21 मार्च : शिर्डी येथील शिवसेनेचे लोकसभा मतदार संघातील उमेदवार बबन घोलप यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप युती सरकारच्या काळात समाजकल्याण मंत्री असताना त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या होत्या. चर्मकार महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून बनावट कर्जवाटप प्रकरणांचा ठपका त्यांच्यावर होता. १९९९ साली घोलप यांनी त्यांचे उत्पन्न ५० लाख रुपये इतके दाखवले होते, मात्र त्यांचा खर्च ८० लाख रुपये होता. लाच-लुचपत खात्याकडे तशा तक्रारी दाखल होत्या. तत्कालीन अपर पोलिस महासंचालकांमार्फत त्याची चौकशी करण्यात आली होती. घोलप यांची मालमत्ता आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत याचा मेळ बसत नसल्याचं त्या चौकशीत सिद्ध झालं. त्यानुसार घोलप आणि त्यांच्या पत्नी शशिकला यांच्या विरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला होता.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही घोलपांच्या या भ्रष्टाचाराच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यामुळे घोलपांनी अण्णांच्या विरोधातही अब्रुनुकसानीचा दावा दाखल झाला होता. त्यात अण्णांना झालेली शिक्षा पुढे उच्च न्यायालयानं माफ केली होती. दरम्यान, शिर्डी मतदारसंघातून घोलप यांना लोकसभेसाठी शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यावर अण्णांनी थेट उद्धव ठाकरे यांना आवाहन करून घोलपांच्या भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला होता. घोलप हे नाशिकमधल्या देवळाली मतदार संघातले गेल्या 4 वेळा आमदार होते.