नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : हिवाळ्यात रक्तदाबाच्या रुग्णांच्या आरोग्याच्या समस्या वाढतात. यामुळं हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोकाही वाढतो. रक्तदाबात (blood pressure) सतत चढ-उतार होत असतील तर काही बाबी लक्षात ठेवा. तुमच्या लहान-सहान चुकांमुळं हा धोका वाढू शकतो. शिवाय, तुम्ही आधीच हृदयरोगी (heart patient) असाल, तर तुम्ही अजिबात निष्काळजी राहू नका, असं झी न्यूजनं दिलेल्या बातमीत सांगण्यात आलंय.
सर्दी टाळा
हिवाळ्यात जास्त प्रवास टाळा. थंडीमुळं हृदयाच्या धमन्या आकसतात आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. यासाठी हृदयाला अधिक रक्तपुरवठा आवश्यक असतो. जर एखाद्याला आधीच हार्ट ब्लॉकेज असेल तर त्यामुळं हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. खूप थंडी असताना सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडू नका. विशेषतः सकाळी छातीत थंडी भरेल असं काही होऊ देऊ नका. हिवाळ्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तेव्हाच फिरायला जा. थंड पाण्याऐवजी कोमट पाण्यानं आंघोळ करा आणि आंघोळ करून लगेच घराबाहेर पडू नका.
औषधांचा डोस
तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास औषधं बदला. हिवाळ्यात रक्तदाब अधिक वाढतो आणि अशा वेळी औषधांचा कमी असलेला डोस कामी येत नाही. त्याचबरोबर ज्या लोकांना शुगर आणि बीपीच्या तक्रारी आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं बीपी आणि शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय करावेत. या दोन्हींच्या पातळीवर नियंत्रण न राहिल्यानं हृदयावर ताण येतो, ज्यामुळं हृदयक्रिया बंद पडू शकते.
हे वाचा -
केस फार पांढरे झालेत? तर ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल समस्येपासून मुक्ती
अयोग्य आहार
हिवाळ्यात बहुतेक समस्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळं उद्भतात. रक्तदाबाची समस्या असेल तर या ऋतूत आहाराची विशेष काळजी घ्या. पचायला जड अन्न खाऊ नका. तेल आणि मसाले कमी प्रमाणात खा. थंडीमुळं शरीरात अॅसिडिटी वाढतं. यामुळं हृदयात गुठळ्या तयार होण्याची समस्या देखील होऊ शकते. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्या. त्यामुळं शरीरातील आम्लता कमी होईल.
हे वाचा -
Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत
पुरेसं पाणी प्या
हिवाळ्यात तहान कमी लागते. त्यामुळं पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र, या बाबीवर लक्ष ठेवून योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवं. त्यामुळं शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. बडीशेप पाण्यात उकळून दिवसभर थोडं थोडं प्या. तुळस, पुदिना, धणे, दालचिनीचं पाणीही पिऊ शकता. गाजर, बीट आणि सफरचंदाचा रसही फायदेशीर ठरेल.
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.