नवी दिल्ली, 08 एप्रिल : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट (Second Wave of Corona virus) आली आहे. ही लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अगदी वेगळी आहे, असं सांगितलं जातं. पण वेगळी म्हणजे नेमकी कशी. कोरोना लाटेच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नेमका काय फरक आहे, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.
कोरोनाची पहिली लाट आणि कोरोनाची दुसरी लाट या दोन्ही लाटांमध्ये विषाणूचं रूप, संसर्गाचा वेग, लक्षणं या सर्वातच खूप मोठा फरक आहे. कसं ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोरोना विषाणूचे नवे प्रकार
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आढळणारा कोरोनाचा नवीन विषाणू सार्सकोव्ह-2 पासूनच (Sarscove-2) म्युटेट झाला आहे. आतापर्यंत या विषाणूचे अनेक प्रकार आले असून, ते अधिक शक्तिशाली आहेत. नवीन रूपातील काही विषाणू जीवघेणे आहेत तर काही संसर्ग वेगानं पसरवण्यासाठी सक्षम असून त्याचा परिणाम पूर्वीच्या विषाणूसारखाच आहे. गेल्या एका वर्षात कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्येही फरक पडला आहे.
हा कोणता प्रकार आहे?
कोरोना संसर्गाच्या या दुसर्या लाटेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकारात नवीन काय आहे, याबाबत तज्ज्ञांचं मत असं आहे की, नवीन कोरोना विषाणू हा ब्राझील (Brazil) आणि केंटचा एक प्रकार आहे. हा विषाणू अधिक लक्षणं दाखवतो आणि शरीरातील अनेक अवयवांवर अधिक प्राणघातक हल्ले करतो. याशिवाय काही वेगळी लक्षणंही देशातील कोरोना रुग्णांमध्ये आढळली आहेत.
नवीन लक्षणे कोणती आहेत?
नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ताप, अंगदुखी, खोकला, श्वास घेण्यास अडचण इत्यादी पूर्वीच्या लक्षणांसह पोटात दुखणं, उलट्या होणं, मळमळणं, सर्दी अशी लक्षणंही दिसत आहेत. तर काही रुग्णांमध्ये कोरोनाची अशी सामान्य लक्षणंदेखील दिसत नाहीत.
रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे
कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून बरेच डॉक्टर आता लोकांना संपूर्ण लक्षणं दिसत नसली तरीही कोविड चाचणी करून घेण्याचा सल्ला देत आहेत. कारण बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणं दिसत आहेत.
हे वाचा - कोरोना लशीमुळेच रक्ताच्या गुठळ्या होतायेत? EU Drug Regulator ने दिली मोठी माहिती
मात्र आताचा विषाणू अधिक घातक असल्यानं गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची अधिक आवश्यकता भासत आहे.
यंत्रणेवर दुहेरी ताण
अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर (Health System) दुहेरी ताण पडत आहे. एकीकडे चाचणी करणार्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं रहात आहे. डॉक्टरांना फुफ्फुसे, श्वसन प्रणाली, पोट इत्यादीसारख्या अनेक तक्रारींवर उपचार कारावे लागत आहेत.
पोटाच्या तक्रारी वाढत आहेत
या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने पोटदुखी (Stomach ache) हे लक्षण आढळून येत आहे. पूर्वीपेक्षा आता ही तक्रार जास्त रुग्ण करत आहेत. डॉक्टरांच्या मते हा नवीन विषाणू फुफ्फुसांशिवाय आता पचन यंत्रणेवरदेखील आघात करत आहे. आता कोविड रुग्णांमध्ये अतिसार, पोटदुखी, उलट्या, मळमळ यासारख्या पोटाशी संबंधित तक्रारी सामान्य झाल्या आहेत.
वाढता व्हायरल लोड
रुग्णाच्या रक्तातील सार्स कोव्ह -2 चे प्रमाण व्हायरल लोड (Viral Load) दर्शवतं. कोविड-19 च्या चाचणीत याचीच तपासणी केली जाते. व्हायरल लोड अधिक असण्याची अनेक कारणं असू शकतात. परंतु बहुतांश वेळा विषाणूचं प्रमाण अधिक असल्यानेच हा लोड वाढल्याचं स्पष्ट होतं. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोविड-19 च्या रुग्णांमध्ये व्हायरल लोडचे प्रमाण अधिक आढळून येत आहे.
कोरोनाची लस
सध्यातरी कोरोनाची लस (Corona Vaccine) प्रभावी ठरत असल्याचं दिसत आहे. परंतु विषाणूच्या नवीन प्रकाराबाबत या लशी इतक्याच प्रभावी ठरतील का, याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. कोरोनाचा नवा विषाणू लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजवर (Antibodies) मात करतो का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.
हे वाचा - 'जे अनुभवलं त्यामुळे अजून झोप लागत नाही..', BKC कोव्हिड सेंटरचं भयाण वास्तव?
या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क (Mask) घालणे, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणं (Social Distancing) या नियमांचे महत्त्व आणखी वाढलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus