बोंडी (ऑस्ट्रेलिया), 31 डिसेंबर : ख्रिसमसपासून नव्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंतचा (New Year celebration) कालावधी म्हणजे पर्यटकांसाठी जणू सुगीचा काळ असतो. या कालावधीत जगभरातले पर्यटक जगभरातल्या निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देत असतात. त्यात या वर्षी कोरोनानंतर काही दिवसांपूर्वीच जगातले व्यवहार हळूहळू पूर्ववत होऊ लागल्याने पर्यटनस्थळावरच्या व्यावसायिकांकडून पर्यटकांचं जोरदार स्वागत होत आहे. अर्थात, त्या त्या ठिकाणचे वेशाबद्दलचे किंवा अन्य नियम (Dress Code) पाळले गेले नाहीत, तर पर्यटनाचा मूड खराब होऊ शकतो. याचा अनुभव ऑस्ट्रेलियात (Australia) मित्राबरोबर फिरायला गेलेल्या इटलीतल्या (Italy) एका तरुणीला नुकताच आला. तिने परिधान केलेला ड्रेस त्या ठिकाणच्या नियमाला अनुसरून नसल्याचं सांगून त्या दोघांना रेस्तराँमधून चक्क हाकलून देण्यात आलं. ऑस्ट्रेलियातल्या बोंडी बीचवरच्या नॉर्थ बाँडी फिश नावाच्या रेस्तराँमध्ये ही घटना घडली. मार्टिना कोराडी (Martina Corradi) असं या तरुणीचं नाव असून, क्रॉप टॉप (Crop Top) आणि ट्राउझर्स (trousers) घालून ती रेस्तराँमध्ये गेली होती. तिच्या मते, हा अयोग्य वेश नव्हता. तरीही रेस्तराँने असं करणं खरंच योग्य आहे का, असा सवाल फेसबुक पोस्ट लिहून तिने विचारला. सोशल मीडियावर त्यावरून कल्लोळ उठला. त्यानंतर रेस्टॉरंटने तिची माफी मागून तिला गिफ्टही पाठवल्याचं वृत्त ब्रिटनमधील 'मिरर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, संबंधित रेस्तराँच्या मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यांकडून काही गैरसमज झाल्यामुळे अशी चूक झाली असावी, असं सांगून या जोडीला मोफत जेवणासाठी आमंत्रण दिलं आहे.
मार्टिनाने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत नॉर्थ बाँडी फिश (North Bondi Fish) या रेस्तराँमध्ये गेली होती. त्या वेळी तिने ग्रे क्रॉप टॉप आणि व्हाइट ट्राउझर्स असा वेश परिधान केला होता. ती टेरेसवर जाऊन बसल्यानंतर तिथली वेट्रेस (Waitress) तिच्याजवळ आली आणि तिचा वेश तिथल्या ठिकाणासाठी योग्य नसल्याचं वेट्रेसने तिला सांगितलं. त्यावर ती काही प्रतिक्रिया व्यक्त करणार तोच वेट्रेसने मॅनेजरला बोलावलं. तिने रेस्तराँमध्ये जाताना कसे कपडे घालायला हवेत, याबद्दल त्याने सर्वांसमोर तिला सांगावं, असं वेट्रेसने मॅनेजरला सांगितलं.
'मला या प्रसंगामुळे खूपच अपमानास्पद वाटलं. हे रेस्तराँ बीचशेजारी आहे. त्यामुळे माझ्या वेशाबद्दल मला अन्य लोकांचं मत हवं आहे. शिवाय, सध्या कोविड काळ चालू आहे. रेस्तराँ रिकामी आहेत. अशा वेळी अशा फालतू कारणावरून तुम्ही कोणाला बाहेर कसं काढून टाकू शकता,' असा सवाल तिने विचारला आहे.
तिच्या फेसबुक पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही तिच्या बाजूने आहेत, तर काही विरोधात आहेत.
एकाने लिहिलं आहे, की 'तुझा ड्रेस ऑफिससाठी योग्य नाही; मात्र बीचशेजारच्या रेस्तराँसाठी अयोग्य नाही.'
दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, की 'असं घडणं अत्यंत चुकीचं आहे. तू सुंदर दिसतेस.'
एकाने मात्र मार्टिनाचा ड्रेस काही रेस्तराँच्या ड्रेसकोडमध्ये बसण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आणखी एकाने अशी प्रतिक्रिया दिली आहे, की तिचा क्रॉप टॉप असा आहे, की तिने केवळ (Lingerie) अंतर्वस्त्रच (Bra) परिधान केल्यासारखे दिसत आहे. तिच्या छातीचा काही भाग (Midriff) फोटोत दिसतो आहे. काही रेस्तराँमध्ये अशा प्रकारचा वेश चालत नाही.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर नॉर्थ बाँडी फिश या रेस्तराँची मॅनेजर गेमा स्वान्सन हिने संबंधित कपलची माफी मागून त्यांना मोफत जेवणासाठी आमंत्रित केलं आहे. 'द सन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
'आम्ही या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली. त्यात आम्हाला असं आढळून आलं, की गैरसमजामुळे त्या दोघांना इथून जायला सांगितलं गेलं असावं. आम्ही मार्टिनाची माफी मागून त्या दोघांना जेवणासाठी बोलावलं आहे,' असं गेम्मा यांनी सांगितलं.