मुंबई, 02 डिसेंबर : एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक येणारा सर्वांत मोठा कठीण काळ म्हणजे वैद्यकीय संकट होय. त्यातच एखाद्या आजारावर उपचार महागडे असतील, तर मेडिकल बिल्स भरता भरता माणसाचं कंबरडं मोडतं. विशेषतः या जगात अशी काही औषधं आहेत, ज्यांची किंमत ऐकल्यावर धडधाकट माणसालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हेमजेनिक्स हे अशाच महागड्या औषधांपैकी एक आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मंजुरी दिलेल्या हेमजेनिक्स नावाच्या औषधाचा फक्त एक डोस इतका महाग आहे, की तेवढ्या पैशात अनेक आलिशान बंगले खरेदी करता येऊ शकतात.
जगातलं सर्वांत महाग औषध म्हणून या औषधाने जागतिक विक्रम नोंदवला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 3.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 28 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे औषध हिमोफिलिया या जनुकीय आजारावर उपचारांसाठी वापरलं जातं. सध्या या आजारावर असलेले उपचार महाग आहेत. या औषधाची किंमत त्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे या औषधाची किंमत ऐकल्यावर कोणत्याही व्यक्तीला धक्का बसू शकतो.
हेही वाचा - बॅरिअॅट्रिक सर्जरीनंतर महिलेचा मृत्यू; पण बॅरिअॅट्रिक सर्जरी म्हणजे काय?
या औषधाने कोणत्या रोगावर उपचार केले जातात?
माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, परंतु, जनुकीय विकारांवर उपचार करणं डॉक्टरांसाठी सर्वांत कठीण असल्याचं सिद्ध होतं. हिमोफिलिया हा असाच एक जनुकीय आजार आहे. या रक्त गोठण्याच्या विकारावर उपचार करणं सोपं आणि स्वस्त नाही. या आजारात, शरीरात रक्ताची गुठळी बनवणारी प्रथिनं तयार होण्याची प्रक्रिया थांबते. आतापर्यंत, या आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णाला रूटीन इंजेक्शन देऊन प्रोटीनची कमतरता दूर केली जात असे. परंतु, हेमजेनिक्स नावाच्या औषधाच्या फक्त एका डोसने हा आजार कायमचा बरा होऊ शकतो; मात्र हे औषध खूप महाग आहे.
हे औषध खरेदी करणं सर्वांना शक्य नाही
विज्ञानाच्या या नव्या चमत्कारामुळे गंभीर जनुकीय विकारावर सहज उपचार सापडला असला, तरी हे औषध विकत घेणं सोपी गोष्ट नाही. या औषधाचा एक डोस 28,41,30,000.00 रुपयांना आहे. क्लिनिकल अँड इकॉनॉमिकल रिव्ह्यू नावाच्या स्वयंसेवी संस्थेने यावर भाष्य केलं असून, या औषधाची अचूक किंमत 2.93 दशलक्ष डॉलर म्हणजे 23 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं आहे. सध्याच्या काळात हिमोफिलिया बीचा उपचार स्वस्त नाही, परंतु, हे औषध त्यापेक्षा खूप महाग आहे. त्यामुळे या औषधाचा समावेश जगातल्या सर्वांत महागड्या औषधांमध्ये होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle