मुंबई, 27 जून : माणसाच्या शरीराचा आणि मनाचा अभ्यास शास्त्रज्ञ सतत करत असतात. त्यावरून माणसाचं निसर्गातील इतर घटकांच्या तुलनेत असलेलं वेगळेपण वारंवार अधोरेखित होत आलंय. माणसाला प्राण्यांपेक्षा वेगळं ठरवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे माणसाच्या हातापायाच्या (Humans Don’t Have Hairs On Palm And Sole Of Feet) तळव्यांवर नसलेले केस. पोलर बिअर (Polar Bear) अर्थात हिमअस्वल आणि सशांच्या तळव्यांवरसुद्धा केस असतात. मात्र माणसाच्या आणि काही प्राण्यांच्या तळव्यांवर केस कधीच उगवत नाहीत. या कोड्याचं रहस्य शास्त्रज्ञांनी 2018 मध्ये केलेल्या एका संशोधनाद्वारे उलगडलं आहे. जाणून घेऊया काय आहे संशोधन.
पेनसिल्वानिया विद्यापीठातील (University Of Pennsylvania) त्वचा तज्ज्ञ सारा मिलर यांनी केसांसंदर्भात एक संशोधन केलं होतं. कॉसमॉस वेबसाइटला त्यांनी सांगितलं, की माणसाच्या शरीरात wnt नावाचं एक प्रोटिन (Proteins) असतं. हे प्रथिनं शरीरात मॉलिक्युलर मेसेंजरचं काम करतं. पेशींमध्ये हे प्रोटिन केस उगवणं, वाढणं, त्यांची स्पेस याबद्दलचे संदेश घेऊन जातं. केस उगवण्यासाठी या संदेशांचं खूप महत्त्व असतं. शरीराच्या ज्या भागात केस उगवत नाहीत, तिथं या प्रथिनांना विरोध करणारं दुसरं एक प्रथिनं असतं. Dickkopf2 (DKK 2) असं त्याचं नाव आहे. निसर्गतःच हे प्रथिनं तिथे तयार होत असतं. त्यामुळे त्या भागात केस उगवत नाहीत.
सावधान! केवळ दारूमुळेच नाही, तर या चार पदार्थांमुळेही होऊ शकतं लिव्हर खराब; वेळीच घ्या काळजी
या प्रोटिनबाबत पहिल्यांदा उंदरांवर संशोधन करण्यात आलं. त्यात धक्कादायक निष्कर्ष समोर आले होते. उंदरांच्या शरीरातून जेव्हा Dickkopf2 (DKK 2) हे प्रोटिन काढून टाकण्यात आलं, तेव्हा त्यांच्या हाताच्या तळव्यावरही केस उगवले होते. सशांवरही एक संशोधन करण्यात आलं. तेव्हा असं लक्षात आलं, की सशांच्या शरीरात या प्रोटिनचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे सशांच्या हाता-पायावर खूप केस असतात.
ससा किंवा अस्वलाच्या हातापायांवर केस असण्यामागे काही नैसर्गिक कारणं आहेत. प्राण्याकडून माणसापर्यंत झालेला आपला विकास आपल्या शरीरातील बदलांसाठी कारणीभूत आहे. हा विकास होताना, काही आवश्यक बदल झाले व अनावश्यक गोष्टी निघून गेल्या. अस्वल किंवा सशांसारख्या प्राण्यांना बर्फात किंवा खडकाळ भागात चालण्यासाठी केसांची आवश्यकता असते. त्यामुळेच त्यांच्या विकासात हात व पायांच्या तळव्यांवरचे केस तसेच राहिले. मात्र माणसाला तशी काही आवश्यकता नसल्याने त्यादृष्टीनं माणसाच्या शरीरात बदल झाले. माणसाच्या हाताच्या किंवा पायाच्या तळव्यांवर केस असते, तर आयुष्य किती कठीण झालं असतं, याचा अंदाजही येऊ शकत नाही. शरीरातील विशिष्ट प्रोटिन्सचं प्रमाण केसांच्या उगवण्या किंवा न उगवण्यावर नियंत्रण ठेवत असतं. शास्त्रज्ञांच्या या संशोधनामुळे माणसाच्या हातापायाच्या तळव्यांवर केस का उगवत नाहीत, याचं नेमकं कारण समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.