ना विजेता ना विक्रेता; जॅकपॉट लागताच लॉटरीशी संबंध नसलेल्या गरीब, बेघरांची पार्टी

ना विजेता ना विक्रेता; जॅकपॉट लागताच लॉटरीशी संबंध नसलेल्या गरीब, बेघरांची पार्टी

ग्राहकानं जॅकपॉट लॉटरी जिंकली, त्यामुळे लॉटरी विक्रेत्याचंही नशीब फळफळलं. पण ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही अशा गरीब आणि बेघरांची पार्टी कशी काय रंगली हे समजलं तर तुम्हाला हेवा वाटेल.

  • Share this:

वॉशिंग्टन, 27 नोव्हेंबर : आयुष्यात एकदा तरी आपल्याला लॉटरी (lottery) लागावी असं बहुतेकांचे स्वप्न असतं. मात्र बहुतेकांचं हे स्वप्नं स्वप्नंच राहतं. पण अमेरिकेतील महिलेचं हे स्वप्नं प्रत्यक्षात पूर्ण झालं. तिला कोट्यवधी रुपयांची जॅकपॉट लॉटरी लागली आणि त्यामुळे लॉटरी विक्रेत्याचंही नशीब फळफळलं. ही जॅकपॉट लॉटरी विकणाऱ्या विक्रेत्याला लाखो रुपयांचं कमिनशन मिळालं. पण जॅकपॉट जिंकणारा विजेता आणि त्याचा फायदा झालेला लॉटरी विक्रेता नाही तर रस्त्यावरील गरीब आणि बेघर लोकांची पार्टी झाली ज्यांचा या लॉटरीशी काहीही संबंध नव्हता. खरंतर यामागील कारण तुम्हाला समजलं तर तुम्हालादेखील हेवा वाटेल.

अँडरसन भागात असलेलं केपी फूड मार्ट हे ग्रोसरी स्टोअर. त्यांनी दहा डॉलर्स म्हणजे फक्त 738 रुपयांच्या मायटी जम्बो बक्सची विक्री केली होती. त्यातील एका तिकिटाला जॅकपॉट लागला. दक्षिण कॅरोलिना इथं राहणाऱ्या एका महिलेला स्क्रॅच कार्ड लॉटरीमधून चक्क तीन लाख 50 हजार डॉलर्स म्हणजेच तब्बल दोन कोटी 58 लाख 55 हजार 375 रुपयांचा जॅकपॉट लागला. ग्राहकाला जॅकपॉट लॉटरी लागल्यानंतर ही लॉटरी विकणाऱ्या दुकानाला तब्बल 3500 डॉलर्स म्हणजे 2 लाख 58 हजार 553 रुपये कमिशन मिळालं.

एखाद्या लॉटरी लागली किंवा इतका पैसा मिळाला की सर्वात आधी आपल्याला काय काय करायचं आहे, आपली कोणकोणती स्वप्नं पूर्ण करायची आहेत, हेच डोक्यात येतं. मात्र या ग्रोसरी स्टोअरनं लॉटरी विक्रीच्या कमिशनमधून मिळालेल्या रकमेतून परिसरातील बेघर लोकांना आणि दुकानात येणाऱ्या सर्वांना थँक्स गिव्हिंगचं खास भोजन देण्याचं ठरवलं.

हे वाचा - Inside White House kitchen : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरातलं किचन

यूएसए टुडेने दिलेल्या माहितीनुसार, दोनच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या दुकानानं विक्री वाढावी आणि वेगळी ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने लॉटरी विक्रीतून मिळालेल्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी करण्याचं ठरवलं आणि थँक्स गिव्हिंग डे निमित्त खास भोजन समारंभ आयोजित केला.  या दुकानाचे व्यवस्थापक अॅगी टर्नोवस्की यांनी सांगितलं की, थँक्स गिव्हिंग डेच्या पारंपरिक भोजनाचे आयोजन करण्यात आलं असून, यात टर्कीसह अनेक खास पदार्थांचा समावेश आहे. दुकानात येणाऱ्या सर्वांना आणि आसपासच्या परिसरातील बेघर लोकांना या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे हे भोजन ते स्वतः बनवणार आहेत.

टर्नोवस्की आणि दुकानाच्या सुपरवायझर मेलिसा ग्रिमेटे यांनी हे खास भोजन तयार करण्याची जबाबदारी उचलली आहे. मॅक्रोनी आणि चीज, ड्रेसिंग, ग्रीन बीन कॅसरोल आणि रोल्स तयार करण्याची जबाबदारी टर्नोवस्की यांनी घेतली तर टर्की फ्राय करण्याची जबाबदारी मेलिसा ग्रिमेटे यांनी घेतली आहे. या परिसरातील अनेक गरजू, गरीब लोक दुकानापाशी येतात तेव्हा त्यांना अॅगी टर्नोवस्की नेहमीच बिस्किट्स किंवा अन्य छोट्या मोठ्या वस्तू देऊन मदत करत असत. या गरजू लोकांना उत्तम भोजन देण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळेच हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असं मेलिसा ग्रिमेटे यांनी यूएसए टुडेला सांगितलं.

हे वाचा - आधी भीक मागायची, आता न्यायाधीश होण्याचं स्वप्न; ट्रान्सजेंडरचा अद्भूत प्रवास

या भोजन समारंभासाठी या दुकानानं आपल्याला मिळालेली सर्व रक्कम वापरली असली तरी या उपक्रमाचा खर्च खूप मोठा असल्यानं या भागातील नागरिकांनीही त्यासाठी उदारपणे देणगी दिली आहे. हा एक चांगला पायंडा असून त्याचा उपयोग परदेशी नागरिकांना स्थानिक लोकांशी सहजपणे जोडण्यासाठी होतो, असं मत स्वतः पोलिश असलेल्या टर्नोवस्की यांनी व्यक्त केलं. जवळपास 30 लोकांना हे भोजन देण्याचं त्यांनी नियोजन केलं आहे, अर्थात कोणीही उपाशी जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर कोणी आले तर त्यालाही ते जेवण देणार आहेत.

Published by: Priya Lad
First published: November 27, 2020, 11:11 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading