मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर महिलेचा मृत्यू; पण बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी म्हणजे काय?

बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर महिलेचा मृत्यू; पण बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी म्हणजे काय?

 बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी

बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी

बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कशी असते, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, ते जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 डिसेंबर :    बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि आनुवंशिकता या कारणांमुळे जगभरात लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. आज लाखो व्यक्ती लठ्ठपणाचा सामना करत आहेत. लठ्ठपणामुळे हृदयविकार, फॅटी लिव्हर, डायबेटीस यांसारखे गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम, डाएट, जिम वर्कआउट आदी गोष्टी करण्याकडे अनेकांचा कल असतो; पण यामुळे वजन लवकर नियंत्रणात येतंच असं नाही. त्यात एखादा आजार असल्यास वजन लवकर नियंत्रणात येणं अत्यावश्यक असतं. अशा वेळी डॉक्टर शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आता बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचा अवलंब केला जातो. वजन कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया सुरक्षित असली, तरी त्यामुळे काही प्रमाणात दुष्परिणामदेखील होतात. तुर्कीत असाच प्रकार एका महिलेसोबत घडला. बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कशी असते, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, ते जाणून घेऊ या.

वजन कमी करण्यासाठी बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी अत्यंत सुरक्षित मानली जाते; पण या शस्त्रक्रियेचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. तुर्कीत एका महिलेचा या सर्जरीमुळे मृत्यू झाला आहे. 30 वर्षांची ही महिला आयर्लंडमधल्या डब्लिनमधून आली होती. तिच्यावर बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी करण्यात आली; पण तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, या सर्जरीनंतर दुष्परिणाम होण्याची शक्यता खूपच कमी असते. यानंतर रुग्णाला आरोग्याच्या निकषांचं तंतोतंत पालन करावं लागतं. तसंच जीवनशैलीत सुधारणा करावी लागते.

हेही वाचा -  तेल नाही तर फक्त पाण्यानेच वाढतील केस; करून पाहा हा जबरदस्त उपाय

गॅस्ट्रिक बायपासव्यतिरिक्त वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेला बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी म्हणतात. या सर्जरीदरम्यान, संबंधित व्यक्तीच्या पचनसंस्थेत काही बदल केले जातात आणि या बदलांच्या मदतीने वजन कमी केलं जातं. जेव्हा आहार आणि व्यायामामुळेदेखील वजन कमी होत नाही आणि लठ्ठपणामुळे गंभीर समस्या जाणवत असतील, तेव्हा बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी केली जाते. काही शस्त्रक्रियांमध्ये व्यक्तीची अन्न मर्यादा कमी केली जाते, तर इतर प्रकारच्या शस्त्रक्रियेत व्यक्तीच्या शरीरातली पोषक द्रव्यं शोषून घेण्याची क्षमता कमी केली जाते. काही शस्त्रक्रियांमध्ये या दोन्ही गोष्टी केल्या जातात. बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचे अनेक प्रकार असले, तरी सर्जन सामान्यतः तीन प्रकारांचा वापर करतात. यात रॉक्स-एन-वाय गॅस्ट्रिक बायपास, व्हर्टिकल स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी आणि लॅप्रोस्कोपिक अ‍ॅडस्टेबल गॅस्ट्रिक बॅंडिंग यांचा समावेश आहे.

ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे, त्यांना बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीमुळे उपयोग होतो; पण काही रुग्णांमध्ये बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. सर्जरीनंतर संबंधित रुग्णाला दीर्घ काळ या सर्जरीचा फायदा व्हावा, यासाठी जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात.

हेल्थलाइनने दिलेल्या माहितीनुसार, बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर आरोग्यशी निगडित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीदरम्यान किंवा सर्जरीनंतर काही जोखमीचे घटक दिसून येतात. त्यात प्रामुख्याने अति रक्तस्राव होणं, भुलीचा उलट परिणाम, रक्ताच्या गुठळ्या होणं, फुफ्फुसात समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होणं, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टीममध्ये गळती होणं या घटकांचा समावेश होतो. या सर्जरीमुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीनंतर काही दुर्मीळ केसेसमध्ये काही लक्षणं दिसून येऊ शकतात. त्यात आतड्यांमध्ये त्रास, स्टोन, हार्निया, ब्लड शुगर लेव्हल कमी होणं, कुपोषण, अल्सर, उलट्या होणं, अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हणजेच अ‍ॅसिडिटी, सर्जरी करण्याची पुन्हा गरज पडणं, रेअर केसेसमध्ये मृत्यू यांचा समावेश असतो.

ज्या व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत आणि ज्यांना आरोग्याशी निगडित अनेक गंभीर समस्या आहेत, त्यांच्यावर बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी केली जाते. या समस्यांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, स्लीप अ‍ॅप्निया, डायबेटीस टाइप-2 यांचा समावेश आहे. लठ्ठपणा असलेल्या प्रत्येक व्यक्तीची बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी केली जात नाही. ही सर्जरी करण्यासाठी काही वैद्यकीय निकष पूर्ण करावे लागतात. ज्या व्यक्तींचं वजन व्यायाम आणि डाएटच्या माध्यमातून कमी होत नाही, त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाते.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss