मुंबई, 18 एप्रिल: आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद असा अनुभव आणि क्षण असतो. आई होण्याचा आनंद तर असतोच पण सोबत एक भीतीही मनात असते. पहिल्यांदाच आई होत असताना बाळाची (Baby care) चिंता लागून राहिलेली असते. बाळाचं रडणं, झोपणं, खाणं-पिणं याची कशी काळजी (Baby care tips) घ्यावी हे समजत नाही. बाळाचा आहार (Baby food) हा खूप महत्त्वाचा असतो. कारण यावर त्याचा विकास होणार असतो. बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी त्याला पोषक आहार देणं अतिशय गरजेचं आहे.
आपल्या बाळाला योग्य आणि पोषक आहार मिळावा याकरिता प्रत्येक पालक प्रयत्न करत असतात. बाळाचं योग्य पोषण, खाण्यापिण्याची वेळ, बाळाचा आहार याबाबत पालकांना अनेक प्रश्न भेडसावू शकतात. याबाबत खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमधील बालरोग आणि नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. सुरेश बिराजदार यांनी मार्गदर्शन केलं आहे.
- तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिल्या काही महिन्यांपर्यंत आपल्या बाळाला घन पदार्थ देणं टाळा. आपलं बाळ घन पदार्थ खाण्यायोग्य होईपर्यंत त्याला केवळ आईचं दूध द्यावं. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही गाईचे दूध अथवा पावडरचं दूध देऊ शकता. स्वतःच्या मर्जीने गाईचे दूध अथवा पावडरचे दूध पाजणं टाळा
- आईचं दूध बाळासाठी सर्वोत्त्तम ठरतं. बाळाला आवश्यक ती सर्व पोषक तत्वं ही आईच्या दुधातून मिळतात. सुरुवातीचे 12 महिने आईने दर 2 तासांनी बाळाला स्तनपान दिलं पाहिजे. आपल्या बाळाला भूक लागणं त्यासंबंधीच्या त्याच्या संकेतांना समजून त्यानुसार बाळाला स्तनपान करणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी आपल्या बाळाला आहार देताना आपल्याला काही शंका किंवा समस्या असल्यास डॉक्टरांशी बोला.
हे वाचा - OMG! छातीत नाही पाठीवर धडधडतं हदय; बॅगेत आपलं Heart घेऊन फिरते ही महिला
- आपल्या बाळाला पुरेसा आहार देत आहात का याची खात्री करा, बाळाला स्तनपान करणं आवश्यक असून त्याची टाळाटाळ करू नका. पोषण आहार घेण्याच्या सवयी या मुलाच्या गरजेनुसार बदलू शकतात त्याबाबत चिंता करू नये.
- जर आई बाळाला स्तनपान देऊ शकत नसेल तर बाळाला दुधाचा योग्य पुरवठा करण्यासाठी ब्रेस्ट पंपचा वापर करावा. पंप केलेलं आईचं दूध योग्य तापमानात योग्य प्रकारे साठवून बाटलीच्या सहाय्याने बाळांना दिलं जाऊ शकतं.
- जेव्हा आईचं दूध पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसेल अशावेळी बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. हवाबंद डब्यातील फळांचा रस अथवा इतर पेय बाळाला किमान एक वर्ष तरी देऊ नका.
- बाळाच्या वाढीनुसार तसंच त्यांच्या विकासानुसारच बाळाला सहा महिन्यांनंतर घन पदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. बाळाला स्वत:हून बसू द्या, एखादा खाण्याचा पदार्थ दिसल्यास त्यांना तोंड उघडण्याचा प्रयत्न करू द्या. एखादा पदार्थ नको असल्यास ते स्वतः डोके फिरवून त्यास नकारार्थी प्रतिसाद देतात. घन पदार्थांची ओळख करून देताना सुरुवातीला थोडया थोड्या प्रमाणापासून प्रारंभ करा. शेंगदाणे, पॉपकॉर्न, द्राक्षे किंवा तोंडात अडकणार्या मोठ्या खाद्यपदार्थाचे तुकडे देऊ नका. मऊ शिजवलेले किंवा मॅश केलेले बटाटे, व्हेज, चीज, केळी आणि मटार द्या.
हे वाचा - सुंदर, चमकदार केस हवेत ? मग जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
- आपल्या बाळाला मध देऊ नका कारण यामुळे बाळाला विषबाधा होण्याची शक्यता असते. जेव्हा आपल्या मुलाला भूक नसलेली असेल तेव्हा आग्रहान एखादी वस्तू खाऊ घालू नका. या निरोगी खाण्याच्या सवयींचमुळे आपले बाळ नक्कीच सुदृढ राहू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Lifestyle, Parents and child, Small baby, Small child, Wellness