मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'या' रुग्णाला जखम झाल्यास थांबत नाही रक्त! नेमका काय आहे हिमोफिलिया आजार?

'या' रुग्णाला जखम झाल्यास थांबत नाही रक्त! नेमका काय आहे हिमोफिलिया आजार?

हिमोफिलिया आजाराची लक्षणं कोणती?

हिमोफिलिया आजाराची लक्षणं कोणती?

हिमोफिलिया म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती, या विकाराच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, आदींविषयीची माहिती अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या हिमॅटॉलॉजी विभागाचे वरिष्ट कन्सल्टंट डॉ. अनुप पी. यांनी दिली आहे.

    मुंबई, 25 मे : हिमोफिलिया हा रक्ताशी संबंधित गंभीर आजार आहे. रक्तस्रावाच्या या विकाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दर वर्षी 17 एप्रिल हा दिवस जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 'वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया'ची थीम `सर्वांचा सहभाग : काळजीचे जागतिक मानक म्हणून रक्तस्राव प्रतिबंध` अशी आहे.

    हिमोफिलियाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि या रक्तस्राव विकाराचं उत्तम व्यवस्थापन निश्चित करण्यासाठी समुदायाने एकत्रित येऊन काम करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. हिमोफिलिया म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती, या विकाराच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, आदींविषयीची माहिती अ‍ॅस्टर सीएमआय हॉस्पिटलच्या हिमॅटॉलॉजी विभागाचे वरिष्ट कन्सल्टंट डॉ. अनुप पी. यांनी दिली आहे.

    हिमोफिलिया म्हणजे काय?

    हिमोफिलिया हा एक दुर्मीळ रक्तस्राव विकार असून, यात रक्त व्यवस्थित गोठलं जात नाही. संबंधित रुग्णाला एखादी दुखापत झाली तर रक्तस्राव थांबवण्यासाठी रक्तातल्या प्लेटलेटसोबत आवश्यक क्लॉटिंग घटक नसल्याने अनेकदा जखमेतून जास्त काळ रक्तस्राव होतो. डब्लूएचएफने दिलेल्या माहितीनुसार, 1000 व्यक्तींपैकी अंदाजे एका व्यक्तीला जन्मतः हा विकार असतो. हा आजार आनुवंशिक असल्याचं दिसून येतं. तसंच स्त्रियांपेक्षा सामान्यतः पुरुषांमध्ये ही स्थिती दिसते.

    हिमोफिलियाविषयी कोणत्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे?

    या विकाराविषयीच्या काही गोष्टी माहिती हव्यात. कारण यामुळे माहितीत भर पडेल आणि संबंधित रुग्णाला वेळेवर मदत करू शकाल.

    1. हिमोफिलिया ही एक आनुवंशिक स्थिती आहे. त्यामुळे मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांमध्येही रक्तस्राव होऊ शकतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो.

    2. दर पाच हजारांपैकी अंदाजे एका पुरुषाला हिमोफिलिया होतो. मुलांमध्ये ही स्थिती अधिक सामान्य आहे. कारण हा वारसा बहुतेकदा आईकडून तिच्या मुलाला मिळतो.

    3. हिमोफिलियाचे तीन प्रकार आहेत.

    a. हिमोफिलिया ए - हा रक्तस्राव विकाराचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. तो क्लोटिंग फॅक्टर VIIIच्या कमतरतेमुळे होतो.

    b. हिमोफिलिया बी - हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतली कमतरता दर्शवतो.

    c. हिमोफिलिया सी - हा हिमोफिलियाचा सौम्य प्रकार आहे. तो क्लोटिंग फॅक्टर XIच्या कमतरतेमुळे होतो.

    4. सांध्यांमध्ये वारंवार रक्तस्राव होणं ही हिमोफिलियातली सर्वांत मोठी समस्या आहे. कारण यामुळे सांध्यांचा ऱ्हास होऊ शकतो.

    या आजाराची लक्षणं कोणती?

    हिमोफिलियाची वैद्यकीय वैशिष्ट्यं रुग्णाच्या रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठीच्या घटकांची तीव्रता आणि कमतरतेवर अवलंबून असतात. जास्त रक्तस्राव हा सर्वांत सामान्य घटक असला, तरी हिमोफिलियाच्या रुग्णांमध्ये खालील लक्षणं जाणवू शकतात.

    - हिरड्यांमध्ये रक्तस्राव

    - प्रदीर्घ पीरियड्स

    - त्वचेवर सहजपणे जखमा होणं

    - जखमांमुळे जास्त रक्तस्राव होणं

    - वारंवार नाकातून रक्त येणं आणि ते थांबण्यास बराच कालावधी लागणं

    - सांध्यात वेदना आणि सांधे आखडणं

    - मूत्र किंवा मलाद्वारे रक्त पडणं

    याशिवाय हिमोफिलिया असलेल्या रुग्णाच्या कवटीच्या आत रक्तस्राव होत असेल तर खालील लक्षणं दिसू शकतात.

    - तीव्र डोकेदुखी

    - उलट्या होणं

    - मानेत वेदना होणं

    - अशक्तपणा

    - दुहेरी किंवा अंधुक दृष्टी

    - समन्वय आणि संतुलन कमी होणं

    - निद्रानाश

    - आकडी येणं

    रुग्णाची स्थिती कशी ओळखाल आणि त्यावर उपचार पर्याय कोणते आहेत?

    सामान्य रक्त तपासणीच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला हिमोफिलिया आहे की नाही, हे समजू शकते. तसंच यातून आजाराची तीव्रता लक्षात येते. सध्या तरी हा आजार बरा करण्यासाठी कोणताही इलाज नाही. तथापि, नसलेला क्लोटिंग फॅक्टर ताबडतोब रिप्लेस करण्यासाठी इंजेक्शन दिल्यास रक्तस्राव थांबवण्यास मदत होते.

    हिमोफिलिया असलेल्या रुग्णांनी जीवनशैलीत काही बदल करावा. शारीरिक दुखापती टाळण्यासाठी खेळणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. याशिवाय वेळेवर औषधोपचार घेतले तर या आजाराचे रुग्ण चांगलं जीवन जगू शकतात.

    First published:
    top videos

      Tags: Health, Health Tips, Life18, Lifestyle