दिग्गज नेते जमिनीवर, 'ज्युनिअर' दिल्लीकडे रवाना !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2014 10:45 PM IST

दिग्गज नेते जमिनीवर, 'ज्युनिअर' दिल्लीकडे रवाना !

89shinde_patel_bhujbal

16 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा राज्यातल्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार आहे. इतर राज्यांसारखेच महाराष्ट्रातही भाजप-सेना आघाडीला जनतेने भक्कम पाठिंबा दिल्याने महायुतीचा गड आणखी भक्कम झाला. या पराभवाची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वीकारलीय. त्यांनी नरेंद्र मोदींना फोन करून विजयाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. नारायण राणे आणि नितीन राऊत यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा पाठवलाय.

सर्व अंदाज खोटे ठरवत महाराष्ट्रात जनतेनं युतीच्या पदरात जागांचं भरघोस दान घातलं, आणिबाणीनंतरच्या काळातही राज्यात काँग्रेसचा एवढा दारूण पराभव झाला नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त करत, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण या सर्वच विभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारींनी लक्षवेधी यश मिळवलं.

लोकसभेच्या रिंगणात महाराष्ट्रातून उतरलेले सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, संजय देवतळे, सुरेश धस हे सर्वच मंत्री पराभूत झाले.

नांदेड मधून मोठ्या प्रयत्नानंतर जागा खेचून आणणार्‍या अशोक चव्हाण यांच्यामुळे आणि हिंगोलीत काठावर निवडून आलेल्या राजीव सातव यांच्यामुळे काँग्रेसची लाज वाचली. तर फक्त 4 जागा मिळवून राष्ट्रवादीनं आपलं अस्तित्व असल्याचं दाखवून दिलं.

Loading...

सात उमेदवार उभे करून मोदींना पाठिंबा देणार्‍या मनसेकडे लोकांनी पाठ फिरवली. प्रत्येक वेळी केवळ करिष्म्यावर निवडून जिंकता येत नसते हे दाखवून दिलं. महायुतीच्या या झंझावताने आता महाराष्ट्राचा राजकीय चेहेरा बदलणार आहे. मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत नारायण राणे यांनी तर नागपूरच्या काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे

आपला राजीनामा सादर केला. तर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे राजीनामा देण्याची इच्चा व्यक्त केल्याचं बोललं जातंय.

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा काँग्रेसचा हा सर्वात दारूण पराभव असल्याने पुढच्या काही वर्षांमध्ये याचे पडसाद राज्याच्या राज्याच्या राजकारणात उमटणार आहेत.

दिग्गज पराभूत

  • सुशीलकुमार शिंदे
  • मिलिंद देवरा
  • प्रफुल्ल पटेल
  • छगन भुजबळ
  • सुनील तटकरे
  • संजय देवतळे
  • सुरेश धस
  • निलेश राणे

राष्ट्रवादीला धक्के पे धक्का;भुजबळ, तटकरे आणि पटेल पराभूत

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर त्यांच्या पाठोपाठ वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचाही पराभव झाला. नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी 1 लाख 85 हजार मतांनी भुजबळांचा पराभव केला आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फैरीपासून भुजबळ पिछाडीवर होते. हेमंत गोडसे यांनी बाजी मारत 4,94,735 मत मिळवत विजय मिळवला. तर भुजबळ यांना 3,07,399 इतकीच मत मिळाली. नाशिकमध्ये भुजबळ यांचा विजय निश्चित मानला जात होता पण अचानक झालेल्या पराभवामुळे राष्ट्रवादीला चांगलाच हादरा बसला.

 

मात्र उमेदवारीच्या वेळी भुजबळ यांनी निवडणूक लढवण्यास नाही असा सूर लगावला होता. एवढेच नाही तर भुजबळ यांच्या समर्थकांनीही भुजबळांना दिल्लीला पाठवू नका यासाठी आंदोलनंही केलं होतं. तर दुसरीकडे नाशिकमध्ये मनसेला चांगला फटका बसलाय. मनसेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार तिसर्‍या नंबरवर फेकले गेले. प्रदीप पवार यांना 63050 मत मिळाली.

 

तर भंडारा – गोंदिया मतदारसंघात भाजपचे उमेदवार नाना पटोले 1,49,000 मतांनी विजयी झाले. पटोले यांनी राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. या निकालाची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. तर रायगडमध्ये शिवसेनेचे अनंत गीते यांचा निसटता विजय झालाय. गीते 2110 मतांनी विजयी झाले. त्यांनी सुनील तटकरेंचा पराभव केला.

'गड'करी जिंकले, शिंदे होमग्राऊंडवर 'आऊट'

नागपूर विभागात भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेलांचा पराभव धक्कादायक आहे. भाजपच्या नाना पटोलेंनी त्यांना पराभूत केलं. रामटेकमध्ये मुकुल वासनिक विद्यमान आमदार आहेत. त्यांचा पराभव शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी केला. तर दत्ता मेघेंची ताकद पाठीशी असतानाही वर्ध्यातून सागर मेघे यांचा पराभव झाला. या मतदारसंघातून रामदास तडस जिंकले आहेत. नागपूर मतदारसंघात विलास मुत्तेमवार विद्यमान खासदार होते. त्यांचा पराभव नितीन गडकरींनी केला. या दोघांमध्ये चुरशीची लढत होती. पण इथं गडकरींना गड जिंकला आहे. यवतमाळ-वाशिममध्येही सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघेंना शिवसेनेच्या भावना गवळी यांनी पराभूत केलंय. एकूणच नागपूर विभागाचा निकाल हा धक्कादायक लागला. तर मराठवाडा विभागात उस्मानाबाद मतदारसंघाचा निकालही धक्कादायक होता. डॉ पद्मसिंह पाटील यांना पराभवाचा सामना करायला लागलाय त्यांना शिवसेनेच्या रवी गायकवाड यांनी हरवलंय. तर सोलापूर मतदारसंघातला पराभवही धक्कादायक आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपच्या शरद बनसोडे यांनी पराभव केलाय.

मुंडेंनी गड राखला

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपला गड कायम राखत 1,17,000 मतांनी विजय मिळवला. त्याच्याविरोधात राष्ट्रवादीने सुरेश धस यांना रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे मुंडेंच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांनी बीडमध्ये तळ ठोकून होते. एवढेच नाहीतर मुंडे हे ओबीसी समाजाचे त्यांच्याविरोधात ओबीसी विरुद्ध मराठा असा डावही खेळण्यात आला पण मुंडेंनी यावर मात करून विजय मिळवला.

शाब्बास सुनबाई, रक्षा खडसे विजयी

तर रावेरमधून भाजपचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे तब्बल 3 लाख 63 हजार 68 मतांनी विजयी मिळवला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने मनीष जैन यांना मैदानात उतरवले होते. पण खान्देशच्या या लढाईत घड्याळ बंद पडले आणि रक्षा खडसे यांचा अपेक्षित विजय झाला. रक्षा खडसे यांनी विजयाचं श्रेय जनतेला दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2014 10:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...