Home /News /lifestyle /

भारतीय गुगलवर सर्च करत आहेत Malana Cream; नेमकं हे आहे तरी काय?

भारतीय गुगलवर सर्च करत आहेत Malana Cream; नेमकं हे आहे तरी काय?

सध्या भारतीयांकडून गुगलवर Malana Cream सर्चिंग होताना दिसतं आहे.

नवी दिल्ली, डिसेंबर : नुकतंच अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं (Narcotics Control Bureau) अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाशी संबधित ड्रग्ज (Drugs) प्रकरणाची चौकशी करताना दोघांना अटक केली. 9 डिसेंबर रोजी या दोन व्यक्तींना पकडलं आणि त्यांच्याकडून तब्बल 2.5 कोटींचं मलाना क्रीम (Malan Cream) जप्त करण्यात आलं आहे. त्यानंतर  सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, ते या मलाना क्रीमनं. याबाबतचा गुगलवरील सर्च अक्षरशः कैकपटींनी वाढला. काय आहे मलाना क्रीम ? मलाना क्रीम हे हशीश (Hashish) म्हणजेच ज्याला हॅश किंवा चरस (hash/charas) असंही म्हणतात, त्याची एक विशिष्ट जात आहे. हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुलू जिल्ह्यातील मलाना खोऱ्यात (Malana Valley) याचं उत्पादन घेतलं जातं.  विशिष्ट वास आणि पोत असणारा हा हशीशचा जगातील एक सर्वोत्तम प्रकार आहे. ठराविक वातावरणातच याचं उत्पादन होतं. यात मोठ्या प्रमाणात THC म्हणजे टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (Tetrahydrocannabinol) असतं. साधारण 3 ते 10 हजार रुपये दहा ग्रॅम या दरानं याची विक्री होते. दिसताना हे मातीसारखे दिसतं पण याची नशा उच्च दर्जाची असल्यानं या क्रीमी हॅशची आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रचंड मागणी असते. मलाना कुठे आहे? मलाना (Malana) हे कुलु खोऱ्यातील एक दुर्गम गाव आहे. अनेक वर्षे अज्ञात असलेलं हे गाव 20 व्या शतकाच्या मध्याला हिप्पी ट्रेलचा भाग बनल्यानंतर एकदम उजेडात आलं. याच्या आजूबाजूचा डोंगराळ प्रदेश ड्रग टुरिझमचं (Drug Tourism) केंद्र बनला. खास ड्रग्ज आणि दर्जेदार भांग इथं सहजपणे उपलब्ध होत असल्यानं हा भाग चांगलाच प्रसिद्ध झाला. 2007 मध्ये इथले रस्ते चांगले झाल्यानं गेल्या काही वर्षांत या भागात देशांतर्गत पर्यटनही वाढलं आहे. मलाना क्रीम कायदेशीर आहे का? अर्थातच नाही. हशीश हे हिमाचल प्रदेशात भांग म्हणून ओळखलं जातं तरीही मलाना क्रीमचं उत्पादन आणि सेवन याला भारतात कायदेशीरदृष्ट्या मनाई आहे. गांजा किंवा भांगेच्या (Cannabis) झाडापासून हे बनवलं जात. या झाडाची पानं हाताने चुरगाळून त्याचा अर्क काढला जातो. हिमाचल प्रदेशातील मलानासारख्या भागात ही झाडं नैसर्गिकरीत्या येत असल्यानं इथं कायद्याची अंमलबजावणी करणं अवघड होतं. बेकायदेशीररित्या कोणी शेतात गांजाच्या झाडाची लागवड केली आहे का? यावर सुरक्षा व्यवस्था लक्ष ठेवून असते. गांजा/हशीश भारतात कायदेशीर आहे का? मारीजुआना किंवा गांजाचे उत्पादन आणि सेवन भारतात कायद्याने गुन्हा मानला जातो. 1985 मध्ये भारतानं अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक पदार्थ कायदा (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act-1985 ) मंजूर केला. याद्वारे हशीश, चरस विकणं गुन्हा ठरवला, पण होळी आणि शिवरात्रीसारख्या सणांना मोठ्या प्रमाणात सेवन केल्या जाणाऱ्या भांगेला यातून वगळलं. याच्या विक्रीवरील निर्बंध त्या-त्या राज्यांवर सोपवण्यात आले. सुशांतसिंह राजपूत केसशी काय आहे मलाना क्रीमचा संबंध ? बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर याची तिहेरी स्तरावर चौकशी सुरू झाली. सुशांत मारीजुआनाचे सेवन करत असल्याचं उघड झाल्यावर या प्रकरणातील ड्रग अँगलवर एनसीबीने (Drug Angle) लक्ष केंद्रित केलं. यातील व्हॉटसअॅप चॅटवरून बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं सेवन आणि व्यापार होत असल्याचं स्पष्ट झालं, या प्रकरणातून सुशांतची गर्लफ्रेंड रेहा चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतच्या स्टाफमधील काही कर्मचारी आणि आणखी काही जणांना एनसीबीनं (NCB) Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act अंतर्गत ताब्यात घेतलं. या वेळी मलाना क्रीमसह अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडून याची ओळख रिगल महकल (Regel Mahakal) अशी सांगण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती अनुज केसवानी याला ड्रग्ज पुरवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनुज केसवानी हा इतरांना ड्रग्ज पुरवत असल्याने त्याला सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, असं एनसीबीनं म्हटलं आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Drugs, Google

पुढील बातम्या