नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : मैत्री (Friendship) म्हणजे माणसाला मिळालेलं सगळ्यांत मोठं वरदान मानलं जातं. आपल्या सुखदु:खात साथ देणारे, आपल्या पाठीशी उभे राहणारे, आपल्याला पूर्ण ओळखणारे मित्र-मैत्रिणी (friends) मिळणं म्हणजे भाग्यच मानलं जातं. महिलांच्या मैत्रीचे किस्से, त्याबद्दलच्या अनेक गोष्टींची वारंवार चर्चा होते. अनेकदा अगदी लहानपणी जोडलं गेलेलं मैत्र आयुष्याच्या शेवटापर्यंत कायम राहतं. महिलांच्या बाबतीत तर ही गोष्ट अनेकदा खरी होते... पण पुरुषांच्या मैत्रीबाबत म्हणाल तर गोष्ट थोडी वेगळी आहे. याबाबत झालेल्या संशोधनाबद्दलचं वृत्त 'झी न्यूज हिंदी'नं दिलं आहे.
1980 मध्ये बोस्टनमधल्या दोन मानसोपचारतज्ज्ञांनी एकटेपणा आणि सामाजिक बहिष्काराचे परिणाम यावर संशोधन केलं होतं. पुरुष आपलं वैवाहिक आयुष्य आणि करिअर यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेकदा मैत्रीकडे थोडं दुर्लक्ष करतात असं या संशोधनातून समोर आलं होतं.
आपलं काम, करिअर, कुटुंब आणि मुलांमध्ये पुरुष इतके गुंतले होते की त्यांना आपल्या मित्रांचा त्याग करणं, त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करणंच योग्य वाटलं असं डॉ. श्वार्टज यांनी 'दी न्यूयॉर्क टाइम्स'ला सांगितलं. सगळं एकाच वेळेस सांभाळणं हे पुरुषांसाठी मोठं आव्हान असतं त्यामुळे अनेक जणांनी मैत्रीला थोडंसं दूर सारल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच अनेकदा पुरुषांमध्ये खूप पूर्वीपासूनचे मैत्रीचे बंध टिकत नसल्याचं समोर येतं. याउलट महिला मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपलं मैत्र जपतात.
‘बडी सिस्टीम : अंडरस्टँडिंग मेल फ्रेंडशिप’चे लेखक आणि समाजशास्त्रज्ञ डॉ. जेफ्री ग्रीफ यांचं असं म्हणणं आहे, की पुरुषांची दोस्ती (male friendship) खांद्याला खांदा लावून असते, तर महिलांची मैत्री मात्र फेस टू फेस होते. पुरुषांना मैत्रीमध्ये गेम्स खेळणं, विविध प्रकारचे खेळ पाहणं, म्युझिक कॉन्सर्टला सोबत जाणं किंवा एकत्र काम करणं या गोष्टी आवडतात. महिलांना मात्र आपल्या भावनांना मोकळी वाट करू देऊन मगच मैत्रीत पुढे जाणं आवडतं. भावनिकदृष्ट्या महिलांना कुणाशी तरी बोलून आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला जास्त आवडतं.
हे ही वाचा-मेंदूची कार्यक्षमता राहील अगदी उत्तम; आहारात या गोष्टींचा समावेश ठरेल फायदेशीर
आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना पुरुषांना आपल्या समस्यांबद्दल अगदी फोनवरूनही बोलणं आवडत नाही, असं संशोधनातून समोर आलं. फोनवर आपल्या समस्यांबद्दल बोलायला, व्यक्त व्हायला पुरुषांना अजिबात आवडत नाही. या संशोधनात 2 हजार मुलं आणि किशोरवयीन मुलांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. पुरुषांना आपल्या अडचणींबद्दल बोलणं हे विचित्र आणि वेळ वाया घालवण्यासारखं वाटत असल्याचं या संशोधनातून समोर आलं. अर्थात यापूर्वीच्या म्हणजेच जुन्या काळातल्या पुरुषांमध्ये ही भावना जास्त तीव्र होती.
सध्याच्या काळात कुटुंब, नातेवाईकांबरोबरच मित्रपरिवारही तितकाच महत्वाचा ठरतो. अशा वेळेस मित्रांच्या संपर्कात राहणं, त्यांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्याशी बोलत राहणं, आनंदाच्या प्रसंगी त्यांना सहभागी करून घेणं आणि दु:खात त्यांच्यासोबत असणं हे खूप आधार देणारं ठरू शकतं. सध्याच्या ताणतणावाच्या काळात अशी मैत्री आयुष्यातला विसावा ठरू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Friendship, Health