मुंबई, 19 ऑक्टोबर: सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांचं आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लठ्ठपणाच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लठ्ठपणाच्या समस्येमुळे डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, किडनीचे आजार, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक अशा अनेक आजारांचा धोकाही वाढत आहे. यामुळे अनेकांचे अकाली मृत्यू झाल्याच्याही घटना तुमच्या कानावर आल्या असतील. अशा परिस्थितीतीमुळे फिटनेसवर लक्ष देणं अतिशय गरजेचं ठरत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मागे कामाचा कितीही व्याप असला तरी, योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीनं फिट होणं सहज शक्य आहे. पोलीस इन्स्पेक्टर असलेल्या दीपक पाटील यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. पाटील यांनी 31 किलो वजन कमी केलं आहे. जी तरुण मुलं विविध कारणं देऊन आपल्या फिटनेसवर कष्ट घेण्याचं टाळतात त्यांच्यासाठी दीपक पाटील यांनी समोर उदाहरण मांडलं आहे. पाटील यांनी आज तक डॉट इनसोबत आपली फिटनेस जर्नी शेअर केली आहे.
45 वर्षांचे दीपक पाटील भोपाळमधील बऱ्हाणपुर शहरात रिझर्व्ह इन्स्पेक्टर म्हणून नोकरी करतात. पाच फूट 10 इंच उंची असलेल्या पाटील यांचं वजन 109 किलोपर्यंत वाढलं होतं. त्यांनी आपल्यावर फिटनेसवर मेहनत घेऊन तब्बल 31 किलो वजन कमी केलं आहे. सध्या त्यांचं वजन 78 किलो आहे. त्यांनी वजन कमी करताना आपल्या आहारवर सर्वांत जास्त लक्ष दिलं. दीपक पाटील हे ब्रेकफास्टमध्ये एक कप ब्लॅक कॉफी, 300 ग्रॅम सॅलड, 100 ते 150 ग्रॅम पनीर खातात तर, लंचमध्ये बाजरी, ज्वारी किंवा बार्लीच्या एक ते दोन भाकरी, एक वाटी भाजी, 200 ते 300 ग्रॅम सॅलड आणि एक कप दही खातात. संध्याकाळी स्नॅक्समध्ये ते अंडी किंवा पनीर खातात. डीनरमध्ये ते बाजरी, ज्वारी किंवा बार्लीची एक भाकरी, एक वाटी भाजी आणि 200 ते 300 ग्रॅम सॅलड, असा आहार घेतात. वरील आहाराचा त्यांनी एकदिवसाआड असा पॅटर्न ठेवला आहे. अशाप्रकारे त्यांनी अतिरिक्त खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवलं.
हेही वाचा - धावण्यापूर्वी आणि नंतर किती वेळाने खावे; या गोष्टी वेळीच समजून घेणे फायद्याचे
इन्स्पेक्टर दीपक पाटील यांनी सांगितलं की, अतिखाणं आणि बैठ्या जीवनशैलीमुळे त्यांचं वजन हळूहळू वाढत गेलं. त्यांनी कधीच त्याकडे लक्षही दिलं नाही. खाण्याची आवड असलेले पाटील नेहमी पोट भरण्यासाठी नाही तर मन भरण्यासाठी जेवण करायचे. ते एकेवेळी 10 ते 12 रसमलाईच्या प्लेट फस्त करायचे. गोड आणि चटकदार पदार्थांची आवड असल्याने त्यांच्या शरीरात भरपूर कॅलरी जात होत्या. त्यामुळेच हळूहळू वजन 109 किलो झालं होतं.
वजन कमी करण्याची गरज आहे याची जाणीव कधी झाली? या बद्दल बोलताना पाटील म्हणाले, "ऑगस्ट 2021मध्ये, मी एकदा भोपाळ ग्रामीण भागाचे तत्कालीन आयजी इर्शाद वली सर यांच्यासोबत काही कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे सरांनी मला बॉडीचेक करायला सांगितलं. जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. हॉस्पिटलमधील डॉक्टर आमीर यांनी माझा रिपोर्ट बघून माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले. लठ्ठपणामुळे होणार्या आजारांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी मी आतापासून पैसे जमा करावेत किंवा माझं वजन कमी करावं, असे दोन पर्याय होते. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मला काळजी वाटू लागली आणि वजन कमी करण्याचा पर्याय निवडला."
हेही वाचा - Healthy Diet for Brain : मेंदूच्या आरोग्यासाठी आहारात असावा 'या' पदार्थांचा समावेश
डाएटवर लक्ष केंद्रित केलं
आपल्या डाएटबद्दल बोलताना दीपक पाटील म्हणाले, "मी मराठी असल्यामुळे मला खाण्यापिण्याची विशेष आवड आहे. जेव्हा माझं वजन 109 किलो होतं तेव्हा मी भरपूर खायचो. पण, आता विनाकारण माझ लक्ष खाण्याकडे जात नाही. वजन कमी करण्यासाठी डॉ. आमीर यांनी डाएट प्लॅन दिला होता. जोपर्यंत मी माझ्या शरीरावर आणि डाएटवर प्रेम करत नाही तोपर्यंत माझं वजन कमी होणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मी माझ्या आहाराकडे लक्ष दिलं आणि माझं वजन कमी झालं. मी एक दिवसाआड ब्रेकफास्ट करतो. रात्रीच्या जेवणाचा पॅटर्नही तसाच आहे. ज्या दिवशी मी ब्रेकफास्ट करतो त्या दिवशी रात्री जेवत नाही. ज्या दिवशी मला रात्री जेवायचं आहे त्या दिवशी मी ब्रेकफास्ट करत नाही. मी दररोज सुमारे एक हजार 500 कॅलरीज घेतो. जेवणात घरगुती पदार्थांचा समावेश करतो."
वर्कआउटचीही घेतली मदत
वजन कमी करण्यासाठी योग्य डाएटच्या जोडीने इन्स्पेक्टर दीपक पाटील यांनी वर्कआउटही केलं. ते एक दिवसाआड जिममध्ये 30 मिनिटं वर्कआउट करतात. जीममध्ये ते हेवी वर्कआउट करत नाहीत. लाईट वर्कआउटच्या सहाय्यानं त्यांनी स्ट्रेंथ वाढवण्यावर भर दिला. याशिवाय ते दररोज सकाळी व्यायाम म्हणून चालण्यासाठी जातात.
इन्स्पेक्टर दीपक पाटील म्हणाले, "वजन कमी करणं खूप सोपं आहे, तुम्हाला फक्त तुमच्या शरीरावर प्रेम असलं पाहिजे. मला वाटायचं, की फक्त भरपूर व्यायाम केल्यानेच वजन कमी होतं, पण तसं नाही. योग्य डाएटमुळे वजन कमी होतं. व्यायामामुळे त्यात आणखी मदत होते. इर्शाद वली सर आणि डॉक्टर आमीर सरांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. त्यामुळे हळूहळू माझं वजन कमी झालं. सध्या माझं वजन 78 किलो आहे. मी एक वर्ष आणि दोन महिन्यांत सुमारे 31 किलो वजन कमी केलं आहे. जेव्हा आयजी सरांनी मला पाहिलं तेव्हा ते म्हणाले की, मी वजन कमी करून स्वतःलाच एक नवीन जीवन दिलं आहे. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यानंतर योग्य डाएट प्लॅन तयार करा. योग्य पद्धतीनं वजन कमी होण्यास वेळ लागतो. म्हणून धीर धरा आणि प्रयत्न करत रहा."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Weight loss, Weight loss tips