वॉशिंग्टन,28 जुलै : टीव्हीवर बातम्या पाहताना अँकर आणि रिपोर्टर (tv reporter) कसे दिसतात, त्यांचे केस कसे आहेत, त्यांचा ड्रेस कसा आहे, ते कसे बोलतात, कसा बसतात, कसे उभे राहतात या सर्व गोष्टींवर एक प्रेक्षक म्हणून अनेकांचं लक्ष असतंच. अशीच घारीसारखी नजर असणाऱ्या एका प्रेक्षकामुळे एका टीव्ही रिपोर्टरला आपल्याला कॅन्सरसारखा (cancer) गंभीर आजार असल्याचं निदान झालं.
यूएसमधील एका टीव्हीसाठी रिपोर्टिंग करणारी रिपोर्टर व्हिक्टोरिया प्राइस (Victoria Price) हिला थायरॉइड कॅन्सर असल्याचं निदान झालं. मात्र ते एका प्रेक्षकामुळे. एका प्रेक्षकाने प्राइसच्या मानेवर गाठ असल्याचं निदर्शनास आणून दिलं त्यानंतर तिला थायरॉइड कॅन्सर असल्याचं निदान झालं. टीव्ही रिपोर्टरने आपला हा अनुभव आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे.
A bit of ~personal news~ to share.
Turns out, I have cancer. And I owe it to one of our wonderful @WFLA viewers for bringing it to my attention.
व्हिक्टोरियाने सांगितल्यानुसार, एका प्रेक्षकाने तिला ऑन एअर पाहिलं आणि या प्रेक्षकाचा ई-मेल आला. या ई-मेलमध्ये तिच्या मानेजवळ गाठ असल्याचं प्रेक्षकाने सांगितलं आणि या गाठीबाबतचा आपला अनुभव सांगत प्राइसला कॅन्सर असावा अशी शक्यता या प्रेक्षकाने व्यक्त केली आणि तपासणी करण्याचा सल्ला दिला. प्राइसने सुरुवातीला या ई-मेलला इतकं गांभीर्याने घेतलं नाही. मात्र तिच्या बॉयफ्रेंडने तिला तपासणी करण्यासाठी पाठवलं. त्यानंतर आपले रिपोर्ट पाहून ती शॉकच झाली. तिची ही गाठ म्हणजे कॅन्सरचा ट्युमर होता. तिला थायरॉइड कॅन्सर असल्याचं निदान झालं.
आपण आपल्या कामात इतके व्यस्त आहोत, आरोग्यावर ओढावलेल्या संकटाचं रिपोर्टिंग करत आहोत मात्र स्वत:चं आरोग्य विसरत आहोत याकडेही तिनं लक्ष वेधलं आहे.
व्हिक्टोरिया म्हणाली, "महासाथ सुरू झाल्यापासून पत्रकार म्हणून काम खूप वाढलं आहे. न संपणारी शिफ्ट, न संपणारं बातम्यांचं चक्र. आम्ही एका शतकातील सर्वात महत्त्वाची अशी हेल्थ स्टोरी कव्हर करत होतो. मात्र माझ्या स्वत:च्या आरोग्याचा विचार मनात कधीच आला नाही"
या कॅन्सरग्रस्त रिपोर्टरने सर्वात आधी त्या प्रेक्षकाचे आभार मानले ज्याने तिच्या हे लक्षात आणून दिलं. आपल्यावर आता सर्जरी होत असल्याचंही तिनं सांगितलं.
"मला तो ई-मेल आला नसता तर मी माझ्या डॉक्टरांकडेही कदाचित गेले नसते. कॅन्सर तसाच पसरत राहिला असता. हा विचारही किती भीतीदायक आहे. एक अपरिचित व्यक्ती, तशी तिची ही जबाबदारीही नव्हती मात्र तरी तिनं ते केलं. ज्या महिलेने मला ई-मेलमार्फत तिचा स्वत:चा अनुभव सांगत मलादेखील सावध केलं त्या महिलेची मी आयुष्यभर आभारी असेन", असं व्हिक्टोरिया म्हणाली.