तिवरे धरण फुटलं.. 12 मृतदेह शोधण्यात यश, 12 अद्याप बेपत्ता

तिवरे धरण फुटलं.. 12 मृतदेह शोधण्यात यश, 12 अद्याप बेपत्ता

मृतांच्या नातेवाईकांना चार महिन्यांत पक्की घरे बांधून देणार असल्याची घोषणा देखील महाजन यांनी या वेळी केली. तोपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था शासन करणार असल्याचे महाजन यांनी माहिती दिली.

  • Share this:

रत्नागिरी, 03 जुलै- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत 24 बेपत्ता नागरिकांपैकी 12 जणांचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवानांना यश आले आहे. बाळकृष्ण चव्हाण (55 वर्षे) हे मदत पथकाला धरण क्षेत्रापासून 2 किलोमिटर अंतरावर जिवंत आढळून आले. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तिवरे धरण मंगळवारी रात्री 8 ते 9 च्या सुमारास फुटले. धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंडेवाडी वाहून गेली. बचाव पथकाला आतापर्यंत 11 मृतदेह शोधण्यात यश आले असून अद्याप 12 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. नदीच्या काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूनसह परिसरातील जोरदार पाऊस सुरू आहे. धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी (तिवरे गाव) या गावावर आस्मानी संकट कोसळले आहे. गावातील अद्याप 12 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर इतर गावांनाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना चार महिन्यांत पक्की घरे..

रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात हे गाव आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे मध्यरात्री 2 वाजता घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्य सुरु केले. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची या घटनेची दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना चार महिन्यांत पक्की घरे बांधून देणार असल्याची घोषणा देखील महाजन यांनी या वेळी केली. तोपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था शासन करणार असल्याचे महाजन यांनी माहिती दिली. तत्पूर्वी, गिरीश महाजन आणि रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी चिपळूण येथील कामथे रुग्णालयात जाऊन मृतदेहांची पाहणी केली. त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

तिवरे धरणप्रकरणी मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

दरम्यान, तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरु असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर अस्मानी संकट

First published: July 3, 2019, 7:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading