कोरोनाशी लढण्यात महिला ठरतात पुरुषांपेक्षा सरस, रोगप्रतिकारवर्धक हॉर्मोन्सचा होतो फायदा

कोरोनाशी लढण्यात महिला ठरतात पुरुषांपेक्षा सरस, रोगप्रतिकारवर्धक हॉर्मोन्सचा होतो फायदा

जगभरातील आरोग्य सेवकांमध्ये 70 टक्के महिला आहेत. पण त्यांच्या तपासण्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात कोविडची लागण झाल्याचं दिसून आलेलं नाही. या लढ्यात महिलांना आजाराचा सामना करण्याचे प्रसंग अधिक येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : कोविड-19 या संसर्गजन्य रोगाशी लढण्यासाठी शरीरात असलेल्या प्रतिकारशक्तीबाबत वेगवेगळी संशोधनं जगभरात सुरू असतात. कोविड-19 रोगाचा सामना करण्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला सरस असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. महिलांच्या शरीरातील काही हॉर्मोन्स (Hormones) आणि क्रोमोझोम्समुळे (Chromosomes) त्यांची प्रतिकारशक्ती पुरुषांच्या तुलनेत अधिक चांगली असते, असं शास्रज्ञांना संशोधनातून लक्षात आलं आहे.

कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील अभ्यास गटाने हे संशोधन केलं आहे. या गटातील वरिष्ठ अभ्यासक डॉ. गाविन ऑडिट म्हणाले, ‘कोविड-19 आजाराविरुद्ध लढण्याच्या संदर्भाने माणसाच्या लिंगाचा ACE2 शी कसा संबंध आहे हा आमच्या संशोधनातील महत्त्वाचा निष्कर्ष आहे. ACE2 हे एंझाइम SARS-CoV-2 या विषाणूचा रिसेप्टर म्हणून मानवी शरीरात काम करतो. पण कार्डिओव्हॅस्क्युलर, फुफ्फुसं आणि मूत्रपिंडांशी संबंधित आजारांमध्ये हेच एंझाइम मुख्य संरक्षक म्हणून काम करतं. महिलांमध्ये दोन XX क्रोमोझोम असतात त्यामुळे त्यांच्याकडे ACE2 जीनही दोन असतात. त्यामुळेच महिलांना कोविड-19 ची लागण झाली तरीही तो आजार अधिक क्लिष्ट होत नाही.’

(वाचा - देशात पहिल्या कोरोना वॅक्सिनबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा)

अमेरिकन जर्नल ऑफ फिजिऑलॉजी-हार्ट अँड सर्क्युलेटरी फिजिऑलॉजीमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. यात त्यांनी हे सिद्ध केलंय की, ACE2 हे जिन X क्रोमोझोमशी जोडलेले असतात. त्याचा दुहेरी वापर होऊ नये, म्हणून एक क्रोमोझोम अक्रियाशील होतो. पण त्याच्या शरीरातील ठिकाणामुळे तो क्रियाशील होतो आणि त्यामुळे महिलांमध्ये ACE2 तयार करण्याच्या सूचना शरीराला दोनदा दिल्या जातात.

(वाचा - ऑपरेशनवेळी एक-दोन नाही, पोटातून काढले तब्बल 639 लोखंडी खिळे; डॉक्टरही हैराण)

X क्रोमोझोम पुन्हा क्रियाशील झाल्यामुळे टोल-लाइक रिसेप्टर सेव्हन (Toll-like receptor seven) या जिनची शक्तीही दुप्पट होते. हा प्रतिकारशक्तीचाच भाग असल्यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते. याबाबत डॉ. ऑडिट म्हणाले, ‘महिलांच्या शरीरात टोल-लाइक रिसेप्टर सेव्हन असल्यामुळेच त्यांची प्रतिकारशक्ती पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचं सिद्ध होतं. त्यामुळे विषाणू संसर्गाचा सामना त्या पुरुषांच्या तुलनेत अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात मग अगदी सर्दी पडसं असलं तरीही.’

(वाचा - शेतीचा म्युजिकल फंडा, शेतात लावतो गाणी, पिकं येता भारी!)

जगभरातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये पुरुषांमध्ये रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्याने त्यांना गंभीर स्वरूपाचा आजार होतो हे लक्षात आल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे. जगभरातील आरोग्य सेवकांमध्ये 70 टक्के महिला आहेत. पण त्यांच्या तपासण्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात कोविडची लागण झाल्याचं दिसून आलेलं नाही. या लढ्यात महिलांना आजाराचा सामना करण्याचे प्रसंग अधिक येत आहेत. पण त्या सामना करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असल्यामुळे फारशी चिंता करण्याचं कारण नाही असंही ऑडिट म्हणाले.

Published by: Karishma Bhurke
First published: December 22, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या