मुंबई, 10 सप्टेंबर : बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजेच BPD हा अनेक व्यक्तींमध्ये आढळून येणारा आजार आहे. या आजारामध्ये अनेकदा व्यक्तीचा मूड अचानक बदलतो. त्यांचं वागणं समोरच्याला विचित्र वाटतं. आणि त्याचा नातेसंबंधावर देखील परिणाम होतो. वेळीच हा मानसिक आजार ओळखून उपचार सुरू केले नाहीत, तर व्यक्ती नैराश्यग्रस्त होतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते.
BPD आजारामध्ये व्यक्तीच्या स्वभावात मोठ्या प्रमाणात बदल होतात. या आजारामध्ये व्यक्ती प्रचंड निराशेचा सामना करत असते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडचिड वाढते. लवकर राग येतो आणि मग उदास व्हायला होतं. या काळात व्यक्ती फार रागीट आणि चिंताग्रस्त असते. अशा व्यक्तीला आधाराची मोठ्या प्रमाणात गरज असते. कुटुंबाने समजून घेणं आवश्यक असतं.
या आजाराची चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
या आजाराचा सामना करणारी व्यक्ती प्रचंड निराश आहे, असं वाटतं. स्वतःविषयी आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे त्याची मतं आणि विचार या काळात मोठ्या प्रमाणात बदलतात. त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीकडे एकाच दृष्टिकोनातून या कालावधीत ते पाहात असतात. निराशावादी दृष्टिकोन असतो.
कोणत्याही गोष्टीवरून त्यांचं मन तात्काळ उडतं. एका मतावर किंवा गोष्टीवर ते या काळात ठाम राहू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीला ते एका क्षणात मित्र समजतात तर दुसऱ्या क्षणाला दुश्मन समाजतात. यामुळे त्यांच्या नातेसंबंधांमध्ये देखील मोठा फरक पडतो. भावनिक अस्थिरता, आवेग, हाताबाहेर जाणारं वर्तन आणि अस्थिर नातेसंबंध ही या आजाराची प्रमुख लक्षणे आणि कारणे आहेत. मात्र निदान आणि सांख्यिकीय मॅन्युअल डायग्नोस्टिकच्या फ्रेममधून विचार केल्यास याची आणखी देखील लक्षणं आहेत.
1) मित्र आणि कुटुंबीयांद्वारे त्याच्याकडे दुर्लक्ष
2) अस्थिर नातेसंबंध देखील याचे प्रमुख कारण आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात व्यक्ती निराश होतो. यालाच स्प्लिटिंग असे देखील म्हटले जाते.
3) स्वतःच्या मनात न्यूनगंड निर्माण होणे. यामुळे या सगळ्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि नातेसंबंधांवर देखील पडतो.
4) अतिशय विचित्र वर्तणूक देखील यामध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर कोणत्याही पदार्थाचे चुकीच्या पद्दतीने सेवन देखील याला कारणीभूत आहे.
5) स्वतःला इजा करून घेणे. यामध्ये कापून घेणे, आत्महत्याच्या धमक्या किंवा प्रयत्न
6) खूप कालावधीपर्यंत नैराश्य अथवा आत्मविश्वासाची कमतरता
7) घरात कुणीही नसल्याचा भास किंवा एकटेपण
8) प्रचंड राग आणि त्यानंतर येणारी अपराधीपणाची भावना
या आजाराची कारणं कोणती आहेत
या आजाराची कारणे म्हणजे हा आजार शरीरात घडणाऱ्या फरकांमुळे देखील होऊ शकतो किंवा निसर्गातील बदलांमुळे देखील होऊ शकतो. लहानपणी त्यांना कोणीतरी त्रास दिला असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक छळाला ते लहानपणी सामोरे गेले असतील तर मोठे झाल्यावर या आजाराचा त्यांच्यावर नक्कीच परिणाम होणार.
या आजारावर उपचार काय आहेत
या आजारावर औषधोपचार, मनोचिकित्सा आणि कुटुंबीयांनी काळजी घेतली तर रुग्ण यातून लवकर बाहेर येतो. मात्र अनेकदा या आजारातून बाहेर येण्यासाठी जवळपास 1 वर्षांचा कालावधी देखील लागू शकतो.