मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कसं सुरू आहे कोरोना लशीचं ट्रायल; जगात सर्वात पुढे कोणती लस? पाहा एका क्लिकवर

कसं सुरू आहे कोरोना लशीचं ट्रायल; जगात सर्वात पुढे कोणती लस? पाहा एका क्लिकवर

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.

काही मोजक्या कोरोना लशी (corona vaccine) क्लिनकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत, या लशी कधी येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. कोणत्या लशीचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि ही लस प्रत्यक्षात कधी मिळणार पाहा.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : जगभरातील संशोधक आणि औषध उत्पादक कोविड-19 वरील लशीवर संशोधन करत आहेत. अनेक ठिकाणी हजारो लोकांवर लशींच्या चाचण्याही सुरू आहेत. काही कंपन्यांनी लशींचं काम शेवटच्या टप्प्यात आल्याचा दावाही केला आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिकांचा बळी घेणाऱ्या या कोरोना महामारीला रोखणाऱ्या लशीचं काम कुठपर्यंत आलं आहे पाहुया.

कोरोना लशींच्या स्पर्धेत अमेरिका आणि ब्रिटनमधील लस सर्वात पुढे आहेत. अमेरिकन औषध कंपनी फायझर आयएनसी आणि जर्मनीतील बायॉनटेक एसई या कंपन्या एकत्रित काम करत आहेत. अमेरिकेतील बायोटेक मॉडर्ना आयएनसी आणि ब्रिटनची अॅस्ट्राझेनका पीएलसी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांसोबत काम करत आहेत. या लशींमध्ये भारताचीही भागीदारी आहे.या लशींच्या चाचण्यांचे निष्कर्ष येत्या दोन महिन्यांत सर्वांसमोर येऊ शकतात. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीही या शर्यतीत फार दूर नाही.

या चाचण्यामध्ये काय होतं?

या कंपन्या निरोगी व्यक्तींवर प्लासबो म्हणजे सालाइनमधील सोल्युशन आणि नव्या लशींचा काय परिणाम होतो असा तुलनात्मक अभ्यास करत आहेत. ज्यांना डमी औषध देण्यात आलं त्याच्या तुलनेत ज्याला नव्या लशीचा डोस देण्यात आलंय त्याला कोविड-19 चा संसर्ग खूप कमी प्रमाणात होतो का हे तपासण्यासाठी या चाचण्या केल्या जातात. ही सगळी माहिती गुप्त ठेवली जाते. लस दिल्या जाणाऱ्या व्यक्तींना आणि संशोधकांनादेखील कुणाला प्लासबो आणि कुणाला लस दिली आहे ते माहिती नसतं.

लस काम करते आहे हे कसं कळतं?

अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटन आणि जागतिक आरोग्य संघटनेने लशीची परिणामकारकता तपासण्यासाठी काही किमान कसोट्या निश्चित केल्या आहेत. लशीने किमान 50 टक्के प्रभाव दाखवला पाहिजे. औषध कंपन्या आणि संशोधकांपासून ट्रायलचा डेटा लपवलेला असल्याने लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता पडताळण्यासाठी एक स्वतंत्र समिती या चाचण्यांवर लक्ष ठेवून आहे. जर प्लासबोच्या तुलनेत लस खूपच चांगले परिणाम दाखवत असेल तर कंपनी आणीबाणी तत्त्वावर लशीचा वापर करण्यासाठी अर्ज करू शकते. निश्चित लक्ष्य पूर्ण होईपर्यंत हा अभ्यास सुरू राहतो. जर त्या समितीला लस असुरक्षित वाटली तर ही चाचणी बंदही केली जाऊ शकते.

लस सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यापूर्वी प्रशासन तिची सुरक्षितता तपासतील का?

कोणत्याही लशीची परिणामकता आणि सुरक्षितता तपासल्याशिवाय तिला मान्यता दिली जाणार नाही असं अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनानी स्पष्ट केलं आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या लशीच्या डोसमुळे काही दुष्परिणाम होत नाहीत ना याचीही खात्री ते करणार आहेत.

हे वाचा - काय म्हणताय! कोरोनाव्हायरसपासून घोडा वाचवणार माणसांचा जीव; ट्रायलसाठी मंजुरी

यूकेच्या औषध आणि आरोग्यासंबंधी उत्पादनांचं नियंत्रण करणारी एजन्सी यूकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या लशींची तर युरोपिय युनियन युरोपात वापरल्या जाणाऱ्या लशींची तपासणी करणार आहे.

प्रशासन कधी निर्णय कधी घेतील?

जेव्हा कंपन्यांकडे आपल्या लशीचा प्रभाव सिद्ध करणाऱ्या चाचण्यांची पुरेशी माहिती उपलब्ध असेल आणि त्या आणिबाणीच्या वापरासाठी किंवा परवानगीसाठी अर्ज करतील तेव्हा प्रशासन त्याची तपासणी करतील. फायझर/ बायॉनटेक या महिन्यात आपल्या लशीचा परिणाम काय होतो आहे ते जाहीर करतील. मॉडर्नाचा डाटा पुढच्या महिन्यात येऊ शकतो. अॅस्ट्राझेन्का पुढच्या दोन महिन्यांत आपल्या लशीच्या प्रयोगांचा डेटा जाहीर करण्याची शक्यता आहे. यानंतर प्रशासन लशींबाबत निर्णय घेतील.

या पहिल्या प्रमाणित कोरोना लशी ठरतील का?

जरी चीन आणि रशियाने आपल्या देशात कोरोना लशी दिल्या असल्या तरी अमेरिका, ब्रिटनमधील या लशी जगातील पहिल्या प्रमाणित लशी असतील. चीनने जुलै महिन्यातच आपत्कालीन परिस्थितीत हजारो लोकांना लशी दिल्या आहेत. चायना नॅशनल बायोटी ग्रुप (सीएनबीजी), कॅनसिनो बायोलॉजिक्स आणि सिनोव्हॅक अशा चार लशी चीनमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. सिनोव्हॅक आणि सीएनबीजी यांच्या चाचण्यांचा डाटा नोव्हेंबरपर्यंत येईल असं त्यांनी सांगितलं आहे.

हे वाचा - स्वच्छ धुतलेला मास्कही कुणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचा वापरू नका, जाणून घ्या कारण

रशियाच्या गॅमेलेया इन्स्टिट्युटने 40 हजार जणांवर चाचण्या सुरू केल्या असून ऑक्टोबरचा शेवट किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याची माहिती येईल. रशियाने सामान्य जनतेतील हजारो गंभीर रुग्णांना त्यांची लस दिली आहे.

अमेरिकेतील लशीची मान्यता ट्रम्प यांच्यावर अवलंबून?

हजारो नागरिकांना लस दिली जाणार असल्याने तिला मान्यता देण्याआधी तिचा उपयोग आणि धोके तपासले जातील असं अमेरिकेच्या एफडीएनं म्हटलं आहे. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी म्हणजे 3 नोव्हेंबरपूर्वी लस आणण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे अमेरिकेचा आरोग्य आणि मानवी सेवा (HHS) विभाग एफडीएवर कुरघोडी करू शकतो. एफडीएचा सल्ला अमान्य करून लशीला परवानगी देण्याचे अधिकार एचएचएसला आहेत. त्यामुळे राजकीय दबावामुळे तिथं सुरक्षिततेच्या तपासणी आधीच लशीला परवानगी देण्याचा निर्णय ट्रम्प घेऊ शकतात.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus