नवी दिल्ली, 11 जून : सध्याच्या काळात स्मार्टफोन हा सर्वांचा हक्काचा मित्र झाला आहे. तसंच, गुगल हा स्मार्टफोनवरचा (Smartphone) महत्त्वाचा साथी. कशाचीही मदत लागली, तर आधी स्मार्टफोन आणि गुगलची मदत घेणाऱ्यांची संख्या आजच्या काळात खूपच वाढलेली आहे. अर्थातच, ही दोन्ही साधनं तितकीच प्रभावी आहेत, म्हणूनच त्यांचा वापर इतक्या प्रमाणात केला जातो, हेही तितकंच खरं. आपण गुगलवर काय काय पाहिलं, काय काय शोधलं, याची सर्च हिस्ट्री ब्राउझरवर सेव्ह झालेली असते.
आपल्याला वाटलं, तर ती हिस्ट्री डिलीट (Google Search History) करण्याचा पर्यायही आपल्याकडे उपलब्ध असतो; मात्र ती हिस्ट्री आपल्याकडून डिलीट केली, तरी सर्व्हरवर कुठे ना कुठे तरी त्याची नोंद झालेली असतेच. अशा नोंदींच्या आधारे अभ्यास करून वेळोवेळी काही निष्कर्ष काढले जात असतात. कुठल्या वयोगटातल्या, कुठल्या देशातल्या व्यक्ती काय शोधत आहेत, स्त्री आणि पुरुष काय काय शोधण्यासाठी गुगलचा वापर करतात, अशा प्रकारची माहिती गुगलच्या ट्रेंड्सवर (Google Search Trends) उपलब्ध असते. अशा प्रकारे अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून विवाहित महिला (Married Women Search on Google) गुगलवर सर्वाधिक कशाचा शोध घेतात, याची माहिती समोर आली आहे. 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
विवाहित महिला गुगलवर काय शोधत असतील, हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असू शकेल. ते जाणून घेऊ या. विवाहानंतर आपल्या नव्या कुटुंबासमोर स्वतःला कसं सादर करायला हवं, त्या कुटुंबात म्हणजे आपल्या सासरी कसं जुळवून घ्यावं आणि त्या कुटुंबाचा एक भाग कसं बनून जावं, याबद्दलची माहिती विवाहित महिला गुगलवर शोधत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच, आपल्या कुटुंबाची जबाबदारी कशी सांभाळावी, याचे मार्गही या महिला शोधत असताना आढळतात. ज्या महिला लग्नानंतर काम म्हणजेच व्यवसाय करतात, अशा महिला आपला बिझनेस विवाहानंतर कसा चालवावा आणि कुटुंब आणि बिझनेसची जबाबदारी एकत्रितरीत्या कशी सांभाळावी, याची माहिती गुगलवर शोधताना आढळतात.
गुगलच्या डेटाचं विश्लेषण केल्यानंतर असंही आढळलं, की विवाहित महिला गुगलवर काही शोधतानाही आपल्या पतीचा (Husband's Choice) विचार करण्याचं प्रमाण जास्त आहे. आपल्या पतीला काय आवडतं किंवा काय आवडत नाही, त्याचे चॉइस कसे आहेत हे कसं ओळखावं, अशा आशयाचे प्रश्न या महिला गुगलवर विचारतात. आपल्या पतीचं मन कसं जिंकावं, त्याला खूश कसं करावं याबद्दलचे प्रश्न तर या महिला गुगलला विचारतातच; पण आपल्या पतीला मुठीत कसं ठेवावं, त्यांना 'जोरू का गुलाम' कसं बनवावं, असं विचारणाऱ्या विवाहित महिलांचं प्रमाणही बरंच आहे. मूल जन्माला घालण्याची योग्य वेळ कधी आणि कोणती असू शकते, या प्रश्नाची उत्तरंही विवाहित महिला गुगलवर शोधत असल्याचं या गुगलच्या डेटामध्ये आढळलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.