नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : मासिक पाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सर्वसामान्यपणे मुलींच्या वयाच्या 10व्या ते 15 व्या वर्षापर्यंतच्या काळात मासिक पाळी सुरू होते. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास (Periods Pain) ही महिलांसाठी एक गंभीर (Periods Health Issue) समस्या आहे.
मासिक पाळीत छाती जड वाटणं, अस्वस्थता, चेहऱ्यावर मुरमं उठणं, सतत मूड बदलत राहणं आणि चिडचिडेपणा असा त्रास होतो. याशिवाय, महिलांना त्यांचं वजन वाढल्याचं जाणवतं. मासिक पाळीदरम्यान अचानक वजन वाढलं असं जाणवत असेल तर घाबरून जाऊ नये. कारण मासिक पाळीदरम्यान वजन वाढणं हे सामान्य आहे. मासिक पाळीदरम्यान वजन वाढण्याची काही कारणं आहेत. ती कारणं ( Weight Gain During Periods) काय आहेत, हे जाणून घेऊ या. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कॅफीनचं अतिसेवनदेखील वजन वाढण्याचं कारण आहे. महिलांना मासिक पाळी येते, तेव्हा त्यांच्या शरीरातले हॉर्मोन्स बदलतात. तेव्हा वेदना कमी करण्यासाठी महिला चहा, कॉफी, सोडा, चॉकलेट आदींचं सेवन करतात. या सर्वांमध्ये कॅफीन असतं. यामुळे शरीरात कॅफिनचं प्रमाण वाढतं. जास्त प्रमाणात कॅफिन शरीरात गेल्याने ब्लोटिंग होतं आणि वजन काही किलोग्रॅम्सनी वाढू शकतं. यासाठी आपल्या आहारात कॅफिन कमी करावं.
मासिक पाळीदरम्यान, महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण वाढतं. यामुळे सतत भूक लागते. चांगले पदार्थ खावेसे वाटतात. तेव्हा नियमित अन्नपदार्थांपेक्षा वेगळ्या पदार्थांचं सेवन केलं जातं. त्यात चॉकलेटचा प्रमुख समावेश असतो. पदार्थांचं जास्त सेवन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने वजन वाढतं.
मासिक पाळीच्या काळात महिलांना पोटदुखी आणि पचनाच्या समस्यांचा त्रास होतो. अनेकदा त्यांना अन्न पचत नाही. प्रोजेस्टेरॉनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे हे घडतं. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खाल्ल्याने पोटही फुगतं आणि त्यामुळे महिलांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि वजन वाढतं.
याशिवाय, वजन वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे, मासिक पाळीत सतत पोट दुखत असल्याने आळस येतो. काम करावंसं वाटत नाही. शरीरात थकवा राहतो. यामुळे व्यायाम करणं किंवा जिमला जाणं बंद होतं. त्यातच विविध पदार्थांचं सेवन आणि शरीरात होणाऱ्या वॉटर रिटेंशनमुळे कॅलरीज बर्न होत नाहीत. यामुळे वजन वाढू लागतं. यामुळे मासिक पाळीत शरीराची हालचाल करावी आणि जमेल तेवढा व्यायाम करावा.
हे ही वाचा-सकाळी रिकाम्या पोटी चावून खा कढीपत्त्याची पाने; याचे फायदे अनेकांना माहीत नसतील
मासिक पाळीत महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनचं प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढतं. त्यामुळे थोडंसं जरी खाल्लं, तरी शरीरात फ्लुइड रिटेन होणं सुरू होतं. यादरम्यान महिलांना ब्लोटिंगदेखील जाणवते. यातच प्रोजेस्टेरॉन नावाचं हॉर्मोनही लक्षणीय प्रमाणात वाढतं. त्यामुळे वॉटर रिटेंशन होते आणि शरीराचे वजन अचानक वाढते. एकूणच वजन वाढण्यामागे हॉर्मोन्सदेखील जबाबदार असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Periods, Weight gain