हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात करा बदला, आजार पळतील दूर!

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात करा बदला, आजार पळतील दूर!

थंडीत आजारापासून दूर राहण्यासाठी असा ठेवा तुमचा आहार.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर: गुलाबी थंडी तर सर्वांना हवी हवीशी वाटते मात्र थंडी आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येते. थंडीत त्वचेचे आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत थंडीमुळे तहान लागत नाही त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि भूक लागली म्हणून आपण जे मिळेल ते खातो त्यामुळे असं न करता आपल्या शरीराची काळजी घेणं अत्यावश्यक असते. पावसाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही आपल्या आहारात आवश्यक तो बदल करणं गरजेचं असतं. थंडीत त्वचा शुष्क होते त्यावर कितीही क्रीमचा मुलामा चढवला तरीही तुमचा आहारही तितकाच महत्त्वाचा असल्यानं आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. थंडीत आहार योग्य नसेल तर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यासोबतच इतर आजारांनाही निमंत्रण दिलं जातं त्यामुळे थंडीत आपली स्वत:ची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. मग थंडीत नेमका काय आहार घ्यायचा असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र आज आम्ही तुम्हाला संपूर्ण दिवसात नेमका कसा आहार असावा याच्या काही खास टीप्स सांगणार आहोत.

वाचा-पोटदुखीसह अन्य आजारांवर उपयुक्त आहे स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ

थंडीच्या दिवसातील असा असावा आहार

नाश्ता

सकाळी लवकर उठून व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीर सुदृढ राहाते. ऋतुमानानुसार तुमच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. हिवाळ्यात स्निग्ध पदार्थ, उष्ण पदार्थ खाण्याची शरीराला जास्त गरज असते. त्यानंतर पोटभर नाश्ता करावा. नाश्ताला तुम्ही दूध, उकडलेलं अंड, ब्रेड-बटर, उपमा, सँडविच, डोसा यांचं सेवन करावं. शक्यतो अति तेलकट पदार्थ सकाळी खाणं टाळावं. नाश्त्यानंतर फळ खाल्ल्यानं फायदा होतो. थंडीच्या मौसमातील फळांचं सेवन करण्यावर अधिक भर द्यावा. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत अशांनी थंड गुणधर्म असणारी म्हणजे पेरू, केळी सारखी फळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं खावीत. सकाळचा नाश्ता हा कायम भरपेट असायला हवा. तो पोटभर करणं आवश्यक आहे. रात्री लवकर जेवल्यानंतर साधारण 9 तास पोटात काही नसल्यानं अॅसिड तयार होतं. त्यामुळे योग्य वेळी पोटभर न खाल्ल्यानं अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

दुपारचं जेवण

नाश्ता आणि जेवणातील मधल्या अंतराचा ताळमेळ साधायला हवा. दोन्ही खाण्यात अति किंवा कमी वेळ जाऊ नये यासाठी काळजी घ्यावी. यामध्ये ताजं आणि गरम जेवणं जेवणं खावं. पालेभाज्या, कडधान्य असावीत. भात-डाळ, पोळी भाजी, ताक, दही असा समावेश आहारात असावा. शक्य असेल तर सुरुवातील सूप घेऊन त्यानंतर जेवण करा.

वाचा-उपवास करण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं? काय आहे सत्य

संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळी जर तुम्हाला भूक लागली असं वाटलं तर हलका काहीतरी खा ज्यामुळे तुमची भूक भागेल पण पोट भरगच्च नाही होणार. शक्य असेल तर फळ खावीत. अथवा गूळ आणि शेंगदाणे किंवा असं काहीतरी खावं.

रात्रीचं जेवण

रात्रीचं जेवण हे शरीरासाठी महत्त्व पूर्ण असतं. असं म्हणतात रात्रीचं जेवण हे गरीबासारखं करावं. म्हणजे दोन घास कमी जेवावेत कारण रात्री आपण जेवून झोपतो त्यामुळे जेवलेल्याचं नीट पचन झालं नाही तर पित्त होण्याची भीती असते. त्यामुळे रात्री हलका आहार घ्यावा. झोपण्याआधी किमान 4 तास आधी जेवण करावं त्यामुळे ते पचायला जड पडत नाही.

आपल्या आहारात जीर, हिंग, बडिशोप, ओव्याचा वापर करावा. त्यामुळे पोटाच्या आजारापासून तुम्हाला आराम मिळेल. थंडीच्या दिवसांमध्ये श्वसनाचे विकार, पोटाचे विकार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे खाण्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

वाचा-थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक, अनेक आजारांना निमंत्रण!

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Published by: Akshay Shitole
First published: December 15, 2019, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading