S M L

मतदान यंत्रात घोळ, याद्यात नावंही गायब !

Sachin Salve | Updated On: Apr 18, 2014 01:11 AM IST

मतदान यंत्रात घोळ, याद्यात नावंही गायब !

17 एप्रिल : 'मतदान करा, आपला हक्क बजावा' असं आवाहन सगळीकडून केलं जातंय पण आज ऐन मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारराजाच्या हाती घोर निराशा आली. पुणे, सिंधुदुर्ग, सांगलीमध्ये मतदान यंत्रणात घोळ, मतदार यादीत नाव गायब असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे मतदारराजा आपल्या हक्काला तर मुकालाच पण मतदान न करता आल्यामुळे संताप व्यक्त केला.

पुण्यात यंत्रणात घोळ, यादीतून नावं गायब

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आज सकाळी मतदान यंत्रणेत मोठा घोळ समोर आला. भाजपला मतदान करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबल्यावर काँग्रेसला मत जात असल्याचं समोर आलंय. पुण्यातील शामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे 23 जणांनी मतदानही केलं होतं. यामुळे काही काळ एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलं होतं. त्यानंतर मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.


एवढेच नाही तर पुण्यात मतदार यादीत घोळ समोर आलाय. शंभर मतदारांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर नागरिकांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. या निवडणुकीत काहीही करू शकत नाही, पुढच्या निवडणुकीत बघू असं थातुरमातूर उत्तर दिलं. यावेळी मतदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. पण ज्यांची नावे मतदार यांद्यांमध्ये आहेत त्यांनाच मतदान करता येणार आहे. लोकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात त्याची दखल घेतली जाईल. पुर्ननोंदणी करतेवेळी त्यांचा यादीत समावेश होईल. पण आता मतदान करता येणार नाही अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली. एवढंच नाहीतर ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, संध्या गोखले आणि सलील कुलकर्णी यांचीही नावं गायब असल्याचं समोरं आलं.

सिंधुदुर्गात धनुष्यबाणाचं मत काँग्रेसला

सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राडा चांगलाच गाजला. आज सिंधुदुर्गात मतदान होत आहे पण याचे पडसाद मतदानावर उमटले की काय अशी शंका उपस्थिती झालीय. सिंधुदुर्गात मतदान यंत्रात बिघाडाचा अजब प्रकार उघड झाला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात पडवे माजगाव या मतदान केंद्रात शिवसेनेचं चिन्हं धनुष्याबाणासमोरचं बटण दाबलं तरीही ते मत काँंग्रेसला जातंय. त्यामुळे संतप्त मतदारांनी मतदान केंद्र तीन तास बंद पाडलं होतं. या गोंधळानंतर मतदान यंत्र सील करण्यात आलंय. पण, या प्रकारामुळे 63 मतदारांना मतदान करता आलेलं नाही. या 63 मतांसाठी निवडणूक आयोगाकडेचं मार्गदर्शन घेतलं जाईल, असं बूथ अधिकार्‍यांनी सांगितलंय.

Loading...
Loading...

सांगलीत अचानक शंभर नावं गायब

सांगलीत मतदान उत्साहात सुरू असले तरी मतदारयादीत घोळ आणि काही अप्रिय घटनाही घडल्यात. गावभाग परिसरातील 100 लोकांची नावं अचानकपणे मतदार यादीतून गायब झाली आहे. ओळखपत्रं असूनही मतदान न करता आल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे शेटफळ गावात स्वाभिमानीेच्या तालुका अध्यक्षाला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केलीये. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड यांना राष्ट्रवादी कार्यकर्ता सोमनाथ गायकवाडनं मारहाण केली. दरम्यान, मतदारयादीत नाव नसल्यानं लोकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केलीये. सांगलीत एकूण 16 लाख 47 हजार मतदार मतदानाचा अधिकार बजावत आहेत. मतदारसंघात 1275 मतदानकेंद्र आहेत.

शिर्डीत सेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीनं मतदानाला सुरुवात झालीय. लोणीतल्या मतदान केंद्रावर शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र नेर्लेकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मतदान केंद्रावर मतदान चिन्ह लाऊन फिरत असल्यामुळे या वादाला सुरुवात झाली. पोलीस अधिकार्‍यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असा आरोप नेर्लेकरांनी केलाय. तर शिवसेना बाहेरचे गुंड आणून दादागिरी करत असल्याचा विखेंच म्हणणं आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2014 04:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close