार 992 बालकांचा जन्म झाला आहे. तर शून्य ते सहा वर्षे वयोगटातील तब्बल 118 बालकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एका महिन्यात 118 बालकं कुपोषणामुळे मृत झाल्याने प्रशासनाच्या विविध योजना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या गावात मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका कामावर आली नाही. तसेच येथून पोषण आहार देखील वितरीत झाला नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा-कल्याणच्या कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; 20 कैदी आढळले संक्रमित
मृत पावलेल्या 118 बालकांमध्ये शून्य ते 28 दिवसांचे 37, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील 38, एक वर्ष ते पाच वर्षे वयोगटातील 20 आणि उपजत 23 बालकांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात नंदुरबारमध्ये सहा मातांचा देखील मृत्यू झाला आहे. राज्यात शून्य ते सहा वयोगटातील दर हजार बालकांमध्ये 21 बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे होतो. या आकडेवारीच्या तुलनेच नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी मृत्यूदर दुप्पट आहे.
हेही वाचा-या देशात पुन्हा सुरू झाला Coronaचा हाहाकार; दररोज 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू
मृत झालेल्या बालकांमध्ये नवापूर बालविकास प्रकल्पाअंतर्गत सर्वाधिक 22 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ तोरळमळ आणि अक्ककुवा बालविकास प्रकल्पात अनुक्रमे 16 आणि 15 बालकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अक्कलकुवा येथील भगदरी हे गाव राज्यपालांनी दत्तक घेतलं आहे. या गावातील अंगणवाडी सेविका गेल्या चार महिन्यांपासून आल्या नाहीत. तसेच गावातील बालकांना पोषण आहारही वितरित झाला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.