Home /News /lifestyle /

कोरोना विषाणूचे Super Spreaders सापडले! नाक चोंदलेल्या आणि सगळे दात शाबूत असलेल्यांपासून सावधान

कोरोना विषाणूचे Super Spreaders सापडले! नाक चोंदलेल्या आणि सगळे दात शाबूत असलेल्यांपासून सावधान

Covid-19 चा संसर्ग काही व्यक्तींमुळे झपाट्याने पसरतो. त्यांना सुपर स्प्रेडर्स म्हटलं जातं. या Super Spreaders ची लक्षणं पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली आहेत.

    फ्लोरिडा (अमेरिका), 24 नोव्हेंबर : Covid-19 चा संसर्ग एका व्यक्तीपासून अनेकांपर्यंत पसरतो. पण काही व्यक्तींमुळे तो झपाट्याने पसरतो. त्यांना सुपर स्प्रेडर्स म्हटलं जातं. या Super Spreaders ची लक्षणं पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली आहेत. कॉम्प्युटरवरील मॉडेल्सच्या सहायाने वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिंकण्याच्या सवयींचा अभ्यास करून संशोधकांनी Coronavirus चा वेगाने प्रसार करू शकणाऱ्या लोकांची काही लक्षणं निश्चित केली आहेत. कोविड-19 च्या या सुपरस्प्रेडर्सचा म्हणजे वेगवान प्रसारक व्यक्तींचा शोध घेता येणं त्यामुळे आता शक्य आहे. कोरोना विषाणनूचा वेगाने प्रसार करण्यात सगळे दात शाबूत असलेल्या व्यक्तींचा मोठा वाटा आहे. त्यातून ज्यांचं नाक चोंदलेलं आहे अशा व्यक्तीसुद्धा अनेकांपर्यंत विषाणू पोहोचवू शकतात. हे कसं? कोरोनाचा प्रसार प्रामुख्याने संसर्ग झालेल्या म्हणजे पॉझिटिव्ह व्यक्तीच्या खोकल्याद्वारे किंवा शिंकेद्वारे बाहेर पडणाऱ्या बारिक द्रवामध्ये असलेल्या विषाणूंमुळे होतो, हे तर आपल्याला माहिती आहे. आता शिंकेतून उडणारे तुषार व्हायरस किती लांबपर्यंत घेऊन जातात यावरून तो सुपर स्प्रेडर आहे की नाही हे ठरू शकतं. फिजिक्स ऑफ फ़्ल्युईडस या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात शिंकांवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्यात आला. वेगाने आलेल्या शिंकेतील द्रवरूप थेंब किती दूर अंतरापर्यंत जाऊ शकतात याचा अभ्यास यासाठी करण्यात आला. यामध्ये बंद नाक आणि सगळे दात असलेल्या व्यक्तींची शिंक दूरपर्यंत जाऊ शकते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकते हे स्पष्ट झाले आहे. या अभ्यास अहवालाचे सहलेखक युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडाच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे मायकेल किंझेल म्हणाले, 'ही माहिती सुपरस्प्रेडर ओळखण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते आणि त्याआधारे सुपरस्प्रेडिंग रोखलं जाऊ शकतं.' शिंक का आणि कशी दूरपर्यंत जाऊ शकते याबाबतचा हा पहिला अभ्यास आहे. शिंकेतून उडणारे शिंतोडे किती दूरपर्यंत जाऊ शकतात आणि किती काळ ते हवेत तरंगत राहतात त्याचप्रमाणे त्यांचा मार्ग कसा असतो आणि वेग किती असतो याचा अभ्यास यात करण्यात आला आहे. यामध्ये असे आढळून आले की नाक बंद असेल तर शिंकेचा वेग वाढतो आणि शिंकेतील थेंब जास्त दूर अंतरापर्यंत जातात. नाक बंद असल्यानं शिंक तोंडावाटे बाहेर पडते. त्यामुळे तिचा वेग आणि अंतर अधिक असते. नाक मोकळे असेल तर शिंकेचा मार्ग विभागतो परिणामी वेग कमी होतो. दातांचा प्रभाव शिंकेच्या गतीवर पडतो. अधिक दात म्हणजे मर्यादित मार्ग. हे पाण्याच्या नळासारखं असतं. पाण्याचा नळ थोडासाच उघडा असेल तर पाणी ताकदीने बाहेर येतं. तसंच कमी जागा असेल तर शिंक अधिक वेगाने बाहेर पडते आणि अधिक दूरपर्यंत जाते. ज्यांचे दात कमी आहेत किंवा नाहीच आहेत, त्यांच्या शिंकेचा वेग अगदी कमी असतो. बंद नाक आणि सगळे दात असणे या घटकांमुळे शिंकेचा वेग आणि अंतर ६० टक्क्यांनी वाढतं. त्यामुळे नाक मोकळं असणं हे जंतू संसर्ग कमी करतं. नाकातील द्रव पातळ असेल तर द्रवरूप कणांचा आकार लहान असतो आणि ते हवेत अधिक काल तरंगतात. मध्यम आणि जाड स्वरूपाचा द्रव असेल तर तो जमिनीवर पडतो आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असंही या अभ्यासात आढळलं आहे.  आता या संशोधकांना प्रत्यक्ष वेगवेगळ्या लोकांचा क्लिनिकल स्टडी करायचा आहे, ज्यामुळे कॉम्प्युटरवर तयार करण्यात आलेल्या मॉडेल्सच्या सहायाने केलेल्या अभ्यासातील निकष सिद्ध करता येतील.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या