मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनानंतर आता डिसीज Xचा धोका; WHOने घेतला मोठा निर्णय

कोरोनानंतर आता डिसीज Xचा धोका; WHOने घेतला मोठा निर्णय

कोरोना विषाणू

कोरोना विषाणू

काही देशांमध्ये कोरोनासह, झिका, मंकी पॉक्स, निपाह यांसारख्या विषाणूजन्य आजारांमुळेदेखील बहुसंख्य जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 नोव्हेंबर :   गेल्या दोन ते अडीच वर्षांत कोरोनामुळे जगभरातल्या देशांना मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे जगभरात लाखो जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही कोरोनाचं सावट दूर झालेलं नाही. चीनसह काही देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. काही देशांमध्ये कोरोनासह, झिका, मंकी पॉक्स, निपाह यांसारख्या विषाणूजन्य आजारांमुळेदेखील बहुसंख्य जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात कोरोनासारख्या भीषण महामारीसाठी कारणीभूत ठरणारे पॅथोजन्स अर्थात रोगाला जन्म देणाऱ्या घटकांची यादी डब्लूएचओ लवकरच तयार करणार आहे. या माध्यमातून भविष्यातल्या कोणत्याही प्रकारच्या महामारीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली जाणार आहे. यासाठी डब्लूएचओ शास्त्रज्ञांचं एक पथकदेखील तयार करत आहे.

भविष्यात कोरोनासारख्या महामारीचं कारण बनू शकणारे जीवाणू, सूक्ष्मजीव आणि विषाणूंची ओळख आणि अभ्यास सुरू केला आहे. हे सूक्ष्मजंतू अर्थात पॅथोजन्सची यादीदेखील तयार केली जाणार आहे, जेणेकरून त्यांच्याशी सामना करण्यासाठी काम करता येईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. या संशोधनासाठी डब्लूएचओ 300 शास्त्रज्ञांचं पथक तयार करत आहे. हे पथक भविष्यात महामारीसाठी कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि विषाणूंचा अभ्यास करणार आहे. तसंच हे पथक या पॅथोजन्सवरील लस आणि उपचारांबाबत संशोधनदेखील करणार आहे.

हेही वाचा - कुठे बुटांमधून पितात, तर कुठे चिअर्सला बॅन! दारू पिण्याच्या 10 भलत्याच प्रथा

डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक सूक्ष्मजंतूंची यादी अपडेट करण्यासाठी जागतिक वैज्ञानिक प्रक्रिया सुरू केली जात आहे. आगामी काळातल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी त्यात योजना आखल्या जातील. अगोदर माहिती मिळाली, तर साथीच्या आजारांमुळे होणारी जीवितहानी कमी करता येईल, या हेतूने हे केलं जात आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाशिवाय झिका, मंकीपॉक्स आणि निपाह यांसारख्या विषाणूंमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.

ही यादी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, जेणेकरून त्यांना पुढच्या संभाव्य महामारीचा सामना करण्यासाठी आगाऊ तयारी करता येईल. प्राधान्य असलेल्या पॅथोजन्सची सुधारित यादी 2023च्या पहिल्या तिमाहीत प्रकाशित होण्याची शक्यता आहे,अशी माहिती डब्लूएचओच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिली.

पॅथोजन्स म्हणजे रोगजनक अर्थात एखाद्या रोगाला जन्म देणारा घटक होय. यात विषाणू, जिवाणू, बुरशी आणि परजीवींचा समावेश होतो. या घटकांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. हे घटक कोणतेही सजीव, वनस्पती, वृक्ष किंवा अन्य सूक्ष्मजीवांना आजारी पाडू शकतात.

हेही वाचा - Peanut Or Almond Butter : पीनट बटर की आल्मन्ड बटर, कोणतं बटर आरोग्यासाठी जास्त फायदेशीर

शास्त्रज्ञ विशेषतः डिसीज X वर काम करणार आहेत. तो एक अज्ञात पॅथोजन आहे. डिसीज एक्स भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर महामारीस कारणीभूत ठरू शकतो. तो कोरोनापेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतो. तो एकदा पसरला, तर त्याला रोखणं जवळपास अशक्य होईल, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. 300हून अधिक आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचं एक पथक डिसीज एक्ससह विषाणूंची 25हून अधिक कुटुंबं आणि जीवाणूंच्या पुराव्यावर काम करेल, असं डब्लूएचओने सांगितलं आहे.

शास्त्रज्ञांच्या मते डिसीज एक्स पूर्णपणे अज्ञात आहे. सध्या तरी याबाबत पूर्ण माहिती उपलब्ध नाही. परंतु, हा विषाणू खूप धोकादायक असेल आणि कोरोनापेक्षा जास्त वेगाने फैलावेल. भविष्यात डिसीज एक्सचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. हा एखाद्या छोट्या संसर्गाप्रमाणे असू शकतो आणि मोठ्या महामारीप्रमाणेदेखील पसरू शकतो.

आमच्याकडे आधीच पॅथोजन्सबद्दल माहिती असेल तर त्याचा उपयोग आम्हाला रोगावर उपचार शोधण्यासाठी आणि लस तयार करण्यासाठी होईल. वेगाने पसरणारी महामारी जाणून घेण्यासाठी प्राथमिक पॅथोजन्सना लक्ष्य करणं आवश्यक आहे. शास्त्रज्ञ अशा पॅथोजन्सवरही लक्ष केंद्रित करतील, ज्यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे,अशी माहिती डब्लूएचओच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रायन यांनी दिली.

जागतिक संशोधन, विकास आणि गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित करून लशी, चाचण्या आणि उपचारांसाठी मार्गदर्शक यादी अद्यायावत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे, असं डब्लूएचओने म्हटलं आहे.

डब्लूएचओद्वारे प्राधान्य असलेल्या पॅथोजन्सच्या यादीत कोविड-19, इबोला व्हायरस, मार्बर्ग व्हायरस, लस्सा फिव्हर, एमईआरएस सार्स, झिका आणि डिसीज एक्स यांचा समावेश आहे. या सूक्ष्मजंतूंवर कोणत्याही महामारीच्या संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. डब्लूएचओने 2017मध्ये पॅथोजन्सची पहिली यादी प्रकाशित केली होती. सध्या या यादीत कोविड-19, क्रिमियन-कॉंग हेमोऱ्हेजिक ताप, इबोला विषाणूजन्य रोग, मार्बर्ग विषाणूजन्य रोग, लस्सा फिव्हर, मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम, सिंड्रोम अँड सीव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम अर्थात सार्स, निपाह, हेनिपाव्हायरल रोग, रिफ्ट व्हॅली फिव्हर, झिका आणि डिसीज एक्स यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Corona, Corona updates, Covid-19, Lifestyle