विदर्भाच्या आखाड्यातील बिग फाईटस् !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2014 12:25 PM IST

विदर्भाच्या आखाड्यातील बिग फाईटस् !

867_vidarbha_fits10 एप्रिल : महाराष्ट्रासह देशातल्या एकूण 11 राज्यांत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 जागांसाठी मतदान सुरू झालंय. महाराष्ट्राबाहेर एकूण 81 जागांवर हे मतदान होतं. महाराष्ट्रात विदर्भापासून मतदानाला सुरुवात झालीय.

नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या दहा मतदारसंघांसाठी 201 उमेदवार रिंगणात आहेत. नितीन गडकरी, अंजली दमानिया, विलास मुत्तेमवार, हंसराज अहिर, प्रफुल्ल पटेल, आनंदराव आडसूळ, मुकुल वासनिक, भावना गवळी, वामनराव चटप, यांसारखे नेते नशीब आजमावत आहेत.

 प्रमुख उमेदवार -

 • नागपूर - विलास मुत्तेमवार, नितीन गडकरी, अंजली दमानिया
 • Loading...

 • रामटेक - मुकुल वासनिक, कृपाल तुमाने
 • गोंदिया- प्रफुल्ल पटेल, नाना पटोले
 • वर्धा - सागर मेघे, रामदास तडस
 • चंद्रपूर - हंसराज अहिर, संजय देवतळे, वामनराव चटप
 • गडचिरोली - अशोक नेते, नामदेव उसेंडी
 • यवतमाळ-वाशिम - भावना गवळी, शिवाजीराव मोघे
 • अमरावती- आनंद अडसूळ, नवनीत राणा आणि गुणवंत देवपारे
 • बुलडाणा - प्रतापराव जाधव, कृष्णराव इंगळे, बाळासाहेब दराडे
 • अकोला - संजय धोत्रे, प्रकाश आंबेडकर, हिदायत पटेल

नागपूर - विलास मुत्तेमवार, नितीन गडकरी, अंजली दमानिया

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळे नागपूरची लढत प्रतिष्ठेची बनलीय. आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी गडकरींचा खरा सामना असेल तो काँग्रेसचे सलग चार टर्म खासदार असलेले विलास मुत्तेमवार यांच्याशी. भाजपची मजबूत पक्षसंघटना असली तरीही गडकरींसाठी विजयाचा मार्ग सोपा नाही. 27 टक्के दलित मतं आणि 11 टक्के मुस्लीम मतं अशी एकूण 38 टक्के मतं नागपूरमध्ये निर्णायक ठरणार आहे. त्यामुळेच विलास मुत्तेमवार यांनी पदयात्रा काढून घरोघरी पोचण्याचा प्रयत्न चालवलाय. तर नितीन गडकरींनी विकासाचा अजेंडा घेऊन रोड शो करण्यावर भर दिलाय.

गोंदिया- प्रफुल्ल पटेल, नाना पटोले

राज्यातल्या अतिपूर्वेकडचा हा मतदारसंघ..पण, या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल निवडणूक लढवताहेत. त्यांचा थेट सामना आहे तो भाजपचे नाना पटोले यांच्याशी ही लढत जरी तुल्यबळ वाटत असली तरी विकासकामांच्या जोरावर प्रफुल्ल पटेल यांचं पारडं जड मानलं जातंय. पण, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तेली-कुणबी मतांची मोट बांधून बाजी उलटवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होतोय.

रामटेक - मुकुल वासनिक, कृपाल तुमाने

रामटेक या राखीव मतदारसंघात तिरंगी लढत होतेय. तिरंगी लढत होत असली तरी खरी लढत ही काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे कृपाल तुमाणे यांच्यात होतेय. विद्यमान खासदार म्हणून मुकुल वासनिक यांची कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरी आघाडी प्रचार यंत्रणा त्यांच्या कामात आलीय. तर दुसरीकडे कृपाल तुमाणे यांना रसद पुरवण्यात शिवसेना कमी पडल्याचं स्पष्ट जाणवतंय. या मतदारसंघात उमेदवारांची भिस्त कुणबी मतांबरोबरच दलित मतांवरसुद्धा आहे. त्यामुळेच तिसरे उमेदवार बसपाच्या किरण पाटणकर यांना किती मतं जातात, यावर इथल्या लढतीचं भवितव्य अवलंबून आहे.

अमरावती- आनंद अडसूळ, नवनीत राणा आणि गुणवंत देवपारे

शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ विरुद्ध राष्ट्रवादीच्या नवनीत राणा विरुद्ध बसपाचे गुणवंत देवपारेअशी तिरंगी लढत अमरावतीत होत आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक बंडखोर नेते संजय खोडके यांनी बसपाच्या उमेदवाराला सक्रीय पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजलीय. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात अजित पवार तर शेवटच्या टप्प्यात खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अमरावतीत ठाण मांडून बसले आहेत. एवढंच नाही तर नवनीत राणा यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी अजित पवारांनी त्यांचे विश्वासू आमदार संदीप बागेरिया यांच्यावर सोपवून 'खोडके इफेक्ट' कमी करण्याचा प्रयत्न केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्येही नाराजी पसरल्यानं अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच स्थानिक सेना नेत्यांची मनधरणी करावी लागली. या मतदारसंघाचं सर्व गणित कुणबीबरोबरच दलित आणि मुस्लीम मतांवरही अवलंबून आहे. त्यामुळेच मतांची रस्सीखेच करण्याचा प्रयत्न आघाडी आणि महायुतीकडून होतोय.

अकोला - संजय धोत्रे, प्रकाश आंबेडकर, हिदायत पटेल

अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल तर भारीप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर अशी लढत होतेय. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यातून सलग दोनवेळा भाजपचे संजय धोत्रे लोकसभेवर निवडून गेले. पण, यंदा संजय धोत्रेंसाठी विजयाचा मार्ग सोपा नाही. कुणबी-पाटील समाजाच्या वादात न अकडता मुख्यमंत्र्यांनी हिदायत पटेल या मुस्लीम उमेदवाराला संधी दिलीय. तर भारिप-बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांची मदार बहुजन मतांवर आहे. त्यामुळे अकोल्यात अटीतटीची तिरंगी लढत पहायला मिळतेय.

बुलडाणा - प्रतापराव जाधव, कृष्णराव इंगळे, बाळासाहेब दराडे

बुलडाणा मतदारसंघात तुल्यबळ लढत पहायला मिळतेय. शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची खरी लढत राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे यांच्याशी होत असली तरी समाजवादी पक्षाचे वसंतराव दांडगे आणि अण्णा हजारेंनी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झालीय. बहुतांशी बहुजन समाजाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात कुणबी-मराठा समाजाचे प्रतापराव जाधव विरुद्ध माळी समाजाचे कृष्णराव इंगळे आणि वंजारी समाजाचे बाळासाहेब दराडे यांच्यामुळे बहुजन समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होणाराय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घालून स्थानिक शिवसैनिकांमधली नाराजी दूर केलीय. तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कुणबी आणि वंजारी मतं महायुतीकडेच वळतील, यासाठी विशेष प्रयत्न चालवलेत. दुसरीकडे रेखाताई खेडेकर यांचा पत्ता कट करून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राजेंद्र शिंगणे यांनी कृष्णराव इंगळेंना उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे माळी मतांबरोबरच मराठा-कुणबी मतं राष्ट्रवादीकडे वळवण्याचा राजेंद्र शिंगणे यांनी चंग बांधलाय. परिणामी ही लढत काट्याची बनलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2014 12:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...