पत्नी 'या' गोष्टी आपल्या पतीला सहजपणे सांगू शकत नाही; याबाबत स्त्रियांना काय वाटतं?

पत्नी 'या' गोष्टी आपल्या पतीला सहजपणे सांगू शकत नाही; याबाबत स्त्रियांना काय वाटतं?

नवरा-बायको एकमेकांना समजून घेणारे आणि एकमेकांचं व्यक्तिस्वातंत्र्य जपू देणारे असले, तर अशा नात्यातल्या बंधनाची अडचण होत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य जपता येत नसेल, तर मात्र असे नातेसंबंध प्रेमाचे असले, तरी घुसमटवणारे ठरतात. पती-पत्नीचं (Husband-Wife) नातं परस्परांवरच्या विश्वासातून फुलतं आणि दृढ होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जून: विवाह हा माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर माणसाला आयुष्यभरासाठीचा साथीदार मिळतो, हे तर आहेच. पण विवाहानंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल होतात, हेही खरं आहे. विवाहाआधी माणूस एकटा असला, तरी स्वतंत्र असतो. आपल्याला आवडेल ते करण्यासाठी मोकळा असतो. विवाहानंतर तो प्रेमबंधनात अडकतो. नवरा-बायको एकमेकांना समजून घेणारे आणि एकमेकांचं व्यक्तिस्वातंत्र्य जपू देणारे असले, तर अशा नात्यातल्या बंधनाची अडचण होत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य जपता येत नसेल, तर मात्र असे नातेसंबंध प्रेमाचे असले, तरी घुसमटवणारे ठरतात. पती-पत्नीचं (Husband-Wife) नातं परस्परांवरच्या विश्वासातून फुलतं आणि दृढ होतं.

प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर केलीच पाहिजे असं बंधन घालून घेण्यापेक्षा दोघांचा एकमेकांवर नितांत विश्वास असेल, तर त्या नात्याला तडा जात नाही. लग्नानंतर पती-पत्नी सहसा सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतात. तरीही अशा काही गोष्टी असतात, की पत्नी आपल्या पतीला कधीच सांगत नाही किंवा त्या गोष्टी तिला सहजपणे पतीला सांगता येणं शक्य नसतं. अशा कोणत्या गोष्टी असू शकतात, याबद्दल काही विवाहित स्त्रियांना (Married Women) काय वाटतं, ते पाहू या. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दल चर्चा करणारा लेख प्रसिद्ध केला आहे.

एका स्त्रीच्या विवाहाला तीन महिने झाले आहेत. कोणीही परफेक्ट (Perfect) नसतं, याची तिला कल्पना आहे. ती तिच्या पतीवर प्रेम करते आणि त्याचा पूर्ण आदर करते. तरीही अनेक गोष्टींवरून ती नकळत तिच्या अगोदरच्या बॉयफ्रेंडशी (Ex-Boyfriend) पतीची तुलना करते. हे वैवाहिक आयुष्यासाठी (Married Life) चांगलं नाही, याचीही तिला जाणीव आहे. म्हणूनच बॉयफ्रेंडला विसरण्याचा प्रयत्न ती करतेय. पतीशी कितीही चांगलं नातं असलं, तरी ही गोष्ट पतीशी शेअर करणं शक्य नाही.

दुसऱ्या एका स्त्रीचा या बाबतीतला अनुभव असा आहे, की तिचा पतीच तिला लग्नापूर्वीच्या रिलेशनशिप्सबद्दल (Past Relationships) विचारतो. ती सहजपणे त्या विषयाला बगल देते आणि उत्तर देणं टाळते. ती म्हणते, की 'आमच्या लग्नाला आता तीन वर्षं होऊन गेली आहेत. मी आता पूर्णपणे पतीवरच प्रेम करणारी पत्नी आहे. माझ्या जुन्या रिलेशनशिप्स हा विषय आता इतिहासजमा झाला आहे. त्याचा माझ्या वर्तमानकाळावर काहीही परिणाम होऊ नये, असं मला वाटतं. कारण मी त्या गोष्टी मागे टाकून पुढे आले आहे. म्हणूनच मी त्याबद्दल पतीला काही सांगू इच्छित नाही. कारण त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार होण्यास ते कारणीभूत ठरू शकतं.'

आणखी एका महिलेची भावना अशी आहे, की तिला लग्नानंतर करिअर (Career) सोडून दिल्याचा पश्चात्ताप होतोय. अनेकींची प्रातिनिधिक भावना तिने व्यक्त केली आहे. 'लग्नानंतर मुलांच्या संगोपनासाठी आणि संसार चालवण्यासाठी करिअरला सोडचिठ्ठी दिली. पती दररोजच कामावरून उशिरा घरी येतो. त्याच्याकडून घरातल्या कामात मदतीची काही अपेक्षाच नाही पण निदान थोडं कौतुक तरी करावं, अशी अपेक्षा असते. लग्नाला चार वर्षं होऊनही एकदाही ते सुख वाट्याला आलेलं नाही. मी थँकलेस जॉब करतेय आणि करिअर सोडल्याचा पश्चात्ताप होतोय,' असं ती म्हणते.

लग्नानंतर सासू-सासऱ्यांशी चांगलं न पटण्याचा अनुभव तर अनेक स्त्रियांना येतो. एक स्त्री म्हणते, की 'माझं आणि सासूबाईंचं नातं फारसं चांगलं नाही. आमची अनेकदा भांडणं होतात, पण सासूबाईंचं चूक असलं, तरी माझा पती त्यांचीच बाजू घेतो. त्यामुळे अनेकदा मी एकटीच रडते. कारण माझ्याच कुटुंबात मला परक्यासारखं वाटतं.'

दुसरी एक स्त्री म्हणते, 'आम्ही सासू-सासऱ्यांबरोबरच राहतो. आमचं फारसं पटत नसलं, तरी आम्ही आनंदात आहोत, अशी मी माझी समजूत घालून घेते, पण सासू-सासरे मला त्यांच्या मुलीचा मान कधीच देणार नाहीत आणि मीही त्यांच्यावर माझ्या आई-वडिलांसारखं प्रेम करू शकणार नाही, याची मला कल्पना आहे.'

नवीनच लग्न झालेली एक तरुणी म्हणते, की 'माझ्या माहेरच्या मंडळींपैकी किंवा माझ्या मित्रमंडळींपैकी कोणाच्या आयुष्यात काही बरं-वाईट घडलं, तर त्या सगळ्याच गोष्टी मी पतीला सांगत नाही. कारण माझ्या काही गुप्त गोष्टीही तो त्याच्या आईला सांगू शकतो. त्यांच्यापैकी कोणीही माझ्या माहेरच्या मंडळींना अशा गोष्टींवरून जोखलेलं मला आवडणार नाही.'

सेक्स लाइफ (Sex Life) हा लग्नसंस्थेचा मूलभूत घटक असतो, मात्र त्याबद्दल उघडपणे एकमेकांशीही बोलणं चांगलं मानलं जात नसल्यामुळे त्यात अनेक गैरसमज असतात. त्यातूनच पुढे विवाह मोडण्यापर्यंतही बाबी जाऊ शकतात. 'माझा पती फोअर-प्लेसाठी खूपच कमी वेळ देतो. आम्ही लैंगिकदृष्ट्या एकमेकांसाठी फारसे कम्पॅटिबल नाही, असं मला वाटू लागलं आहे. सेक्स म्हणजे केवळ पुरुषांच्या आनंदाची गोष्ट नाही, हे पतीला सांगण्यासाठी योग्य संधीची मी वाट पाहत आहे,' असं मत एका स्त्रीने व्यक्त केलं आहे. मानसिक समुपदेशक किंवा डॉक्टर्सकडे येणाऱ्या केसेसबद्दल वाचल्यानंतर हे लक्षात येतं, की या स्त्रीची भावना प्रातिनिधिक आहे.

First published: June 23, 2021, 12:01 PM IST

ताज्या बातम्या