मुंबई, 03 डिसेंबर : सोशल मिडीया युझर्समध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामनं (Instagram) भारतात लाइव्ह रूम (LIVE ROOM) फिचर लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामुळे युझर्सला लाईव्ह सेशन्सदरम्यान अतिरिक्त तीन जणांना सहभागी करून घेता येणं शक्य होणार आहे. हे फिचर (feature) लाईव्ह फंक्शनॅलिटीचा पुढील टप्पा आहे.
दोन युझर्स एकत्र येत लाईव्ह सेशन सुरू करू शकतात. तसंच एखादी तिसरी व्यक्ती देखील लाईव्ह सेशन सुरू झाल्यावर सेशनमध्ये सहभागी होऊ शकते, असं कंपनीने सांगितलं आहे. लाईव्ह रुम्स लवकरच ओटीए (OTA) अद्ययावत होतील, असं नमूद करण्यात आलं असून कंपनीकडून याबाबत अधिक तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या इन्स्टाग्रामने प्रसिद्धपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, लाईव्ह रूम्सची सुरवातीची चाचणी भारतात झाली होती जिथं पहिल्यापासूनच हे फिचर सुरू होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या स्थितीत हे फिचर व्यावसायिकांना विशेष फायदेशीर ठरेल, अशी आशा कंपनीनं व्यक्त केली आहे. भारतात मार्चमधील दर आठवड्याचा आढावा घेतला असता, लाईव्ह व्ह्युज (LIVE VIEWS) पाहण्याचं प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत पोहोचलं. ही स्थिती पाहता लाईव्ह रुम्स हे फिचर अधिकधिक लोकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा इन्स्टाग्रामनं व्यक्त केली आहे. भारतीय क्रिएटर्स शिरीन भरवानी, मानव छाब्रा आणि रोहिना आनंद खिरा यांनी या फिचरचं नुकतंच टेस्टिंग केलं आहे.
हे वाचा - google map मध्ये आता Community Feeds; काय आहे त्याचा फायदा पाहा
फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष अजित मोहन याबाबत माहिती देताना म्हणाले की, इन्स्टाग्राम अधिक चांगलं, उपयुक्त आणि सुलभ व्हावं यासाठी सर्जनशील क्रिएटर्सला आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो. त्यामुळेच त्यांना उत्तम आविष्कार करणं शक्य होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे इन्स्टाग्रामवरील लाईव्हचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. हाच नियम पुढे कायम राहिल्यास मित्र, कुटुंबातील व्यक्ती आणि प्रेक्षकांना एकत्रित संवाद साधता यावा याकरिता लाईव्ह हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरणार आहे. लाईव्ह रूम्सची आखणी, चाचणी आणि ते लाँच करण्याच्या प्रक्रियेत भारत एक मोठी भूमिका बजावत आहे. लाईव्ह रूम्स हे फिचर वापरण्यास अत्यंत सुलभ असेल तसंच सुरक्षेच्या अनुषंगाने देखील त्यात उपाययोजना केल्या असतील, असं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं.
हे वाचा - मोबाईल डेटा लवकर संपतोय? या सोप्या टिप्स फॉलो करा
इन्स्टाग्राम लाईव्ह रूम्स वापरण्यासाठी युझर्सला मुख्य पेजवर डावीकडे स्वाईप करून इन्स्टाग्राम कॅमेरा पेज सुरू करावं लागेल. त्यानंतर लाईव्ह कॅमेरा हा ऑप्शन निवडावा लागेल. कॅमेरा-रूम्स आयकाॅन टॅप करून गेस्टस सहभागी करून घेता येतील. यापूर्वीच्या फिचरमध्ये लाईव्हसाठी थेट गेस्ट सहभागी होत होते. मात्र नव्या फिचरमध्ये हव्या त्या गेस्टला लाईव्हमध्ये सहभागी करून घेता येणार आहे. भारत आणि इंडोनेशियातील युझर्ससाठी हे लाईव्ह रुम्स फिचर्स लवकरच सुरू होणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.