मुंबई, 22 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना आल्हाददायक थंडीचा असतो; मात्र यंदा फेब्रुवारी सुरू झाल्यापासून तापमानात खूप चढ-उतार पाहायला मिळाले. सकाळी खूप थंडी आणि दुपारी कडक ऊन अशा हवामानामुळे साथीच्या आजारांची शक्यता वाढली. आता तर पारा चक्क चाळिशीजवळ पोहोचला आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. आताच इतकी तापमानवाढ झाली आहे, तर उन्हाळ्यात कसं होणार अशी चिंता सगळ्यांना सतावते आहे. फेब्रुवारी महिन्यातच अशा प्रकारे तापमानवाढ होण्याची काय कारणं आहेत, ते हवामान खात्यानं स्पष्ट केलंय.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सुरू झालेली थंडी फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्काम ठोकते. फेब्रुवारीपासून हळूहळू थंडी कमी होऊन उष्णतेचा पारा वरवर जाऊ लागतो; मात्र यंदा फेब्रुवारीत उन्हाचे चटके सोसावे लागताहेत. देशातल्या अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक नोंदवलेला आहे. राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी (21 फेब्रुवारी) 31.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर सोमवारी त्यापेक्षा जास्त म्हणजे 33.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. काही राज्यांमध्ये तर पारा 35 अंशांच्या पुढेही होता. महाराष्ट्रातही काही ठिकाणी तापमान 35 अंशांपेक्षा जास्त होतं. हवामान खात्यानेही येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्याचं सांगितलंय.
वाचा - जास्त काळ बिअर पिण्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम, ही 4 लक्षणं दिसल्यास व्हा सावध
फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची लाट येणार ही नक्कीच चिंतेची बाब आहे. त्याची कारणंही अनेक असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. निरभ्र आकाश, वाऱ्याची मंद गती आणि आग्नेयेकडे हवेची बदललेली दिशा हे तापमानवाढीचं एक कारण असण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स कार्यरत नसल्यामुळेही ही वाढ होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गेल्या 2 दिवसांच्या तुलनेत राजधानी दिल्लीत आज (22 फेब्रुवारी) तापमानात थोडी घट दिसून आली. त्याचं कारण आज सकाळी दिल्लीत धुकं पडलं होतं; मात्र दिल्लीमध्ये किमान तापमानात आता वाढ होते आहे. सध्या किमान तापमान 14.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. गेले काही दिवस नेहमीपेक्षा दिल्लीतलं तापमान जास्त आहे. त्यामुळेही धुकं पडणं नैसर्गिक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सफदरजंग वेधशाळा या दिल्लीतल्या एका प्रमुख हवामान केंद्रामध्ये सोमवारी तापमानात चांगलीच वाढ नोंदवली गेली. नेहमीपेक्षा 9 अंश सेल्सिअसने वाढ होऊन सोमवारी दिल्लीतला पारा 33.6 अंशावर पोहोचला. फेब्रुवारीत उष्णता वाढण्याची 1969नंतर ही तिसरी वेळ आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मार्चच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये जी तापमानवाढ होते, ती यंदा फेब्रुवारीतच पाहायला मिळते आहे. दिल्लीसोबत अनेक राज्यांमध्ये पुढचे काही दिवस पारा चढाच राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heat, Weather Forecast