मनाली, 14 जानेवारी : जंगल सफारी (Jungal safari) करताना किंवा नॅशनल पार्कमध्ये (National park) गाडीतून फिरताना समोर वाघ, सिंह, बिबट्या (Leopard) हे हिंसक प्राणी दिसले की धडकीच भरते. हे प्राणी रस्ता ओलांडत असताना गाड्या समोर आल्या तरी थांबवल्या जातात. त्यावेळीदेखील हे प्राणी गाडीतील माणसांकड गाडीच्या अवतीभोवती फिरतात. लोक गाडीतून बाहेर येणं तर बाहेर आपला हातही बाहेर काढायला घाबरतात. मात्र सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जिथं एक व्यक्ती बिनधास्त बिबट्याच्या जवळ जाऊन त्याचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करते.
आयएफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी आपल्या ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसतो आहे. रस्त्यावर बऱ्याच गाड्या आणि लोकही आहेत. सुशांता नंदा यांनी व्हिडीओ शेअर करताना बिबट्या आपल्या गाडीच्या शोधात असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान या व्हिडीओत लोक या बिबट्याला न घाबरता बिनधास्त त्याचा फोटो काढताना, व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. आपल्या गाड्यांमधून बाहेर येत हातात मोबाईल घेऊन त्या बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांना या बिबट्याची भीती वाटते आहे, ते या बिबट्यापासून काही अंतर दूरच आहेत. पण एका तरुणानं तर हद्दच केल्याची दिसते आहे. बिबट्या जसा फिरतो आहे, तसा हा तरुणही त्याच्या मागून फिरतो आहे. अगदी बिबट्याजवळ जाऊन तो बिबट्याचा व्हिडीओ बनवताना दिसतो आहे.
ही व्यक्ती आपल्या जवळ येते आहे, हे बिबट्याच्या लक्षात येतातच बिबट्या त्या तरुणाच्या जवळ जातो. त्याच्या अंगावर झेप घेण्याचा प्रयत्नही करतो. तेव्हा काही क्षण ही व्यक्ती घाबरते. पण इतक्या गाड्या आणि इतकी माणसं पाहून बिबट्याही कावराबावरा झालेला दिसतो आहे. कुणावरही हल्ला न करता तो आपला मार्ग बदलतो आणि शांतपणे तिथून निघून जातो.
ही घटना हिमाचल प्रदेशच्या तीर्थन व्हॅलीतील असल्याचं सांगितलं जातं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. रस्त्यावर उतरून बिबट्याचा व्हिडीओ काढणाऱ्या लोकांना नेटिझन्सनी चांगलंच सुनावलं आहे.