ब्रिटन, 19 मार्च : आजकाल नाक, डोळे, ओठ, चेहरा यांचा आकार आपल्याला हवा तसा किंवा आकर्षक करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी (Plastic surgery), फिलर, बोटोक्स सर्जरी असे अनेक मार्ग उपबल्भ आहेत. पाश्चात्य देशात आपल्या आवडत्या सेलेब्रिटीसारखं दिसण्याकरता किंवा आपल्याला हव तसं आपलं रूप, बांधा असावा यासाठी शस्त्रक्रिया करणं आणि त्यासाठी वाटेल तेवढी किंमत मोजणं हा अनेकांचा शौक आहे. यूकेमधील (UK) एका 24 वर्षांच्या तरुणानं चक्क इन्स्टाग्राम फिल्टरसारखे (Instagram Filter) दिसण्याकरता आपल्या चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी (Plastic Surgery) करून घेतली असून त्यासाठी त्यानं तब्बल 30 हजार डॉलर्स म्हणजे जवळपास 21 ला रुपये खर्च केले आहेत.
लेव्ही जेड मर्फी असं या तरुणाचं नाव असून तो मँचेस्टर इथला रहिवासी आहे. इन्स्टाग्रामावर क्लीअर स्कीन, स्मॉल फेस, लीप फिलर्स,मेक अप असे वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर असतात. ते वापरून आपला चेहरा वेगळा दिसू शकतो. त्यानुसार प्रत्यक्षातही तसेच दिसण्यासाठी या तरुणाने आपल्या चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. डोळ्यांवर कॅट आय लिफ्ट, ओठांसाठी फिलर, हनुवटी, जबडा, नाक सगळ्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. दातही सरळ करून घेतले आहेत.
हे वाचा - बापरे! सुंदर दिसण्याच्या नादात सडलं नाक; टीव्ही स्टारला कॉस्मेटिक सर्जरी पडली महागात
वयाच्या 19 व्या वर्षापासून तो अशा शस्त्रक्रिया करून घेत असून आतापर्यंत तब्बल 30 हजार डॉलर्स खर्च केले आहेत. LADbible शी बोलताना त्यानं सांगितलं की, वयाच्या 19 व्या वर्षी मी लीप फिलरची (Lip Filler) शस्त्रक्रिया केली. 20 व्या वर्षी त्यानं गाल, जबडा, अंडर आय फिलर अशा शस्त्रक्रिया करून घेतल्या. त्यानंतर किती ते देखील तो विसरून गेला.
लेव्ही म्हणतो मला यामुळं कधी असुरक्षित किंवा तिरस्कार वाटला नाही पण मला माझ्या चेहऱ्याचा कंटाळा येतो. त्यामुळं मी माझा लूक सतत बदलतो. त्याचा नवीन लूक बघून लोकांनी त्याची तुलना मास्क ऑफ दी पर्जशी केली असून, त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. अर्थात लोकांनी टीका केली असली तरी तो स्वतः आपल्या रूपावर खुश आहे. मी कोणाचीही टीका मनावर घेत नाही. मला माझं हे रूप आवडलं आहे, असं त्याने सांगितलं.
हे वाचा - तरुणींच्या स्टंटला नेटकऱ्यांकडून मिळाली वाह वाह!पोलिसांच्या कारवाईनं घडवली अद्दल
लेव्ही आपल्या चेहऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर त्याची जाहिरात करण्यासाठी त्याला पैसे मिळतात. त्यातून तो त्याचा सगळा खर्च करतो. आपल्या चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याने बराच अभ्यास करून तुर्कीची निवड केली आहे. यूकेच्या तुलनेत इथं निम्म्या खर्चात अशा शस्त्रक्रिया होतात. लेव्ही त्याच्या बॉयफ्रेंडबरोबर एक ओन्ली फॅन्स अकाऊन्ट चालवतो. रिटेलमध्ये काम करत असताना तो जेवढे पैसे कमावत असे त्याच्या दहापट तो आता याद्वारे कमावतो. पैसा सहज उपलब्ध होत असल्याने तो अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी उद्युक्त होतो, असंही त्यानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, International, Lifestyle, Surgery, Uk, Viral