S M L

राष्ट्रवादीला धक्का, विनायक मेटे अखेर महायुतीमध्ये

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2014 06:44 PM IST

राष्ट्रवादीला धक्का, विनायक मेटे अखेर महायुतीमध्ये

mete_in_mahayuti28 मार्च : अखेर हो नाही म्हणत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांना महायुतीत सामील करून घेण्यात आलंय. यामुळे महायुतीला सहावा भिडू मिळालाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसलाय.

'विनायक मेटे महायुतीच्या वाटेवर' असल्याची बातमी सर्वप्रथम आयबीएन लोकमतने दिली होती ती आता खरी ठरलीय. आज (शुक्रवारी) भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि सेनेच्या नेत्यांसह विनायक मेटे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विनायक मेटे महायुतीत सामील झाल्याची घोषणा केली.
राष्ट्रवादी मराठा आरक्षणाला प्राधान्य देत नसल्यानं मेटे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण मेटे यांच्या प्रवेशाला सेनेच्या नेत्यांनी विरोध केला. एवढंच नाही तर गुरूवारी ठरलेली 'मातोश्री'वरची बैठकही रद्द करावी लागली होती. पण आज शुक्रवारी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंच्या मध्यस्थी केली. आणि ती यशस्वी ठरली, मेटे यांच्या प्रवेशाबाबत 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे यांची चर्चा झाली. त्यात शिवसेनेनं मेटेंच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजाबरोबर मराठा समाजाची जोड मिळाली तर सत्तेचं समीकरण मांडता येतं, हा प्रयत्न 1995 मध्ये यशस्वी झाल्यानंतर युतीची सत्ता आली होती. तोच प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून पुन्हा केला जातोय. त्यामुळे मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंना सोबत घेऊन 95चं समीकरण मांडता येऊ शकेल, यासाठी युतीच्या नेत्यांची बैठकीची सूत्र फिरवली. यातच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे गेले काही दिवस विनायक मेटे राष्ट्रवादीमध्ये नाराज होते.

Loading...

एवढंच नाही तर मेटे विरुद्ध छगन भुजबळ असा सामनाही रंगला होता. या प्रकरणी मेटेंना पक्षाने नोटीसही बजावली होती. त्यामुळे आता मेटे आणखी दुखावले गेले. त्यामुळे त्यांनी थेट महायुतीचे दार ठोठावले. आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीमुळे मेटे आता महायुतीचे झाले आहे. मेटे महायुतीत दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीला चांगलाच धक्का मानला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2014 06:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close