मोदींची त्सुनामी, मुंबईत महायुतीचा विजयी 'षटकार'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2014 09:30 PM IST

78 mahayuti and sa16 मे : लोकसभा निवडणुकीचा अभुतपूर्व निकाल हाती येण्यास सुरुवात झालीय. देशभरात मोदी त्सुनामीच्या तडाख्याने काँग्रेस वाहून गेलीय. एनडीएने बहुमताचा आकडा पार करून स्वबळावर सरकार स्थापन करणार आहे. तर मुंबईसह राज्यातही मोदीची लाटेवर महायुती स्वार झालीय. राज्यात 48 जागांपैकी 42 जागा महायुतीने पटकावल्या आहे. भाजपने 23, शिवसेनेनं 18 जागा मिळवल्या आहे. तर महायुतीच्या तुलनेत राष्ट्रवादीने 4 तर काँग्रेसने फक्त दोनच जागा पटकावल्या आहेत. महायुतीची घोडदौड मुंबईतही राहिली.

मुंबईतील सहाही जागा महायुतीने पटकावल्या आहेत. दक्षिण मुंबईतले विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंतांनी त्यांना हरवलंय. या पराभवानंतर जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करू,अशी प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिलीय. तर उत्तर-मध्य मुंबईतून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा धक्कादायक पराभव झालाय. भाजपच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला आहे. उत्तर-पश्चिम मुंबईतून काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांना शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकरांनी हरवलंय.

विद्यमान खासदार गुरुदास कामतांचा पराभवही अनपेक्षित मानला जात आहे. उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार संजय निरुपम यांचाही भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींनी पराभव केलाय. ठाण्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना शिवसेनेच्या राजन विचारे यांनी पराभवाचा धक्का दिलाय. कल्याणमधूनही शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ.श्रीकांत शिंदे यांचा विजय झालाय. शिवसेनेतून बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर ईशान्य मुंबई मतदार संघातल्या 'आप' च्या उमेदवार मेधा पाटकर यांनीही पराभव मान्य केलाय. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आमचा पक्ष कमी पडला अशी कबुलीही त्यांनी दिली. पण या निवडणुकीत आम आदमी पार्टी एक समर्थ पर्याय म्हणून पुढे आलाय असंही त्यांनी म्हटलं.

महायुतीचे विजयी उमेदवार

    Loading...

  • - दक्षिण मुंबई - अरविंद सावंत - 3,74,609

  • - दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे - 3,80,747
  • - उत्तर पूर्व मुंबई - किरीट सोमय्या - 1,28,561

  • - उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन - 4,78,539

  • - उत्तर पश्चिम मुंबई - गजानन किर्तीकर - 4,64,820

  • - उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी - 6,64,004

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2014 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...