नवी दिल्ली, 05 जून: एकविसाव्या शतकातल्या 20 व्या वर्षानी जगाला काय दिलं असं विचारलं तर त्याची अनेक उत्तरं मिळतील. त्याबद्दल मतभिन्नताही असेल पण एका उत्तराबाबत मात्र मतभिन्नता असण्याची शक्यता कमी आहे ते म्हणजे जगण्याचा नवा दृष्टिकोन. कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण जग वेठीला धरलं गेलं अनेकांचे मृत्यूही झाले या गोष्टी आहेतच पण एक नवा दृष्टिकोन मिळाले हेही तितकंच खरं. दैनंदिन जीवनातील पद्धती बदलण्याची गरज आता सगळ्यांना वाटू लागली आहे. तसंच जागतिक पर्यावरणाबद्दलही लोकांची जाणीव प्रगल्भ होत आहे.
बुकिंग डॉट कॉम, या ट्रॅव्हल कंपनीने केलेल्या एका सर्व्हेतून याबद्दलची सत्यस्थिती समोर आली आहे. ही कंपनी गेल्या सहा वर्षांपासून जगभरातील त्यांच्या ग्राहकांना प्रश्न विचारून असा सर्व्हे करून घेते. त्या सर्व्हेचा रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
या वर्षी झालेल्या सर्व्हेतील 88 टक्के सहभागींनी असं उत्तर दिलं की, कोविड महामारीनंतर प्रवास करताना अधिक शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याचा विचार ते करत आहेत. या महामारीमुळे दैनंदिन आयुष्यात शाश्वततेच्या दृष्टिने सकारात्मक बदल करावेत जसं की रिसायकल केलेल्या वस्तू वापरणं (30 टक्के) आणि अन्न कमी वाया घालवणे (33 टक्के) असं या सर्व्हेत सहभागी झालेल्या 1हजारपैकी 56 टक्के भारतीयांनी सांगितलं. बुकिंग डॉट कॉमने स्वतंत्रपणे केलेल्या या सर्व्हेमध्ये जगभरातील 30 देशांतील 29 हजार 349 जण सहभागी झाले होते. फ्री प्रेस जर्नलने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हेही वाचा- 'या' जिल्ह्यात सोमवारपासून अंत्यविधीसाठी कोणतीही बंधनं नाही, वाचा सविस्तर
बुकिंग डॉट कॉमच्या दक्षिण आशिया विभागाच्या रिजनल मॅनेजर रितु मेहरोत्रा म्हणाल्या, ‘आम्ही गेल्या सहा वर्षांपासून हा सर्व्हे करून घेत आहोत. आमचे ग्राहक आणि भागीदार दोघांमध्येही प्रवासाच्या शाश्वत पद्धतींबाबत जागरुकता वाढत आहे याचा आम्हाला आनंद आहे. नव्या शाश्वत पद्धती ओळखून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांना सर्वोतपरी मदत करत आहोत.’
कोविड महामारीनंतर प्रवासाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना भारतीय ग्राहकांपैकी 75 टक्के लोकांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी शाश्वत पद्धती स्वीकारल्या पाहिजेत असं मत व्यक्त केलं आहे. तीन चतुर्थांश ग्राहकांचं मत आहे की, जेव्हा ते प्रवास करतील तेव्हा त्यांना स्थानिक संस्कृती जाणून घ्यायला आवडेल. 91 टक्के लोकांचं मत आहे की, संस्कृती जाणून घेणं आणि वारसा जपणं गरजेचं आहे. 89 टक्के लोकांचं मत आहे की, उद्योगांतून येणारं उत्पन्न समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावं.
हेही वाचा- कसं आहे 'पाच' टप्प्यातील महाराष्ट्र अनलॉकचं वर्गीकरण, वाचा सविस्तर
या सर्व्हेत भाग घेतलेल्या 72 टक्के लोकांचं मत आहे की आता कोविडनंतर प्रवास करताना ते जगप्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याचं टाळणार आहेत जेणेकरून तिथल्या समाजाला गर्दी न झाल्यामुळे सकारात्मक राहण्यास मदत होऊ शकेल. कोविड महामारीनंतर जसं जगातील माणसांचा वैयक्तिक आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे तसंच जागतिक प्रवासाबद्दलचाही दृष्टिकोन बदलला आहे. ते अधिक शाश्वततेच्या दिशेने आणि पृथ्वी संरक्षणाच्या दिशेने विचार करू लागले आहेत असंच या सर्व्हेतून स्पष्ट होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Environment