Love Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी

Love Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी

महात्मा गांधी लग्न करणाऱ्यांना नेहमी निरुत्साही करायचे. सुरुवातीच्या काळात तर गांधीजी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधातच होते.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : महात्मा गांधी लग्न करणाऱ्यांना नेहमी निरुत्साही करायचे. सुरुवातीच्या काळात तर गांधीजी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधातच होते. गांधीजींचा धाकटा मुलगा देवदासनं एक दिवस त्यांना सांगितलं की त्याचं दक्षिण भारतीय ब्राम्हण मुलीवर प्रेम आहे. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी पूर्ण विरोध केला. पण मुलाच्या प्रेमापुढे त्यांना झुकावं लागलं होतं.

देवदास लक्ष्मीच्या प्रेमात पडला होता. देवदास तेव्हा 28 वर्षाचा होता, तर लक्ष्मी 15 वर्षांची. लक्ष्मी गांधीजींच्या वर्ध्याच्या आश्रमात राहायची. त्याच वेळी दोघं जवळ आले. लक्ष्मीचे वडील कुणी साधारण व्यक्ती नव्हते. ते दक्षिण भारतातले काँग्रेसचे मोठे नेते होते. गांधीजींचे जवळचे मित्रही होते. ते होते राजगोपालाचारी.


गांधीजींचा लग्नाला विरोध

देवदासनं आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा फक्त गांधीजींना धक्का बसला नाही तर राजगोपालाचारींनाही बसला होता. दोघांनाही हे लग्न मान्य नव्हतं. 1920मध्ये गांधीजी स्वत: आंतरजातीय लग्नाविरोधात होते. त्यांना वाटायचं, हिंदू धर्म आणि समाजासाठी अशी लग्न योग्य नाहीत. पण नंतर 10 वर्षांनी त्यांची मतं बदलली. त्यांनी आंतरधर्मीय लग्नांचं समर्थन करायला सुरुवात केली. अनेक लग्नांना आशीर्वादही दिले.

बनियाचा मुलगा ब्राम्हण मुलीशी कसं लग्न करणार?

वर्ष होतं 1927. देवदास लग्नाचा प्रस्ताव घेऊन जेव्हा वडिलांकडे गेला तेव्हा गांधीजी म्हणायचे बनिया जातीचा मुलगा ब्राम्हण मुलीबरोबर कसं लग्न करेल?

राजगोपालाचारींना देवदास आवडायचा. तरीही ते लग्नाच्या विरोधात होते. देवदास तर लक्ष्मीसाठी वेडापिसाच झाला. पुन्हा लक्ष्मीही वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करायला तयार नव्हती.


गांधीजींनी पत्र लिहिलं

देवदासची स्थिती गांधीजींना बघवत नव्हती. त्यावेळी त्यांनी त्यांचे कौटुंबिक मित्र सुरेंद्र यांना पत्र लिहिलं. सुरेंद्र यांचा प्रभाव देवदासवर होता, ते राजगोपालाचारींच्या जवळ होते.

गोपालकृष्ण गांधींच्या "माई डियर बापूः लेटर्स फ्राम सी राजगोपालाचारी टू मोहनदास करमचंद गांधी' पुस्तकात हे पत्र आहे.

गांधीजी लिहितात, लक्ष्मीवर काही परिणाम होत नाही. पण देवदासची स्थिती बघवत नाहीय. तो सारखा लक्ष्मीचंच नाव घेतोय. राजाजीही या लग्नाविरोधात आहेत. देवदास माझं म्हणणं मान्य करतोय, पण त्याचा आत्मा विद्रोह करतोय. त्याला वाटतंय मी या लग्नाच्या विरोधात आहे. म्हणून तो नाराज आहे. मला माहीत नाही काय होईल ते, पण तू त्याला शांत कर. मदत कर. त्याला आपल्या धर्माबद्दल सांग. मी त्यालाही पत्र लिहितोय. त्याच्या डोक्यात लालसा उत्पन्न होतेय. ती अनेक रोगांचं मूळ आहे. अशुद्ध लालसा व्यक्तीला संपवून टाकते. प्रेम करणं चुकीचं नाही, पण लैंगिक इच्छा बाळगणं त्याला संपवून टाकेल.

पाच वर्ष एकमेकांपासून दूर राहिले

गांधीजींनी हे पत्र श्रीलंकेहून लिहिलं. राजगोपालाचारी यांनाही त्यांनी पत्र पाठवलं. दोघांनी लग्न टाळण्यासाठी एक शक्कल सुचवली. त्यांनी देवदासला लक्ष्मीपासून 5 वर्ष दूर राहायला सांगितलं. पाच वर्ष तुझं प्रेम टिकतं का ते पाहायला सांगितलं.

गांधीजी श्रीलंकेहून परतले आणि ओडिसा टूरवर गेले. त्यांच्या बरोबर गेलेली बा परत आश्रमात आली. तिथे देवदास होता. त्याचं आॅपरेशन झालेलं. बा त्याची काळजी घ्यायची. पण स्वत: बा या लग्नाच्या विरोधात होती.

गांधीजींचं मन बदललं तशी राजगोपालाचारींनीही दिला होकार

देवदासनं 5 वर्ष लक्ष्मीपासून स्वत:ला दूर ठेवलं. लक्ष्मी आश्रमात यायची, पण देवदासला भेटायची नाही. दरम्यान आंतरजातीय विवाहाबद्दल गांधीजींचं मतपरिवर्तन झालेलं.

आता तर ते म्हणायचे, अशा प्रतिबंधांमुळे हिंदू धर्म कमजोर होईल. राजगोपालाचारीही देवदासला जावई म्हणून पाहायला लागले.


साध्या पद्धतीनं झालं लग्न

अखेर जून 1933मध्ये गांधीजी आणि राजगोपालाचारी यांनी हे लग्न करून देऊ असा निर्णय घेतला. देवदास आणि लक्ष्मीसाठी अजून आनंदाची गोष्ट काय असणार? कस्तुरबांनीही जुने विचार मागे टकून लग्नाला मान्यता दिली. नंतर तर कस्तुरबा जास्त वेळ देवदास आणि लक्ष्मीच्या घरीच राहायच्या.

देवदास हिंदुस्तान टाइम्सचे संपादक बनले

लग्न पुण्यात झालं. अगदी साध्या पद्धतीनं. लग्नाला कुटुंबातली माणसं आणि काँग्रेसचे सीनियर नेतेही उपस्थित होते. देवदास-लक्ष्मीचं आयुष्य चांगलं गेलं. पण देवदास यांचं वयाच्या 57व्या वर्षी निधन झालं. त्याआधी ते हिंदुस्थान टाइम्सचे संपादक होते. पत्रकार म्हणून नेहमीच त्यांचं कौतुक होत असे.

देवदास यांचं कुटुंब

देवदास-लक्ष्मी यांना 3 मुलगे आणि 1 मुलगी झाली. गोपालकृष्ण गांधी, राजमोहन, रामचंद्र आणि तारा गांधी. गोपालकृष्ण बंगालचे राज्यपाल होते. राजमोहन लेखक आणि पत्रकार होते, तसंच ते राज्यसभेचे सदस्य होते. रामचंद्र गांधी दर्शनशास्त्रचे प्रोफेसर होते. मुलगी तारानं अर्थशाल्त्री ज्योती भट्टाचार्यशी लग्न केलं होतं. त्या गांधी स्मृतीशी जोडल्या होत्या. गांधीजींच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढींमध्ये प्रेमविवाह सहज झाले. त्यांच्या अनेक पुढच्या पिढ्यांनी परदेशात लग्नं केली.

-संजय श्रीवास्तव

( अनुवाद - सोनाली देशपांडे )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या