Home /News /lifestyle /

इंदिरा गांधींच्या 'मुली'ची अशी आहे 40 वर्षांनंतरची अवस्था! राजकीय भेटींचं पुढे काय होतं पाहा

इंदिरा गांधींच्या 'मुली'ची अशी आहे 40 वर्षांनंतरची अवस्था! राजकीय भेटींचं पुढे काय होतं पाहा

आज हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या (hathras gang rape) कुटुंबासाठी जसं गांधी (Gandhi) परिवार धावून आलं. इतर राजकीय नेतेही या कुटुंबाला मदतीचा हात देत आहे, आश्वासनं देत आहेत. पण अशा राजकीय भेटी आणि आश्वासनांचं पुढे काय होतं, याचं हे उदाहरण.

पुढे वाचा ...
    लखनौ, 06 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरस सामूहिक बलात्कार (hathras gang rape) प्रकरणानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले. गांधी कुटुंब (gandhi) या पीडित कुटुंबासाठी धावून आलं. प्रियांका गांधी (priyanka gandhi) आणि राहुल गांधींनी (rahul gandhi) पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी पीडितेची आई प्रियांका गांधींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली. 40 वर्षांपूर्वी अगदी असाच खांदा इंदिरा गांधी (indira gandi) यांनीही एका अनाथ मुलीला दिला होता. तिला त्यांनी आपलं मुलगी मानलं, तिची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र 40 वर्षांनंतरही तिची परिस्थिती जैसे थे आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज जशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अगदी तशीच परिस्थिती चार दशकांपूर्वी निर्माण झाली होती.  कुशीनगरमधील नरायनपूर गावात एका रस्ते अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अख्खं गाव पेटून उठलं. राज्य सरकारविरोधात आंदोलनं झाली. त्यावेळी खुद्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या गावात आल्या आणि त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. ही घटना आहे 11 जानेवारी 1980 सालची. आई-वडिलांचं छत्र हरपलेली सोनकेशिया आणि तिचा भाऊ जयप्रकाश यांचा सांभाळ तिची आजी  बसरकलिया करत होती. मात्र गावासमोरील हाटा-कप्तानगंज रस्ता ओलांडताना बसने तिला उडवलं आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. सोनकेशिया आणि जयप्रकाश यांच्या डोक्यावरील आजीचं छत्रही हरपलं. यानंतर ग्रामस्थ रस्त्यावर उतरले, त्यांनी भरपाईसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. घटनेच्या तिसऱ्याच दिवशी गावात घुसून पोलिसांनी तोडफोड केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आणि मग देशभर याचे पडसाद उमटू लागले. पंतप्रधान इंदिरा गांधी स्वत: त्या गावात गेल्या, पीडितेची विचारपूस केली. पीडित कुटुंबाची अवस्था पाहून त्यांचं मन गहिवरून आलं. अनाथ सोनकेशियाला पाहून त्यांनी तिला उचलून आपल्या छातीशी कवटाळलं. तिला आपली मुलगी मानली आणि तिची जबाबदारी आपण स्वत: घेणार असल्याचं जाहीर केलं. घटनेच्या एका महिन्यात संजय गांधी यांनी तीन वेळा गावाचा दौरा केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. हे वाचा - केंद्रीय मंत्री रामदास आठवले हाथरसमध्ये, पीडित कुटुंबीयांना 5 लाखांची मदत त्यावेळी बनारसी दास यांचं सरकार बरखास्त झालं. त्यानंतर पुढील निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला सत्ता मिळाली मात्र त्यानंतर नरायनपूर गावाचा विसर पडला. त्या गावाकडे ना कुणी पुन्हा ढुंकून पाहिलं, ना सोनकेशियाची साधी विचारपूस केली. अमर उजालाने आपल्या बातमीतून सोनकेशियाची सद्य परिस्थिती दाखवली. इंदिरा गांधींनी घटनेच्या काही दिवसांतच सोनकेशियाला गावातील लोकांच्या भरवशावर सोडून दिलं. या दोन्ही मुलांची काळजी तिचे काका घेऊ लागले. यादरम्यान सोनकेशियाचा भाऊ जयप्रकाशचाही मृत्यू झाला. सोनकेशियाच्या काकांनी सोनकेशियाची जबाबदारीही झटकून टाकली. सोनकेशिया बकरी पाळून आणि लोकांनी दिलेलं काही खाऊन जगू लागली. हे वाचा - UP मध्ये तरुणीवर बलात्कार; जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्राकडे धावली गावातीलच एका व्यक्तीशी सोनकेशियाचं लग्न झालं. तिच्या एका मुलीचं लग्न झालं. तर इतर तीन मुलांसह शेती करून ती आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवते आहे. एका मातीच्या घरात ती राहते आहे.मोडक्या तोडक्या घरात आपलं आयुष्य जगते आहे.  ज्या सोनकेशियाला इंदिरा गांधींनी आपली मुलगी मानली आज त्यांची ही मुलगी चाळीस वर्षांनंतरही आहे त्या परिस्थितीतच आहे. अशा कित्येक घटना घडल्यानंतर राजकीय नेते पीडित कुटुंबांची भेट घेतात. त्यांना आश्वासन देतात. मात्र या राजकीय भेटींनंतर त्या आश्वासनंचं पुढे काय होतं. याचं सोनकेशिया हे एक उदाहरण झालं. अशी बरीच कुटुंब देशात असतील.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Indira gandhi, Priyanka gandhi, Rahul gandhi, Uttar pradesh

    पुढील बातम्या