अमेरिकेसह जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

अमेरिकेसह जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

  • Share this:

modi obama17 मे : लोकसभा निवडणुकांचे निकाल जसजसे जाहीर झाले तसतसे वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांचे नरेंद्र मोदींना फोनही येत होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री नरेंद्र मोदींचं फोनवरून अभिनंदन केलं. या निर्णायक विजयाबद्दल ओबामांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. सोबतच अमेरिकेला यायचं निमंत्रण मोदींना दिलं आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातले द्विपक्षीय संबंध मोदींच्या कारकीर्दीत सुधारतील अशी आशा ओबामांनी व्यक्त केली आहे. 2002च्या गुजरात दंगलींची पार्श्वभूमी लक्षात घेत 2005मध्ये अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता. आता मात्र नरेंद्र मोदींना अमेरिकेकडून सर्व राष्ट्रप्रमुखांना देण्यात येणारा A-1 व्हिसा मिळणार आहे.

मी भारताच्या जनतेचं अभिनंदन करतो. भारतातली निवडणूक ऐतिहासिक होती, ज्यामध्ये मानवी इतिहासात सर्वात जास्त लोकांनी मतदान केलं. या ऐतिहासिक निवडणुकीत बहुमत मिळाल्याबद्दल आम्ही नरेंद्र मोदी आणि भाजपचं अभिनंदन करतो. सरकार बनल्यावर आम्ही पंतप्रधान आणि कॅबिनेटबरोबर जवळून काम करू अशी आम्ही अपेक्षा करतो. यामुळे दोन्ही देशांचं लोकशाहीच्या तत्वांवर आधारलेलं नातं अजून घट्ट होईल, असं ओबामा म्हणाले.

त्याशिवाय, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय. त्यांनी मोदींना पाकिस्तान भेटीचं निमंत्रणही दिलंय. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजापक्षेंनी मोदींशी बोलताना दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनीही मोदींबरोबरच्या संभाषणात भारत-इस्रायल संबंध दृढ व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबट यांनी मोदींचं अभिनंदन करताना आगामी G-20 परिषदेत दोघांची भेट होईल अशी आशा व्यक्त केली.तर ब्रिटिश पंतप्रधान डेविड कॅमेरॉन यांनी मोदींना इंग्लंड भेटीचं निमंत्रण दिलं. तसंच ब्राझीलमध्ये होणार्‍या 'ब्रिक्स' परिषदेआधी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

First published: May 17, 2014, 9:51 AM IST

ताज्या बातम्या