नवी दिल्ली, 31 डिसेंबर : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? विविध व्यायाम प्रकार, योगासनं, आहारात बदल आणि आहार नियंत्रण अशा मार्गांनी स्थूलपणा कमी करता येतो. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं केलेल्या प्रयत्नांनी बांधा आकर्षक आणि सुदृढ होण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो. पण, आरोग्यासाठी तेच फायदेशीर आहे. मात्र, एवढे सारे प्रयत्न करण्याचा संयम नसलेले किंवा खूप काही करून थकलो असं म्हणणारे 'बॉ़डी शेप वियर' (Body Shape wear) वापरण्याच्या 'शॉर्ट कट'कडे वळतात. यामुळं सुरुवातीला पटकन सुंदर दिसू लागण्याचा आनंद मिळतो. पण बऱ्याच काळासाठी भोगावे लागणारे (Shape wear side effects) दुष्परिणाम होतात.
पोट, मांड्या आणि नितंबांवर जमा झालेली चरबी कमी करू न शकणारे अनेक जण ते लपवण्याचा प्रयत्न करतात. शरीरावरील चरबी लपवू नका. कारण, या प्रयत्नात लोक कधी इतके घट्ट कपडे घालू लागतात की, चरबी लपवण्याच्या नादात आरोग्यावर अनेक घातक परिणाम होऊ लागतात. 'द हेल्थ साईट' ने या चरबी लपवण्याच्या प्रयत्नांमुळे शरीराला कोणतं नुकसान होतं त्याची माहिती दिलीय.
ब्रिटिश कायरोप्रॅक्टिक असोसिएशन (BCA) च्या सर्वेक्षणात असं समोर आलंय की, अत्यंत घट्ट कपडे परिधान केल्यानं तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसंच यामुळं शरीराची खराब स्थिती, स्नायूंचा ताण आणि इतर अनेक प्रकारच्या तणावाचाही सामना करावा लागतो.
तुम्ही ज्या प्रकारचे कपडे घालता, त्यामध्ये स्वतःला कॅरी करण्यासाठी हळूहळू तुम्हाला त्याप्रमाणे वाकून रहावं, चालावं लागतं किंवा तुम्ही त्याच मुद्रेत बसू-उठू लागता. खूप घट्ट जीन्स, स्कर्ट किंवा घट्ट कपडे परिधान केल्यानं तुम्हाला उठणं-बसणं आणि चालणं कठीण होतंच. परंतु, तुमच्या शरीराच्या आकारावर आणि मुद्रांवर नकारात्मक परिणाम होतो आणि नैसर्गिक संतुलन (Posture) खराब होतं.
स्नायू, सांध्यांवर परिणाम
जास्त वेळ घट्ट कपडे परिधान केल्यानं तुमच्या स्नायू आणि सांध्यांवर दाब पडतो. यासोबतच पाठीचा कणा, पोट आणि पाठीच्या खालच्या बाजूचे स्नायूही कमकुवत होतात. याशिवाय पोट, कंबर आणि पाय दुखू शकतात. खूप घट्ट कपडे परिधान केल्यानं उडी मारण्याची आणि सहज, वेगानं चालण्याची, पळण्याची क्षमतादेखील खराब होऊ शकते.
हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
घट्ट लेगिंग्जचा प्रभाव
हल्ली, मुली खूप घट्ट लेगिंग किंवा हाय वेस्ट जीन्स घालतात. घट्ट जीन्स किंवा लेगिंग्ज मांडीच्या नसा संकुचित करू शकतात; ज्यामुळं मुंग्या येणं, बधीरपणा आणि रॅशेस होऊ शकतात. यासोबतच खूप घट्ट जीन्स, स्कर्ट किंवा घट्ट कपडे घातल्यानं पोटावर दाब पडतो. त्यामुळं अन्ननलिकेत आम्ल तयार होऊ लागतं. यामुळे चिंता, घाबरल्याची भावना निर्माण होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fashion, Health, Health Tips, Lifestyle