मुंबई, 28 डिसेंबर : नवं अर्थात 2022 हे वर्ष येण्यास आता केवळ काही दिवस बाकी राहिले आहेत. दर वर्षीप्रमाणे सर्वांनीच नव्या वर्षात काय करायचं याचे संकल्प (New Year Resolutions) केले असतील. कारण नवं वर्ष जवळ आलं, की संकल्प करायचे ही एक फॅशनच असते; पण ते संकल्प किती प्रमाणात पूर्ण केले जातात, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहावा. त्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येण्याचं प्रमाण खूप जास्त असेल. आता स्पेनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातूनही या निष्कर्षावर शिक्कामोर्तब झालं आहे.
नवीन वर्षासाठी केलेले 78 टक्के संकल्प कधीच सत्यात उतरत नाहीत, असं या अभ्यासातून समोर आलं आहे. तसंच त्यातले 52 टक्के संकल्प नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आटोपतात, असंही त्यातून दिसून आलं आहे. हे वाचल्यावर प्रत्येकाला जाणवलं असेल, की आपण केलेल्या संकल्पांचं गेली अनेक वर्षं काय झालं आहे, याबद्दलची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिली आहे.
संकल्प अनेक प्रकारचे असतात. दररोज व्यायाम करणं, वजन कमी करणं, गोड कमी खाणं, रूटीन पाळणं असे वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प केले जातात. स्वतःला चांगल्या सवयी लागाव्यात या हेतूने हे संकल्प केले जातात आणि त्यासाठी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त शोधला जातो. प्रत्यक्षात मात्र संकल्पांच्या अंमलबजावणीचा उत्साह नव्या वर्षाचा पहिला महिना संपेपर्यंतच ओसरतो. डिसेंबर महिन्यापर्यंत तर ते संकल्प लक्षातही राहत नाहीत. तरीही पुढच्या वर्षीच्या जानेवारीत परत नवे संकल्प केले जातात.
संकल्प सिद्धीला का जात नाहीत, याची कारणं शोधण्यासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने (Stanford University) 10 वर्षांपूर्वी एक संशोधन केलं होतं. सायकॉलॉजिस्ट्स अर्थात मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनात संकल्पपूर्ती न होण्याच्या कारणांचा वेध घेण्यात आला होता.
त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे संकल्पांमध्ये नेमकेपणाचा (Focus) अभाव असतो. सकाळी पाच वाजता असं नेमकं उद्दिष्ट ठरवण्याऐवजी लवकर उठण्याची सवय लावू असा ढोबळ संकल्प केला जातो. रोज अमुक इतके तास किंवा अमुक ते अमुक वाजेपर्यंत अभ्यास करू असं नेमकं ठरवण्याऐवजी भरपूर अभ्यास करू असं ठरवलं जाण्याचं प्रमाण जास्त असतं. संकल्प नेमके नसतील, तर त्यांची अंमलबजावणी कशी होतेय हे तपासता येत नाही. त्यात चालढकल केली जाते.
बाहेरच्या कोणत्या कारणामुळे संकल्प मोडला, तर ते कशा रूपाने भरून काढायचं हेदेखील संकल्पामध्ये ठरवून ठेवलेलं असणं आवश्यक आहे. त्यामुळे संकल्पपूर्ती होण्यास मदत होते. अनेक जण सकारात्मक (Positivity) संकल्प करत नाहीत. त्यामुळे देखील संकल्पपूर्तीत अडथळा येतो. अनेक जण काय करायचं आहे, याऐवजी काय करायचं नाही हे ठरवतात. त्याचा परिणाम नकारात्मक होतो.
अनेक जणांच्या संकल्पांमध्ये म्हणजे निर्णयात दृढता (Firmness) नसते. त्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो. आपण ती गोष्ट पूर्ण करू शकू की नाही, याबद्दल स्वतःच्याच मनात शंका असते. त्यामुळे संकल्प सिद्धीस जाण्याचं प्रमाण कमी असतं, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. या गोष्टी लक्षात घेऊन नवे संकल्प करायला हवेत आणि त्यांची अंमलबजावणीदेखील दृढपणे करायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.