मुंडे-गडकरी वादामुळे भाजपमध्ये बंडाळी

मुंडे-गडकरी वादामुळे भाजपमध्ये बंडाळी

  • Share this:

Image img_161152_mundegadkari_240x180.jpg24 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधला नेत्यांचा रुसवा-फुगवा राष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक स्तरापर्यंत सुरूच आहे. मुंडे- गडकरी वादाचे पडसादही जोरदार उमटायला लागले आहेत. लातूर लोकसभेची उमेदवारी सुनील गायकवाड यांच्या रुपाने मुंडे गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे गडकरी गट चांगलाच नाराज झालाय.

गडकरी यांचा सुधाकर भालेराव यांना पाठिंबा होता. पण मुंडेंचा आग्रह सुनील गायकवाड यांच्यासाठी कायम राहिला. शेवटी गायकवाड यांनाच उमेदवारी दिल्याने भालेराव म्हणजेच गडकरी गट चांगलाच नाराज झाला आहे. भालेरावांनी पक्षाच्या विरोधात बंडाचं आव्हान दिलंय.

तर अहमदनगरमध्ये जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट प्रतापराव ढाकणे भाजपला जय श्रीराम करत आहेत. मुंडे ओबीसींचे नेते म्हणवून घेतात, पण स्वत:चाच विकास साधतात, असा आरोप त्यांनी केलाय. शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे उस्मानाबादची जागा शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांना जाहीर झालेली असताना रोहन देशमुखांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतलाय.

शिवाय याचाच परिणाम म्हणून सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवाराला म्हणजेच शरद बनसोडे यांच्याविरुद्ध शिवसेनेनं असहकार पुकारलाय. त्यामुळे महायुतीत सोलापूर आणि उस्मानाबादच्या जागेवरुन पेच निर्माण झालाय. रोहन देशमुख मात्र उमेदवारीवर ठाम आहेत. भाजपाच्या मदतीशिवाय कार्यकर्त्यांच्या बळावर आपण ही निवडणूक लढवणार असा दावा ते करत आहेत. शिवाय मुलाच्या बंडखोरीला मूक संमती देणार्‍या माजी खासदार सुभाष देशमुखांनी गोपीनाथ मुंडेंच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. मुंडे- गडकरी वादातूनच आपलं राजकीय खच्चीकरण केलं जात असल्याचा त्यांचा दावा आहे.

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारात गांधींचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे नगरमधले भाजप कार्यकर्ते मुंडेंवर नाराज आहेत. प्रदेश पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करूनही ही नाराजी दूर न झाल्यानं ढाकणे राष्ट्रवादीमध्ये चालले आहेत. अहमदनगरचे मावळते खासदार दिलीप गांधी यांच्या उमेदवारी ढाकणेंसह युतीच्या आमदारांचा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध होता. तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुभाष देशमुख यांच्या मुलानं अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय.

First published: March 24, 2014, 7:28 PM IST

ताज्या बातम्या