मुंबई, 22 जानेवारी : 'चल रे एक चहाचा प्याला घेऊन येऊया...' असं म्हणत मित्रमैत्रिणींसोबत किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही चहा प्यायला जाता आणि येवलेचा चहा पिण्याची संधी तुम्ही काही सोडत नाही. मात्र तुमच्या आवडीच्या येवले अमृततुल्य चहामध्ये भेसळ झाल्याचं उघड झालं आहे. हे समजल्यानंतर तुम्ही आता ताजंतवानं होण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी येवले अमृततुल्य चहा न पिता दुसरा चहा पिण्याचा विचार करत असाल... मात्र थोडं सांभाळून, कारण फक्त भेसळच नव्हे, तर जास्त चहा पिणंही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. चहा पिण्याचे दुष्परिणाम काय आहेत जाणून घेऊयात.
शरीराला आयर्न मिळत नाही
तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल आणि तुम्ही जास्त चहा पित असाल तर ही समस्या अधिक तीव्र होऊ शकते. चहामधील टॅनिनन्स घटकामुळे शरीरातील आयर्नचं शोषण रोखलं जातं.
अपुरी झोप
झोप उडवण्यासाठी आपण चहा पितो हे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे जर तुम्ही जास्त चहा पित असाल, तर तुमची झोप पूर्णच होणार नाही. मेंदूमधील मेलाटोनिन हार्मोनमुळे मेंदूला झोपेचा सिग्नल मिळतो. मात्र चहातील कॅफिनेमुळे मेलाटोनिनची निर्मिती थांबते आणि झोप लागत नाही. झोपेअभावी मानसिक आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
मळमळ
आपल्या दिवसाची सुरुवात होते ती चहानं. घराबाहेर पडण्यास उशीर झाल्यास आपण घाईघाईत फक्त चहा पिऊन निघतो. मात्र उपाशीपोटी तुम्ही जास्तीत जास्त चहा प्यायल्यास तुम्हाला मळमळल्यासारखं वाटू शकतं. चहामधील टॅननिन्स हा घटक पचनप्रणालीतील टिश्यूंवर दुष्परिणाम करतो. ज्यामुळे मळमळ, पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
छातीत जळजळ
चहातील कॅफिनेमुळे पोटातील आम्लाची निर्मिती वाढते. ज्यामुळे असिड रिफ्लेक्सची समस्या उद्भवू शकते. या समस्येमुळे छातीत जळजळ जाणवते.
डोकेदुखी उद्भवू शकते
अनेक जण डोकं दुखल्यानंतर चहा घेतात, ज्यामुळे डोकेदुखी शांत होते. मात्र डोकेदुखी शांत करणारा हाच चहा डोकेदुखी वाढवू शकतो. कॅफिनेच्या जास्त सेवनामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.
सोर्स - हेल्थलाईन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.